मुंबई : वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात (Wild Animal Attack) मृतांच्या नातेवाइकांना २० लाख रुपयांची मदत करण्यात येणार असून जखमी आणि पशुहानी (Life Threat To Animal) झाल्यास देण्यात येणाऱ्या मदतीतही मोठी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
या आधी हत्तीमुळे झालेल्या हानीपोटी ५० हजार ते एक लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. राज्यात वाघ, बिबट्या, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, मगर, हत्ती, रानकुत्र्यांच्या हल्ल्यांत अलीकडे मोठी वाढ झाली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना प्राण गमवावा लागला आहे. तसेच अनेकदा गायी, म्हशी, बैल, शेळ्या मेंढ्यांवरही हल्ले होतात. या हल्ल्यांत पशुहानीही होत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास २० लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे.
यापैकी १० लाख रुपये तातडीने धनादेशाद्वारे आणि उर्वरित १० लाख रुपये राष्ट्रीयीकृत बँकेत मुदतबंद ठेव स्वरूपात देण्यात येणार आहे. व्यक्तीला अपंगत्व आल्यास पाच लाख आणि गंभीररीत्या जखमी झाल्यास एक लाख २५ हजार रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात किरकोळ जखमी झाल्यास त्याच्या औषधोपचाराचा खर्च देण्यात येणार आहे. खासगी दवाखान्यात उपचार केल्यास २० हजार रुपयांची मर्यादा घालण्यात आली आहे.
पाळीव प्राण्यांसाठी गाय, म्हैस आणि बैलाचा मृत्यू झाल्यास बाजारभावाच्या ७५ टक्के किंवा ७० हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती देण्यात येणार आहे. तसेच कायमचे अपंगत्व आल्यास बाजारभावाच्या ५० टक्के किंवा १५ हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती, मेंढी, बकरी आणि इतर पशुधनाचा मृत्यू झाल्यास बाजारभावाच्या ७५ टक्के किंवा १५ हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल देण्यात येणार आहे.
पाळीव जनावरांच्या औषधोपचारासाठी खर्च देण्यात येणार आहे. हे औषधोपचार शासकीय किंवा जिल्हा परिषदेच्या पशुचिकित्सालयांमध्ये मोफत करण्यात येतील. खासगी चिकित्सालयांत उपचार केल्यास बाजारभावाच्या २४ टक्के किंवा ५ हजार रुपये यांपैकी जी रक्कम कमी असेल ती अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राच्या आधारे देण्यात यावी.
जीवितहानी झाल्यास यापूर्वी
मिळत होते १५ लाख रुपये
५ लाख रोख
५ लाख पाच वर्ष एफडी
५ लाख १० वर्षे एफडी
जीवितहानी झाल्यास आता मिळणार २० लाख रुपये
१० लाख रुपये तातडीने धनादेश
१० लाख रुपये राष्ट्रीयीकृत
बँकेत एफडी
१० वर्षांकरिता ‘एफडी’
वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची ‘एफडी’ देण्यात येणार आहे. यापैकी १० लाखांची रक्कम मुदतबंद ठेव स्वरूपात देण्यात येणार आहे. यापैकी पाच लाख रुपये पाच वर्षांकरिता आणि पाच लाख १० वर्षांकरिता ठेवण्यात येणार आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.