Alu Production : अळूच्या पिकाने दिलाय वर्षभर उत्पन्नाचा आधार

पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथील भगवान पगडे यांनी कमी क्षेत्रात अळूची बारमाही शेती यशस्वी केली आहे.
Alu Production
Alu ProductionAgrowon

Pune District News : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका भाताचे आगार आहे. येथील वडगाव शहरापासून हाकेच्या अंतरावर भगवान नारायण पगडे यांची तीन एकर शेती आहे. पावसाळ्यात मुख्य पीक भात असते.

सोबत चिकू, शेवगा, पेरू, आंबा अशी फळपिके तर अंबाडी, भेंडी, करडई, पालक, कोथिंबीर, शेपू अशी भाजीपाला पिके वर्षभर घेणे सुरू असते. गेल्या काही वर्षांपासून पीकबदल केला आहे. त्यात अळू हे पगडे कुटुंबाचे मुख्य पीक बनले आहे. या पिकातून त्यांनी कुटुंबाचे वर्षभराचे आर्थिक गणित बसवले आहे.

बाजारपेठेच्या अभ्यासानुसार नियोजन

गावाजवळच वडगावचा मुख्य बाजार आहे. त्यामुळे या बाजारात कोणत्या भाजीपाल्याची आवक कमी असते याचा अभ्यास पगडे यांनी केला. त्यानुसार अळू हे पीक व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे ठरू शकते हे जाणवले.

त्यानुसार त्यांनी त्याची शेती सुरू केली. दहा ते पंधरा वर्षांपासून त्यांनी या पिकात आता सातत्य जपले आहे. मुलगा दिनेश पीक व्यवस्थापन पाहतो तर विक्रीची जबाबदारी भगवान स्वतः पाहतात.

Alu Production
Vegetable Production : फळबागेला दिली भाजीपाला पिकांची जोड

अळू शेतीतील ठळक बाबी (Alu Farming)

१) पगडे यांनी अर्धा एकर क्षेत्राची निवड करून कोकणी अळूची निवड कली आहे. हा अळू खाताना घशाला त्रास वा जळजळ होत नाही. चवीला चांगला आहे. लागवड सपाट जागेवर २ ते ३ इंच खोल व दोन बाय दोन फूट अंतरावर केली आहे. एकरी अकरा हजार रोपे बसतात. शेतात काढून ठेवलेले कंद पुन्हा वापरण्यात येतात. त्यामुळे नव्याने कंद घेण्याची गरज भासत नाही.

२) पगडे यांच्या अनुभवानुसार एकदा लागवड केल्यानंतर हे पीक तीन ते चार- पाच वर्षे चालते. त्यानंतर जागा बदलून नव्याने लागवड करावी लागते. पाण्याची वर्षभर सोय असेल तर लागवड केव्हाही करता येऊ शकते. मात्र जून ते सप्टेंबर हा अनुकूल हंगाम आहे.

Alu Production
Nashik Vegetable Market : नाशिकमध्ये भाजीपाल्याच्या दरात चढउतार

३) लागवडीसाठी खडकाळ, माळरानाची, पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक असते. दररोज वा किमान एक दिवसाआड पाणी द्यावेच लागते. लागवड करण्यापूर्वी उन्हाळ्यात शेणखत वापरले जाते.

४) पिकाचे व्यवस्थापन तुलनेने कमी त्रासदायक आहे. रोग, किडींचा प्रादुर्भाव फारसा नाही. त्यामुळे कीडनाशकांच्या वापरात व उत्पादन खर्चातही बचत होते.

५) थंडीच्या दिवसात वाढ कमी असते. या काळात फार चांगले उत्पादन मिळत नाही. या काळात शेणखत देणे फायदेशीर ठरते. वर्षाला पाच ते सहा गाड्या शेणखत दिले तरी चालते. त्यामुळे अळू दर्जेदार होतो. साधारणपणे प्रत्येक चार ते पाच दिवसांनी काढणी होते. त्यावेळी मुख्य झाडाच्या बाजूची पाने काढली जातात.

बाजारपेठेतील मागणी

पंचक्रोशीतील अळूचे शेतकरी म्हणून पगडे यांची ओळख तयार झाली आहे. ते सांगतात की अळूला बाराही महिने मागणी असते. त्यातही फेब्रुवारी ते ऑगस्ट या काळात ती अधिक असते. थंडीच्या दिवसात मागणी असली तरी उत्पादन हाती नसते.

पितृ पंधरवडा, लग्नकार्यांचा हंगाम, दशक्रिया विधी, तेरावा या दिवसांच्या निमित्ताने चांगली मागणी असते. मोठी पाने असतील तर पाचची व छोटी पाने असतील तर सहा पानांची गड्डी बांधली जाते.

आठवड्यातील तीन दिवस विविध आठवडी बाजारांत थेट विक्री व्यवस्था तयार केली आहे. त्यानुसार दररोज सरासरी ५० गड्डींची विक्री वडगाव, तळेगाव, कामशेत या ठिकाणी होते. वाहतुकीसाठी दुचाकीचा वापर केला जातो. अळू हे व्यावसायिक पीक कसे होऊ शकते याचा आदर्शच या कुटुंबाने अशा प्रकारे घालून दिला आहे.

Alu Production
मराठवाड्यातील सोयगाव तालुक्यात रुजतोय अळू 

अळू विक्रीचे नियोजन

ठिकाण --- वार

वडगाव -- गुरुवार,

तळेगाव -- रविवार,

कामशेत -- मंगळवार

उलाढाल :

या शेतीत चांगलाच हातखंडा झाल्याने अनेक ग्राहक कायमचे जोडले आहेत. त्यामुळे दरांची घासाघीस न करता ते पगडे यांच्याकडून अळू खरेदी करतात. प्रति गड्डी दहा रुपये असा दर असतो. वीस गुंठ्यातून महिन्याला सुमारे साडेसात हजार पानांचे उत्पादन मिळते.

वर्षाला सुमारे दीड लाख वा त्याहून अधिक उत्पन्न हाती येते. बाराही महिने व्यवसाय अविरत सुरू असल्याने ताजा पैसा हाती येत असतो. दर तीन वर्षांतून कंदाची विक्री प्रति नग दहा रुपये या दराने केली जाते.

Alu Production
Vegetable Farming : एकीच्या बळावर फुललं शिवार...

आर्थिक आधार देण्याची क्षमता

दैनंदिन आहारात अळूच्या वड्या, भाजी, देठापासून सूप असे पदार्थ बनविता येतात. पुणे, पिंपरी-चिचवड व लोणावळा हे भाग जवळ असल्याने ग्राहकांकडून मागणी सातत्याने असते. शेतीचे चांगल्या प्रकारे नियोजन केल्यास नोकरीपेक्षा चांगले उत्पन्न मिळू शकते.

त्यासाठी चिकाटी असणे आवश्यक असून कमी जागेत एका कुटुंबाला हे पीक चांगला आर्थिक आधार देऊ शकते असे पगडे सांगतात.

भाजीपाला लागवडीचे नियोजन

पहिला टप्पा (नोव्हेंबर नंतर) - करडई, पालक, अंबाडी, शेपू, कोथिंबीर,

दुसरा टप्पा (जानेवारीनंतर) - भेंडी, कारले, डांग्या भोपळा, दुधी भोपळा

पुणे ‘मार्केट’मध्ये अळू

पुणे गुलटेकडी मार्केटमध्येही अळूला मोठी मागणी आहे. येथे दररोज सुमारे एक ते दोन टेम्पो आवक असते. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक या भागातून अळू येथे येतो. गड्डीला पाच ते सात रुपयांच्या दरम्यान दर असतो. काहीवेळा त्यात वाढही होते.

मार्केटमध्ये प्रामुख्याने दोन प्रकारचे अळू येतात. लहान आकाराच्या पानांचा अळू वडीसाठी तर मोठ्या आकाराच्या पानांचा अळू हा भाजीसाठी वापरला जातो. हॉटेल व्यावसायिकाकडूनंही त्यास चांगली मागणी असते. त्यामुळे या पिकातून बऱ्यापैकी उलाढाल होत असते.

भगवान नारायण पगडे - ९८८१८४५०११, दिनेश पगडे - ९९२२५६५४८६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com