
नळगंगा आणि वैनगंगा प्रकल्प सध्या मंजुरीच्या शेवटच्या टप्प्यात असून या प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भातील दुष्काळी भागासह सर्व जिल्हे जलयुक्त करण्यात येणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात स्टील उद्योगाद्वारे २० हजार कोटींची गुंतवणूक आली आहे. येत्या काळातही याच उद्योगात १ लाख कोटींची गुंतवणूक होणार असल्याचे सकारात्मक चित्र असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापनदिनाच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, ‘‘गेल्या वर्षभरात राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाने ५० हजार रुपये दिले आहेत.
‘पीएम किसान’ योजनेला पूरक अशी ‘नमो शेतकरी सन्मान योजना’ राज्य शासनाने आणली असून केंद्राप्रमाणे राज्य शासनाच्या वतीनेही प्रत्येक शेतकऱ्याला ६ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मागणीनुसार मागेल त्याला शेततळे, ड्रीप, पेरणी यंत्र देण्यात येत आहेत.
नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेंतर्गत जागतिक बँकेच्या सहकार्याने पश्चिम विदर्भात पहिल्या टप्प्यात ४ हजार कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात पूर्व विदर्भात ६ हजार कोटींची कामे करण्यात येणार असून या माध्यमातून शेतमालावर प्रक्रिया, शेतमालाची साठवणूक, शेतमालास भाव मिळवूण देण्यासाठी व्यवस्था उभारण्यात येईल. राज्यात १ रुपयांमध्ये पंतप्रधान पीकविमा नोंदविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दीड कोटी इतकी विक्रमी झाली आहे.
नागपूर जिल्ह्यातही प्रथमच अडीच लाख शेतकऱ्यांनी पीक विमाअंतर्गत नोंदणी केली. राज्य सरकार दीन-दलीत, गोर-गरिब, आदिवासी अशा समाजातील सर्व घटकांसाठी सातत्याने कार्य करीत आहे. येत्या काळातही सर्व सामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे कार्य करू.
पंतप्रधानांनी देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याचे स्वप्न पाहिले आहे. यात महाराष्ट्राचेही महत्त्वाचे योगदान असेल, राज्य यात १ ट्रिलियन डॉलरचे योगदान देणार आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेची घौडदौड सुरू आहे. याला पुढे घेऊन जात देशातील व राज्यातील जनतेला न्याय देणारी मजबूत अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेन कार्य करू.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकाळात पंतप्रधानांनी देशाला विकसित भारत बनविण्यासाठी ‘पंचप्रण’ दिले आहे. प्रत्येक नागरिकांनी हे ‘पंचप्रण’ प्रत्यक्षात आणण्यासाठी आपले कर्तव्यपार पाडण्यासाठी प्रयत्न करावे, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.