नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Lasalgaon APMC) मुख्य बाजार आवारात शेतीमालाच्या वजनमापासाठी (Weign Machine) १९९२-९३ मध्ये ३० टन क्षमतेचा सेमी इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा भुईकाटा (Electronic Weign Machine) बसविलेला होता; मात्र तो जीर्ण झाल्याने वजनमापात येणारी तफावत, भुईकाट्याचे गर्डर गंजल्याने त्यावरून अवजड वाहन गेल्यास भुईकाटा प्लॅटफॉर्म कोसळून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता होती.
त्यामुळे बाजार समितीने या कट्याचे कामकाज बंद केले. या पार्श्वभूमीवर शेतीमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होत असल्याने तो तत्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर लासलगाव बाजार समितीने भुईकाटा भाडेतत्त्वावर घेऊन वजनमापाची पर्यायी व्यवस्था सुरू असून वजनमाप विनामूल्य होणार असल्याची माहिती सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली.
बाजार समिती प्रशासनाने २९ सप्टेंबर रोजी भुईकाट्याची संबंधित सेवा पुरवठादार कंपनीचे प्रतिनिधी, बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी तसेच वास्तुविशारद यांच्या उपस्थितीत अंतर्गत तपासणी केली. या भुईकाट्याचे गर्डर गंजलेले असून त्याला ठिकठिकाणी छिद्रे पडलेली आहे. तसेच त्याचे इतरही काही भाग खराब झाले असून मशिनरी कालबाह्य झाल्याचे निरीक्षणे नोंदवण्यात आले.
त्यामुळे नवीन भुईकाटा कार्यान्वित होईपर्यंत जुना बंद ठेवला आहे. खासगी काट्यावर वजन करताना जो आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो त्यास पर्याय म्हणून परिसरातील खासगी भुईकाटा पर्यायी म्हणून भाड्याने घ्यावा, अशी मागणी होती. याप्रश्नी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनीही बाजार समितीचे लक्ष वेधले. अखेर बाजार समितीने स्वमालकीच्या दोन भुईकाट्यांव्यतिरीक्त मुख्य बाजार आवाराशेजारील विंचुर रोडवरील न्यु साई वे ब्रिज हा भुईकाटा पर्यायी व्यवस्था म्हणून भाडेतत्त्वावर घेतला आहे. भुईकाट्यावर शेतकऱ्यांच्या शेतीमाल वाहनांचे विनामूल्य वजनमाप करून देण्यात येणार आहे.
नवीन भुईकाटा एक ते दीड महिन्यात होणार कार्यान्वित
बाजार समितीने ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या सदस्य मंडळ सभेतील निर्णयाप्रमाणे ३० टन क्षमतेचा सेमी इलेक्ट्रॉनिक पद्धतीचा भुईकाटा काढून त्याऐवजी ८० टन क्षमतेचा नवीन डिजिटल इलेक्ट्रॉनिक भुईकाटा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने बाजार समिती विहीत कार्यपद्धतीचा अवलंब करून नवीन भुईकाटा एक ते दीड महिन्याच्या कालावधीत कार्यान्वित करणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.