
सिन्नर, जि. नाशिक : समृद्धी महामार्गाच्या (Samrudhhi Highway) कामासाठी करण्यात आलेल्या खोलीकरणामुळे तलावात सुमारे २० फूट खोलीपर्यंत पाणी आहे. या पाण्यातून मार्ग काढत योगेश वाघ (Yogesh Wagh) या महावितरणच्या (Mahavitaran) कर्मचाऱ्याने सुमारे ७० फूट अंतर पोहून जात मुख्य वीज वाहिनीवर (Power Supply) असणारा बिघाड दूर केला. त्यानंतर सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील वावी व पाथरे या दोन उपकेंद्रांचा सहा तास बंद झालेला वीजपुरवठा सुरळीत झाला. त्यामुळे वाघ यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
शुक्रवारी (ता. २५) सकाळी आठ वाजल्यापासून वावी व पाथरे येथील उपकेंद्रांचा वीजपुरवठा तांत्रिक बिघाडामुळे बंद झाला होता. गोंदे शिवारातील गोंद नाल्यावर पाझर तलाव क्षेत्रातील खांबावर बिघाड असल्याचे लक्षात आले. या ठिकाणी तीनपैकी एका खांबावर कट पॉइंट असल्याने त्याच ठिकाणी बिघाड झाला होता.
बिघाड सापडला, पण तो दुरुस्त करायचा म्हटले, तर चहूबाजूंनी पाण्याने वेढलेल्या खांबापर्यंत जायचे कसे, हा प्रश्न सर्वांसमोर होता. अशावेळी योगेश वाघ पुढे आले. सुरक्षेची पुरेपूर काळजी घेत दोर कमरेला बांधून खांबापर्यंतचे अंतर सराईतपणे पोहून जात वाघ यांनी बिघाड दुरुस्त केला. त्यानंतर वावी व पाथरे येथील उपकेंद्रांचा तब्बल सहा तासांपासून खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला.
सहकाऱ्यांनी दिले प्रोत्साहन...
सूरज लासुरे, आरिफ कादरी, संजय जगताप, आनंदा कुटे, सुभाष कुटे, मणीराम चव्हाण, हेमंत गवळी, प्रशांत नाटे, अक्षय खुळे या कर्मचाऱ्यांनी वाघ यांना प्रोत्साहन दिले. कक्ष अभियंता अजय सावळे व हर्षल मांडगे या अधिकाऱ्यांनी देखील सर्वांच्या मदतीने त्याच्या सुरक्षेची आवश्यक काळजी घेतली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.