यवतमाळ ः आत्महत्या (Farmer Suicide) रोखणार असा दावा राज्य सरकारकडून केला जात असतानाच राळेगाव तालुक्यात ९ महिन्यांत तब्बल २६ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा (26 Farmer Commited Suicide) संपविल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
राज्यात सत्तांतरानंतर भाजप व शिंदे गटाची सत्ता आली. राज्याचा कारभार हाती घेताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करू, अशी घोषणा केली. प्रत्यक्षात आत्महत्या नियंत्रणासाठी कोणत्याच भरीव उपाययोजनांवर भर दिला गेला नाही. परिणामी, आत्महत्यांची धग कायम आहे. एकट्या राळेगाव तालुक्यात गेल्या ९ महिन्यांत २६ शेतकरी आत्महत्यांची नोंद करण्यात आली.
यंदाच्या खरीप हंगामात एक जूनपासून आजवर सुमारे १६ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले. त्यामध्ये १२ जणांनी विषाचा घोट घेतला, तीन गळफास तर एका शेतकऱ्याने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. १ ऑक्टोबर रोजी धानोरा येथे गोविंदराव घोडे या ६४ वर्षीय शेतकऱ्याने कपाशीचे पीक उलटल्याने ४५ हजार रुपयांच्या पीककर्जाची परतफेड कशी करावी या विवंचनेत आत्महत्या केली. संततधार पाऊस, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
त्यापोटी शासनाने मदतनिधी जाहीर केला. त्यानंतरच्या काळात मात्र कृषी आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये इंग्रजी याद्या तयार करण्यावरून चांगलाच कलगीतुरा रंगला. परिणामी मदतनिधीचे वितरण ठप्प झाले. या कारणामुळे देखील शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. राळेगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्या वाढत्या आहेत. त्याची दखल घेत उपविभागीय अधिकारी शैलेश काळे व तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी भेट देत त्यांचे सांत्वन करून धीर देण्याचा प्रयत्न चालविला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.