Amravati Farmer News : जून महिन्यात हुलकावणी देणाऱ्या पावसामुळे पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. आता वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना पाण्याची गरज असताना पुन्हा पावसाने खंड दिल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
परिणामी, भातकुली तालुक्यातील ५० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके संकटात सापडली आहेत. त्यातच महावितरणकडून भारनियमन करण्यात येत असल्याने संरक्षित सिंचनालाही खिळ बसली आहे.
जूनमध्ये पावसाने उघडीप दिली होती. परिणामी, जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या कराव्या लागल्या. त्यानंतर जुलैत पाऊस बरसला असला, तरी ऑगस्ट पुन्हा कोरडा गेला.
आता राज्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पाऊस कोसळत असताना भातकुली तालुका मात्र पावसापासून वंचित राहिला आहे. परिणामी, शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. पिके जळू लागली आहेत.
विहिरी आणि कूपनलिकांमध्ये जेमतेम पाणी आहे. या पाण्यावर पिके जगविण्याची शेतकऱ्यांनी धडपड चालविली आहे. मात्र गेल्या आठ दिवसांपासून वीज वितरण कंपनीने पाऊस कमी झाल्याचे कारण देत भारनियमन सुरू केले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचा हा प्रयत्नही अयशस्वी ठरत आहे. एकीकडे पाऊस नाही, तर दुसरीकडे महावितरणने चालविलेल्या खेळ खंडोब्यामुळे शेतकरी जेरीस आले आहेत. परिणामी, भातकुली तालुक्यातील तब्बल ५० हजार हेक्टरवरील पिके धोक्यात आली
आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.