
Mumbai News : महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय बुधवारी (ता. २८) मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. प्रती कुटुंब प्रतिवर्ष दीड लाख रुपयांवरून पाच लाख रुपयांपर्यंत विमा कवच देण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत १३५६ आजारांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. यामुळे मोठ्या पण खर्चिक शस्त्रक्रियाही मोफत होणार आहेत. राज्यात यापूर्वी केशरी शिधापत्रिका व अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र, यापुढे राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य संरक्षणाचे कवच प्राप्त होणार आहे.
विद्यमान महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत- पंतप्रधान जनआरोग्य या एकात्मिक योजनेत काही बदल करून योजनेचे विस्तारीकरण करून सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. अशाप्रकारे केंद्र व राज्याची एकत्रित योजना राबविणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश झाला आहे.
आयुष्मान भारत-पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रतिवर्ष पाच लाख रुपये आहे. आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गतही आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब प्रतिवर्ष पाच लाख रुपये करण्यात आले आहे.
दोन्ही योजनांचे एकच कार्ड
आयुष्मान भारत-पंतप्रधान जन आरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या एकत्रित अंमलबजावणीमुळे दोन्ही योजनांमध्ये समाविष्ट उपचारांचा लाभ लाभार्थ्याला मिळणार आहे. तसेच दोन्ही योजनांच्या अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपचार घेता येणार आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये ९९६, तर पंतप्रधान जन आरोग्य योजनेमध्ये १२०९ उपचार आहेत. आता दोन्ही योजनांमध्ये उपचारांची संख्या १३५६ एवढी करण्यात आली आहे. महात्मा फुले जन आरोग्य व आयुष्मान भारत- पंतप्रधान जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत रुग्णालयांची संख्या एक हजार एवढी आहे.
मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी साडेचार लाख मर्यादा
मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये उपचार खर्च मर्यादा प्रती रुग्ण २.५ लाख एवढी मर्यादा आहे. ती आता ४.५ लाख रुपये एवढी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सीमाभागातील १० रुग्णालये अतिरिक्त
महात्मा फुले जनआरोग्य योजना ही याआधीच महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागात लागू करून सीमेलगतच्या महाराष्ट्र राज्यातील आठ जिल्ह्यांत १४० व कर्नाटक राज्यातील १० अतिरिक्त रुग्णालये अंगीकृत करण्याचा निर्णय झाला आहे. याव्यतिरिक्त २०० रुग्णालये अंगीकृत करण्यास मान्यता देण्यात आली आहेत.
अपघात विमा योजनेतील उपचारांची संख्या वाढविली
स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेच्या शासन निर्णयातील तरतुदीमध्ये सुधारणा करून रस्ते अपघातासाठीची उपचारांची संख्या ७४ वरून १८४ अशी वाढविण्यात आली आहे.
उपचाराच्या खर्च मर्यादेत ३० हजार रुपयांवरून प्रतिरुग्ण प्रतिअपघात एक लाख रुपयांपर्यंत वाढ केली आहे. या योजनेचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला आहे. यामध्ये राज्याच्या भौगोलिक क्षेत्रातील रस्ते अपघातात जखमी झालेल्या, राज्यातील व देशातील रुग्णांचा समावेश करण्यात आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.