
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे आज अपघाती निधन (Accidental Death Of Vinayak Mete) झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अकाली निधनाबद्दल सर्वपक्षीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी विनायक मेटे बीडहून मुंबईच्या दिशेने येत होते. रविवारी पहाटे ५ च्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील माडप बोगद्याजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. एका मोठ्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. विनायक मेटे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आले.
मराठवाड्यातील मराठा समाजाचे वजनदार नेते म्हणून मेटे यांची ओळख होती. शिवाजी महाराजांचे स्मारक, मराठा आरक्षण यासारख्या मुद्यांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांच्या निधनामुळे बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. आज संध्याकाळपर्यंत विनायकराव मेटे यांचे पार्थिव बीड येथे त्यांच्या घरी नेण्यात येणार आहे. उद्या सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत शिवसंग्राम भवन या ठिकाणी मेटे यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती शिवसंग्राम कार्यालयाकडून देण्यात आली.
दरम्यान, मेटे यांचा मृत्यू हा अपघात आहे की घातपात, अशी चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चालकाच्या डुलकीमुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता व्यक्त केली होती. तर अपघातानंतर बराच वेळ रुग्णवाहिका न पोहोचणे, आजूबाजूच्या कुणीही मदत न करणे यावरून या घटनेमध्ये घातपाताचा संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.