
Jalgaon Rain Update : मागच्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. दरम्यान जिल्ह्यातील सर्वात मोठे हतनूर धरण साठ्यात मोठी वाढ होत आहे. होणाऱ्या पावसाने पाण्याची आवक वाढली असून, धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आल्याची माहिती पाठबंधारे विभागाने दिली आहे. हे दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून तापी नदीपात्रात १९, ७७९ क्युसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग होत आहे.
दरम्यान तापी नदीपात्रात पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने पाटबंधारे विभागाने नदी पात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याचबरोबर जनावरांनाही पात्रात न सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याचबरोबर पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनाची याकडे नजर असल्याची माहिती सांगण्यात आली.
एकीकडे पूर तर एकीकडे दुष्काळ
जळगाव जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस होत आहे तर काही भागात अद्यापही पाणीटंचाई मिटलेली नाही. ३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीटंचाई निवारणासाठी ७७ गावांमध्ये ८२ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
सध्या जिल्ह्यात जूनमध्ये केवळ ३६.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत ८४.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यंदा निम्मे पर्जन्यमान घटल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस न झाल्याने पाणीटंचाईच्या उपाययोजना सुरूच आहेत. जुलै सुरू झाला, तरीही समाधानकारक पाऊस नसल्याने ३१ गावांत ३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
मुसळधार पावसाची शक्यता
तर, आज जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये आज (ता.१३) ढगांचा गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याकडून सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, वर्धा, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.