ॲग्रोवन वृत्तसेवा
Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यात (Marathwada) शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या लक्षात घेऊन त्याची कारणे नेमकी कोणती, त्यावर काय उपाय योजायला हव्यात हे शासनाला सुचविण्यासाठी विभागीय आयुक्तालयाच्या माध्यमातून सर्वेक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या सर्वेक्षणातून अनेक गंभीर बाबी समोर येत आहेत. साधारणत: आणखी महिनाभर ही मोहीम चालणार असून, त्यानंतर शासनाला सविस्तर उपाययोजनात्मक अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांनी दिली.
कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांमुळे शेती व्यवसाय कायम अडचणीत राहतो. नैसर्गिक आपत्ती आली तर पिकत नाही, पिकले तर खर्चाला परवडेल अशा दरात विकले जात नाही.
त्यामुळे कुटुंबाचा चरितार्थ भागवण्यासह मुलांचे शिक्षण, आरोग्य, विवाह व इतर आवश्यक गरजा पूर्ण करताना शेतकरी कुटुंबातील कर्त्या व्यक्तींची मोठी घालमेल होते.
आपली परवड थांबविण्यासाठी ज्या शेती उद्योगावर शेतकरी निर्भर आहे तो शेती उद्योग त्यावरील संकटामुळे आधार देत नसल्याने परिस्थिती समोर हतबल ठरतो व कर्त्या व्यक्तीला टोकाचा निर्णय घेण्यास बाध्य करीत असल्याचे अनेक उदाहरणावरून पुढे आले आहे.
त्यामुळे या अतिगंभीर विषयावर मार्ग काढण्याच्या हेतून विभागीय आयुक्तालयाने सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे.
याविषयी विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर म्हणाले, की शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या चिंतेचा व गंभीर विषय आहे. त्याची नेमकी कारणे कोणती त्यावर काय उपाय करायला हवे याची शहानिशा करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी शेतकरी कुटुंबांच्या सर्वेक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली.
आतापर्यंत जवळपास ५ लाख शेतकरी कुटुंबांपर्यंत प्रशासनाच्या माध्यमातून पोहोचता आले. २१ लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. येत्या महिन्याभरात हे सर्वेक्षणाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. पूर्वी ऑफलाइन होणारे सर्वेक्षण आता ॲपच्या माध्यमातून गतीने होत आहे.
त्यामधून विचारले जाणारे प्रश्न व मानसिक स्थितीच्या सर्वेक्षणातून आत्महत्यासारख्या टोकाचा निर्णयापर्यंत पोहोचणाऱ्या शेतकरी कुटुंबातील व्यक्तींची सविस्तर माहिती अधोरेखित होते आहे.
असे लक्षात आले की त्या व्यक्तीशी थेट व तत्परतेने संवाद करून त्यांचे समुपदेशन केले जाते आहे. आत्महत्या होण्यामागची कारणे अनेक सांगितली जात असली, तरी आर्थिक कारण हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रकर्षाने जाणवते.
अलीकडच्या काही काळात मराठवाड्यात दर दिवसाला दोन शेतकरी आत्महत्या होत असल्याची बाब पुढे आली होती जी चिंतेत भर टाकणारी आहे.
कोणत्याही पिकाच्या उत्पन्नात वाढ होत नाही, परंतु उत्पादन खर्चात मात्र मोठी वाढ होत आहे. त्याची नेमकी कारणे शोधण्याचा प्रयत्न सर्वेक्षणातून केला जातो आहे. अनेक धक्कादायक बाबी यामधून पुढे येत आहेत.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय करावे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्वेक्षण सुरू असल्याचे विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर यांनी स्पष्ट केले.
प्रति एकरी १० हजार मदत द्यावी : केंद्रेकर
संभाव्य उपायांबाबत श्री. केंद्रेकर म्हणाले, की शेतकऱ्यांना प्रति हंगाम एकरी १० हजार रुपये मदत देण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांच्या पहिल्या दोन मुलींना लग्नासाठी मदत द्यावी. शेत रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण करून देणे, शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा आरोग्य विमा उतरविणे.
नदीजोड प्रकल्पातून सिंचन वाढविणे, मार्केट रिफॉर्म्स आदींविषयी भूमिका घेणे. वन्य प्राण्यांपासून होणार नुकसान टाळण्यासाठी ठोस उपाय सुचविणे गरजेचे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.