
Ratnagiri Development Fund ः गावातील विकासकामांना (Rural Development) चालना देण्यासाठी १५ वा वित्त आयोगातून (Finance Commission) थेट ग्रामपंचायतींना निधी (Grampanchyat Fund) मिळवून देण्यात आला आहे. आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्याला २६१ कोटी २२ लाख रुपये प्राप्त झाले आहेत.
प्रत्येक ग्रामपंचायतीने पंचवार्षिक आराखडा तयार केला असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आतापर्यंत ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या तिन्ही यंत्रणांकडून ८१ कोटी ५ लाखांची कामे पूर्ण झाली आहेत.
पंधराव्या वित्तचा पंचवार्षिक आराखडा तयार असून त्यामध्ये समाविष्ट कामे निधी प्राप्त झाल्यानंतर तत्काळ सुरू करण्यात आली आहेत. पावसाळ्याच्या चार महिन्यामध्ये बांधकामांची कामे करताना येत नाहीत.
नोव्हेंबर महिन्यापासून गावागावांतील रस्ते, पाखाड्या, पाणी योजना, इमारत बांधकामाची कामे सुरू झाली असून काही कामे पूर्णही करण्यात यश आले आहे. शैक्षणिक व आरोग्य साहित्यवाटप यासह अन्य गोष्टींवरील खर्च केला जात आहे.
दीड वर्षामध्ये जिल्ह्याला लोकसंख्येनुसार २६१ कोटी २२ लाखांचा निधी प्राप्त झालेला आहे. यामध्ये ८० टक्के ग्रामपंचायतीला तर जिल्हा परिषद व पंचायत समितीला प्रत्येकी दहा टक्के निधी वितरित केलेला आहे.
थेट ग्रामपंचायतीला निधी मिळत असल्याने गावस्तरावर नियोजन करणे शक्य होत आहे. पुढील चार महिन्यात पावसाळ्यापूर्वी विकासकामांचा वेग वाढणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितांमुळे विकासकामांमध्ये अडथळा निर्माण होतो.
भविष्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामध्ये या निधीतील कामे रखडण्याची शक्यता आहे. दरम्यान, पूर्ण झालेल्या कामांची माहिती पाहण्यासाठी ई-ग्राम स्वराज हे अॅप विकसित करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रत्येक राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायतीची माहिती संकलित केली आहे.
५५ ग्रामपंचायतींचा निधी थकला
ग्रामपंचायतींमधील पदाधिकाऱ्यांची मुदत संपुष्टात आल्यानंतर प्रशासक नेमला जातो. अशा ग्रामपंचायतींना १५ वा वित्तचा निधी वितरित केला जात नाही. जिल्ह्यातील ५५ ग्रामपंचायतींचा सुमारे पाच कोटींचा निधी वितरित करणे शिल्लक आहे.
संबंधित ग्रामपंचायतींमधील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून नवीन कार्यकारिणी कार्यान्वित झाली आहे. तरीही हा निधी मिळालेला नसल्याने त्याचा कामांवर परिणाम होत आहे.
जमा-खर्चाचा ताळमेळ
विभाग - जमा - खर्च - शिल्लक
ग्रामपंचायत - २१६ कोटी २२ लाख - ६५ कोटी २३ लाख - १५१ कोटी ४८ लाख
पंचायत समिती - २२ कोटी २५ लाख - १० कोटी २ लाख - १२ कोटी २३ लाख
जिल्हा परिषद - २२ कोटी २५ लाख - ५ कोटी ७८ लाख - १६ कोटी ४६ लाख
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.