
मुंबई : दावोस (स्वित्झर्लंड) येथील जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान (World Economic Council) विविध देशांतील २३ कंपन्यांकडून सुमारे २० हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी दिली. तसेच या करारांमुळे ६६ हजार जणांना रोजगार मिळेल, असा दावाही उद्योगमंत्री देसाई यांनी केला.
विविध गुंतवणूक करारांमध्ये ५५ टक्क्यांहून अधिक गुंतवणूक सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका आणि जपान आदी देशांतील आहे. यामध्ये प्रामुख्याने औषध निर्माण, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, पॅकेजिंग, पेपर पल्प व अन्न प्रक्रिया, स्टील, माहिती तंत्रज्ञान, डेटा सेंटर, लॉजिस्टिक इत्यादी क्षेत्रांचा समावेश आहे.
दावोस येथील महाराष्ट्र लाउंजमध्ये झालेल्या सामंजस्य करारात एकूण ३० हजार ३७९ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. राज्याची अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र २.०’ या उपक्रमाची संकल्पना मांडण्यात आली होती. या उपक्रमांतर्गत एकूण १० आवृत्या आयोजित करण्यात आल्या असून, त्या माध्यमातून आतापर्यंत १२१ सामंजस्य करार झाले. त्यातून राज्यात एकूण २.१५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. याद्वारे सुमारे ४ लाख रोजगार निर्माण होणार होतील, असा विश्वास राज्य सरकारने व्यक्त केला आहे.
दावोस येथे झालेल्या आर्थिक परिषदेत विविध सामंजस्य करारावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंग, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगन, सहमुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. मलिकनेर आदी उपस्थित होते.
महत्त्वाचे सामंजस्य करार
- इंडोरामा कॉर्पोरेशन आणि इंडोकाउंट इंडस्ट्रीज लिमिटेड या सारख्या प्रमुख वस्त्रोद्योग कंपन्या अनुक्रमे नागपूर आणि कोल्हापूर या महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग केंद्रांमध्ये गुंतवणूक करणार आहेत.
- जगातील सर्वांत मोठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर आयटी कंपन्यांपैकी एक मायक्रोसॉफ्ट पुण्यात डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी रक्कम ३ हजार २०० कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे.
- इंडोनेशियातील एक अग्रगण्य लगदा आणि कागद उत्पादक कंपनी आशिया पल्प अँड पेपरची (एपीपी) संस्था सिनर्मास पल्प अँड पेपर प्रायव्हेट लिमिटेड रायगडमध्ये कागद आणि लगदा उत्पादनासाठी १० हजार ५०० कोटींची गुंतवणूक करणार आहे.
- हॅवमोर आइस्क्रीम्स प्रायव्हेट लिमिटेड लिमिटेड पुण्यात आइस्क्रीम तयार करण्यासाठी युनिट सुरू करत असल्याने फूड अँड अॅग्रो प्रोसेसिंगलाही वाव मिळणार आहे. सोनई इटेबल आणि गोयल प्रोटिन्स तेल कंपन्यांचा समावेश आहे..
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.