Pune News : राज्याच्या अनेक भागात मॉन्सूनचा पुरेसा पाऊस झालेला नसला, तरी शेतकऱ्यांकडून गेल्या वर्षीच्या तुलनेत कर्ज उचलीचे प्रमाण यंदा चांगले आहे. आतापर्यंत ४७ टक्के कर्ज वितरण झाले आहे. २६ लाख शेतकऱ्यांनी २३ हजार कोटी रुपयांचे पीककर्ज उचलले आहे.
गेल्या खरिपात एकूण ४५ हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट सर्व बॅंकांनी ठेवले होते. तेव्हा मे २०२२ अखेर १६ लाख ४१ हजार शेतकऱ्यांनी १३ हजार ३७५ कोटी रुपये कर्ज उचल केली होती. म्हणजेच ३१ टक्क्यांपर्यंत कर्ज उचल झाली होती. यंदा मात्र जूनच्या पंधरवड्यापर्यंत ४७ टक्के कर्ज उचल झाली आहे.
‘‘खरिपासाठी सर्व बॅंकांनी मिळून एकूण यंदा ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरण करावे. त्याचा लाभ किमान ५० लाख शेतकऱ्यांना मिळण्याचे उद्दिष्ट आम्ही सर्व बॅंकांना दिलेले आहे.
पाऊस लांबलेला असला, तरी उद्दिष्टापैकी निम्मे कर्जवाटप झाले ही समाधानाची आहे. कर्जवाटप वेळेत झाल्यानंतर पाऊस मागेपुढे झाला तरी हाताशी पैसा असल्यास मशागतीचे नियोजन करता येते,’’ अशी माहिती बॅंकिंग सूत्रांनी दिली.
राज्य शासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार २०२३-२४ च्या आर्थिक वर्षाकरिता खरीप व रब्बी हंगाम मिळून एकूण ७१ हजार कोटी रुपयांचे पीककर्ज वितरणाचे नियोजन केले आहे.
या नियोजनानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना २५ हजार कोटी रुपयांच्या आसपास पीककर्ज वितरण करणे अपेक्षित आहे. तसेच व्यापारी, खासगी, लघुवित्त संस्था, ग्रामीण व इतर बँकांनी सर्व मिळून पीककर्जापोटी अंदाजे ४६ हजार कोटी रुपये वितरण करणे अपेक्षित आहे.
खरीप पीककर्ज वितरणात जिल्हा बॅंका उल्लेखनीय काम करी असल्याचे सहकार विभागाचे म्हणणे आहे. जिल्हा बॅंकांनी यंदा २६ लाख शेतकऱ्यांना १७ हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरण करणे अपेक्षित आहे.
त्यापैकी साडेअठरा लाख शेतकऱ्यांना १३ हजार ३८० कोटी रुपये वाटले गेले आहेत. म्हणजेच जिल्हा बॅंकांनी आतापर्यंत उद्दिष्टाच्या ७७ टक्के कर्ज वितरण केले आहे. त्याउलट व्यापारी, राष्ट्रीयीकृत बॅंकांचे कर्ज वितरण ३० टक्के झाले आहे. त्यामुळे या बॅंकांना कर्ज वितरण वाढविण्यासाठी शासनाला सारखा पाठपुरावा करावा लागत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.