Pumpkin Market : भोपळ्याला वर्षभर मागणी

Article by Ganesh Kore : भोपळावर्गीय सर्वच प्रकारांना वर्षभर मागणी व आवक राहात असल्याने त्यांचे ‘मार्केट’ नेहमीच चांगले राहते. त्यादृष्टीने बाजारपेठेवर घेतलेला दृष्टिक्षेप.
Pumpkin
PumpkinAgrowon

Pumpkin Farming : भोपळावर्गीय शेतीमालाची मागणी वर्षातील सर्व ऋतूंमध्ये कायम असल्याने शेतकरी ती ओळखून लागवडीचे नियोजन करीत असतात. त्यादृष्टीने विविध बाजारपेठांमध्ये आवकही कायम सुरू असते. पुणे- गुलटेकडी बाजार समितीतही नियमितपणे डांगर (लाल भोपळा) आणि दुधी भोपळ्याची वर्षभर आवक पाहण्यास मिळते.

प्रामुख्याने सोलापूर आणि नगर जिल्ह्यांतून हा भोपळा बाजारपेठेत दाखल होतो. अलीकडील काळात कुटुंबाचा लहान व मोठा आकार अशी गरज व मागणी लक्षात घेऊन त्यानुसार भाजीपाल्याचे वाण विकसित होत आहेत. कलिंगडाचे उदाहरण आपल्यासमोर आहे.संकरित बियाणे विकासाच्या युगात आता मोठ्या आकाराच्या लाल भोपळ्याची जागा लहान आकाराच्या भोपळ्याने घेतली आहे.

Pumpkin
Success Story : माळरान जमिनीवर उभारली ऊसशेतीत यशाची गुढी

लहान डांगराला मागणी

प्रचलित मोठा डांगर आकाराने आणि वजनाने सुमारे ८ किलोपासून ते १०, १२ किलोपर्यंत असतो. घरगुती ग्राहकांनी किरकोळ विक्रेत्यांकडून तो कापून खरेदी करावा लागतो. या खरेदीमध्ये जास्त दर द्यावा लागतो. लहान आकाराचा डांगर तुनलेने स्वस्त, वजनाला ५०० ग्रॅमपर्यंत ते एक किलोच्याआत असतो.

साहजिकच तो घेऊन जाण्यास सुलभ असतो. त्यामुळे गृहिणींकडून त्यास मागणी वाढत आहे. दिसायला आकर्षक व चवीला गोड असतो. त्यावरील ‘क्यूआर कोडिंग’ स्कॅन करून विविध पाककृतींची माहिती गृहिणींना मिळू शकते. किरकोळ विक्रेत्यांना देखील त्याची विक्री करणे सोपे जात असल्याने त्यांच्याकडूनही मागणी वाढली असल्याचे पुणे बाजारपेठेतील अडते स्वप्नील भुजबळ यांनी सांगितले.

भाजीपाला स्टॉलवर कापून फोडी केलेल्या डांगरापेक्षा लहान आकाराच्या पूर्ण डांगराला गृहिणींकडून अधिक पसंती असल्याचेही त्यांनी सांगितले. एका बियाणे कंपनीचे व्यवस्थापक योगेश जाधव म्हणाले, की केवळ आकाराने लहान आणि हाताळण्यास सोपा एवढाच फरक छोट्या व मोठ्या डांगरात आहे. त्याची लागवड हळूहळू वाढत आहे. बाजारात प्रति किलो १४ ते १५ रुपये दराने त्याची विक्री होत आहे. अर्थात, मोठ्या डांगराचा दर देखील हाच आहे.

लाल भोपळ्याची बाजारपेठ

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल भोपळ्याची (मोठ्या आकाराची) आवक प्रामुख्याने कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथून होते. स्थानिक आवकेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, टेंभुर्णी, करमाळा, अक्कलकोट, पुणे जिल्ह्यांतील बारामती, दौंड तसेच छत्रपती संभाजीनगर यांचा समावेश आहे.

लाल भोपळ्याचा हंगाम वर्षभर असला, तरी प्रामुख्याने गणपती उत्सवानंतर आवकेला प्रांरभ होतो. दररोजची सरासरी आवक २५ ते ३० टन असते. दर सरासरी ८ ते १५ रुपये प्रति किलोच्या दरम्यान राहतात. पितृ पंधरवड्यात सर्वाधिक मागणी राहून दर प्रति किलो १२ ते १८ रुपयांपर्यंत असतात.

Pumpkin
Bundle Formation Technology : ऊस पाचट गाठी बांधणी व्यवसायाने दिला रोजगार

दुधी भोपळ्याचे मार्केट

अलीकडील काळात दुधी भोपळ्याचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व देखील वाढत असल्याने त्यालाहीमागणी आहे. या भोपळ्याची दररोज १५ ते २० टन आवक होत असल्याची माहिती बाजार समितीतील ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली. प्रामुख्याने पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध गावांमधून दुधी भोपळा येत आहे.

सध्या प्रति किलो १० ते २० रूपये दर मिळत असून लांबी, वजनानुसार त्यात बदल होतो. ३०० ते ४०० ग्रॅम (लांबी सुमारे २० सेंमी.) भोपळ्याला सरासरी २० रुपये, ७०० ते ८०० ग्रॅम (लांबी २० ते २५ सेंमी) १० ते १२ रुपये तर दीड ते दोन किलो (लांबी २५ ते ३० सेंमी) भोपळ्याला पाच रुपये दर मिळतो.

तीनशे ते चारशे ग्रॅम दुधीला सर्वाधिक मागणी आणि दर मिळतो. वाहतुकीत भोपळ्याला ओरखडे, डाग पडून त्याचा दर्जा खालावू नये यासाठी प्रत्येक भोपळ्याला प्लॅस्टिक पिशवीचे वेष्टण केले जाते. त्यामुळे बाजारात तो ग्राहकांना आकर्षित करतो असे अडतदार सचिन गायकवाड यांनी सांगितले.

मी मागील डिसेंबरमध्ये १० एकरांवर लहान डांगराची लागवड केली असून, सध्या उत्पादन सुरू आहे. पुणे आणि वाशी बाजार समितीत माल विक्रीस पाठवीत आहे. सध्या प्रति किलोला १२ ते १६ रुपये दर मिळत असून आणखी १५ दिवसांनी सर्व हंगामाचा लेखाजोखा समोर आल्यावर एकरी उत्पादन व मिळालेला दर याचा हिशेब करून पिकाचे अर्थकारण व्यवस्थित उमगेल.
योगेश पवार ९५१७७७७१७१, जेजुरी, जि. पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com