Jalgaon News : तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांची स्थिती नाजूक झाली आहे. खरिपाची पिके करपू लागली आहेत. दरम्यान, रावेर, खानापूर, निंभोरा येथे २० दिवसांपासून पाऊस नसल्याने त्या भागातील खरीप पिकांचे सर्वेक्षण करण्यात येईल.
तालुक्यात कोरडवाहू शेतीची दुरवस्था झाली आहे; तर पावसाअभावी सिंचन असूनही खरिपासह केळी व कपाशीची वाढ खुंटल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.
तालुक्यात २७ जुलैपासून पावसाने दडी मारली आहे. काही भागात कमी प्रमाणात पडला आहे. मात्र २१ दिवसांपेक्षा अधिक दिवस पाऊस न पडलेल्या महसूल मंडळातील खरीप पिकांचे सर्वेक्षण करण्याचे लेखी आदेश आज कृषी विभागाला प्राप्त झाले.
तीन महसूल मंडळांचे सर्वेक्षण
रावेर, निंभोरा २४ दिवस, तर खानापूर येथे २७ जुलै ते १९ ऑगस्ट दरम्यान सलग २१ दिवसांहून अधिक दिवस पाऊस नसल्यामुळे या तीन मंडळात खरीप पिकांच्या स्थितीचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
यात मागील काही वर्षाचे शेती उत्पादन व सद्यस्थितीच्या खरीप पिकांचे नजर अंदाज उत्पादन काढण्यात येईल. ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन असलेला भाग दुष्काळी जाहीर करण्यात येईल.
साडेदहा हजार क्षेत्र बाधित
तालुक्यात ४० हजार १०८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली (बागाईत) क्षेत्र आहे तर १० हजार ५७२ हेक्टर क्षेत्र कोरडवाहू (जिरायत) क्षेत्र आहे. यामुळे पावसाअभावी कोरडवाहू शेतीची स्थिती बिकट झाली आहे तर सिंचनाखाली असलेले कपाशी, केळी या पिकांची वाढ पावसाअभावी खुंटली आहे. अनेक ठिकाणी कपाशीची फुले, पाती गळू लागली आहेत. यामुळे शेती उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार आहे.
तालुका दुष्काळी जाहीर करावा
तालुक्यातील महसूल मंडळात रावेर १९ गावे, खानापूर २३ गावे व निंभोरा ८ गावे समाविष्ट आहेत. या महसूल मंडळातील प्रत्येकी दहा गावांच्या खरीप पिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
तालुक्यातील केळी व कपाशीला सिंचनाद्वारे पाणी देण्यात येत आहे. मात्र पावसाअभावी या पिकांची वाढ खुंटली आहे. यामुळे याचा उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. प्रशासनाने तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे.
पावसाचे प्रमाण कमी
ऑगस्ट व श्रावण महिन्याच्या इतिहासात सरासरीपेक्षा तालुक्यात एकाच महिन्यात ४५ ते ५० टक्के पर्जन्यमान होते. यावर्षी केवळ पाच, सहा टक्वेच पाऊस तालुक्यात झाला आहे. रावेर ४५६, खानापूर ३३९, ऐनपूर ३४४, खिर्डी ३६९, निंभोरा बुद्रुक ३२०, सावदा ३२५, खिरोदा प्रगणे (यावल) ३२४ मि.मी तर तालुक्यात सरासरी ३६७.७१ (५५.०३ टक्के) पाऊस तालुक्यात झाला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.