
अकोला ः जिल्ह्यात जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टी (Heavy Rain) व पूरस्थितीमुळे शेती व फळपिकांचे तसेच शेतजमिनीचे मोठे नुकसान (Crop Damage Compensation) झालेले आहे. या नुकसानाची भरपाई म्हणून शासनाने १४० कोटी ५० लाख ८३ हजार रुपयांचे अनुदान (Subsidy) मंजूर केले आहे.
त्यापैकी ६१ हजार ६३४ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात सुमारे ६४ कोटी ४० लाख १९ हजार रुपये जमा झाले आहेत. उर्वरित निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून, हा निधी दिवाळीपूर्वीच खात्यात जमा करण्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीपोटी त्यांना भरपाई म्हणून अनुदान मंजूर झाले आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात दिवाळीपूर्वी वितरित व्हावे, यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अरोरा यांनी आढावा घेतला. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सर्व तहसीलदार उपस्थित होते.
या बैठकीत माहिती देण्यात आली की, जून ते ऑगस्ट दरम्यान ९८ हजार ३२१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. एक लाख २० हजार २३९ शेतकऱ्यांना फटका बसला. १,७२४ हेक्टर शेतजमीन खरडून गेलेली आहे. या नुकसानीची भरपाई म्हणून १३४ कोटी चार लाख १८ हजार रुपये अनुदान जिल्ह्याला मिळाले आहे. तर शेतजमीन खरडून गेल्यापोटी ६ कोटी ४६ लाख ६५ हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे.
असे दोन्ही मिळून एक लाख २२ हजार ३६५ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १४० कोटी ५० लाख ८३ हजार रुपये इतके अनुदान आलेले आहे. हे अनुदान तालुका यंत्रणेमार्फत वितरित करण्यात येत असून, १९ ऑक्टोबरपर्यंत १०६ कोटी ११ लाख ६७ हजार रुपयांची देयके कोशागारात सादर झाली आहेत. त्यापैकी ६१ हजार ६३४ शेतकऱ्यांच्या खात्यात ६४ कोटी ४० लाख १९ हजार रुपयांची
रक्कम जमा झाली आहे. उर्वरित रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत. शासनाने दिलेल्या या निधीमुळे शेतकऱ्यांना दिवाळीच्या काळात थोडासा दिलासा मिळणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.