
Akola News : लम्पी स्कीन आजाराने दगावलेल्या जनावरांच्या मदतीपोटी दाखल प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी १० हजारांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली होती. यावर शुक्रवारी (ता. १६) रात्री पोलिसांनी कारवाई केली. जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्तांसह खासगी व्यक्तीला या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.
तक्रारदाराच्या मालकीची जनावरे ‘लम्पी स्कीन’मुळे दगावली होती. त्यासाठी मदतीचा प्रस्ताव मंजूर करून मोबदला मिळवून देण्यासाठी सहायक आयुक्त प्रवीण राठोड यांनी १० हजार रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. ही रक्कम राठोड यांनी खासगी व्यक्ती राजीव खाडे याच्यामार्फत स्वीकारली. शहरातील तुकाराम चौक परिसरात ८ हजार रुपयांची लाच घेताना त्यांना पकडण्यात आले.
तक्रारदाराच्या दोन जनावरांचा लम्पी स्कीन आजाराने मृत्यू झाला होता. त्यामुळे तक्रारदाराला मदत म्हणून ३२ हजार रुपये लाभ मिळणार होता. हा लाभ मिळवून देण्यासाठी राठोड यांनी १० हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडे मागितली, असे तक्रारीत म्हटले होते. तडजोडीअंती ८ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले.
ही रक्कम खाडे याने स्वीकारली. पोलिसांनी खाडे याच्यासह राठोड यांनाही ताब्यात घेतले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलिस अधीक्षक देविदास घेवारे, अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक शैलेश सपकाळ व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.