Agriculture Success Story: नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील घोटी बुद्रुक येथील आदिवासी, कष्टकरी महिलांनी वूमेन्स पॉवर शेतकरी उत्पादक कंपनीच्या रूपाने स्वतःची ओळख तयार केली आहे. त्यांनी संघर्ष पचवले. आर्थिक नुकसानीचे प्रसंग सोसले. पण हार मानली नाही. एकमेकींना पुढे घेऊन जाण्याची वृत्ती व एकजुटीतून त्यांनी आपले उद्योगविश्व तयार केले. आपल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देत वार्षिक ३० ते ३५ लाखांच्या दरम्यान उलाढालीची मजल मारली. आज त्यांच्या घरी आर्थिक समृद्धी अवतरली असल्याचे चित्र आहे. .नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील घोटी बुद्रुक व परिसरातील महिलांनी एकजूट करून स्थापन केलेली शेतकरी उत्पादक कंपनी सध्या चर्चेत आणि प्रगतीच्या उल्लेखनीय वाटेवर आहे. महिलाशक्तीमध्ये असलेले सामर्थ्यच त्यांनी आपल्या उद्योजकतेच्या बळावर समाजाला दाखवून दिले आहे. खरे तर कंपनीच्या या प्रगतीपर्यंत पोहोचण्याचा प्रवास काही सोपा नव्हता. तो सुरू झाला घोटी बुद्रुकाच्याच मथुरा तानाजी जाधव यांच्यापासून..सन २००६ च्या दरम्यान अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत जगणारे त्यांचे कुटुंब होते. त्या वेळी आलेल्या कठीण प्रसंगाने त्यांच्या मनात नवी जिद्द निर्माण केली. पती ग्रामपंचायत कर्मचारी. महिन्याला तुटपुंजे वेतन, भाडेतत्त्वावरील धर अशा प्रतिकूल परिस्थितीत संसाराचा गाडा सुरू होता. दरम्यान, १३ वर्षांच्या मुलावर आजारपण बेतले. शस्त्रक्रियेसाठी तब्बल अडीच लाख रुपयांचा खर्च आला. संकटसमयी नातेवाइकांनीही साथ दिली नाही. कुटुंब कर्जाच्या विळख्यात अडकले..Goat Farming Business: भूमिहीन, अल्पभूधारक? नव्हे, या तर शेळीपालनातील उद्योजिका .संकटानेच संधीचा दिला मार्गआलेल्या प्रसंगाने खचून न जाता मथुरा यांनी बळ एकवटून उत्पन्नाचा स्रोत शोधण्यास सुरुवात केली. त्यातून अन्नपूर्णा बचत गटाची स्थापना झाली. दहा महिलांकडून दरमहा १०० रुपयांची बचत जमा होऊ लागली. सन २००८ मध्ये नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून दोन लाखांचे कर्ज घेत गटातील महिलांनी म्हैसपालन, शेळीपालन, ब्युटीपार्लर आणि शिवणकाम यासारखे छोटे व्यवसाय सुरू केले. आर्थिक शिस्त पाळत एकही हप्ता न थकवता वेळेवर कर्ज परतफेड केली. बँकेने गटाचा विशेष सन्मानही केला. यातून महिलांचा आत्मविश्वास दृढ झाला..सन २००९ मध्ये मथुरा शिवणकाम करत असताना भर दुपारच्या उन्हात लाकडाची मोळी डोक्यावर घेऊन इगतपुरी भागातीलच आदिवासी महिला त्यांच्याकडे आली. हा भाग भात उत्पादनासाठी व त्यातही हातसडीच्या तांदळासाठी प्रसिद्ध आहे. या महिलेच्या संघर्षाची कहाणी ऐकताना मधुरा यांच्या मनात अशा सर्व महिलांना एकत्र करण्याची व या तांदळाला बाजारपेठ देण्याची कल्पना आली..अन्नपूर्णा नाव सार्थ ठरवलेमधुरा यांनी आपले विचार प्रत्यक्ष कृतीत आणताना आदिवासी महिलांना एकत्र केले. उखळ-मुसळाच्या साह्याने पारंपरिक पद्धतीने हातसडीचा तांदूळ तयार केला. त्यास बाजारपेठ देण्यात यश मिळाले. मग या महिलांनी पिंपळगाव डुकरा येथे भाडेतत्त्वावरील दीड एकरांत सेंद्रिय ऊस लागवड व त्यातून सेंद्रिय गूळ उत्पादन सुरू केले. सन २०११-१२ मध्ये १७ धान्यांपासून थालीपीठ भाजणी, हिरवा कणी मसाला आणि अन्य गावरान उत्पादने बाजारात आणली..उत्पादक ते ग्राहक या थेट विक्री संकल्पनेमुळे गटाचे अर्थकारण सक्षम होत गेले. सन २०२०-२१ मध्ये कोरोनात अनेकांचे रोजगार बुडाले असताना गटाने १५ ते २० स्थानिक महिलांना काम दिले. लॉकडाउन काळातील नियमांचे पालन करीत कुरडया, पापड्या, वडे आदी गावरान पदार्थ निर्मितीचे काम घरातून सुरू ठेवले. दोनशे गरजूंना ४५ दिवस दोन वेळचे जेवण पुरवून ‘अन्नपूर्णा’ हे नाव सार्थ ठरवले..शेतकरी कंपनीची स्थापनासन २०२१ मध्ये शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या मदतीने या महिलांनी वुमेन्स पॉवर शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. प्रत्येकी एक हजार रुपयांचे भागभांडवल जमा करण्यात आले. बाजारपेठेची मागणी, ग्राहकांचा कल लक्षात घेऊन लाकडी घाण्यावरील खाद्यतेल उत्पादन करण्याचा निर्णय घेण्यात आला. घोटी बुद्रुक येथील ओमानंदनगर येथे १० गुंठ्यांत सुमारे ७२ लाख २५ हजार रुपयांचा हा उद्योग २०२४ रोजी महिलादिनी सुरू झाला..नोव्हेंबर २०२४ मध्ये मोठ्या कंपनीची सुमारे एकहजार लिटर तेलाची ऑर्डर मिळाली. दरम्यान समाजकंटकांनी एके रात्री युनिटच्या इमारतीचा पत्रा कापून आत प्रवेश करत तेलाची विल्हेवाट लावली. सुमारे पाच लाखांचा आर्थिक फटका सोसावा लागला. झालेल्या नुकसानीतून हार न मानता मधुरा व सहकारी महिलांनी पुन्हा नवी उभारी घेतली, परिसरात १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले..अहोरात्र कष्ट, सशक्त संघटन, एकमेकींना आपल्यासोबत पुढे घेऊन जाण्याची भावना, आपापसांतील सामंजस्य व विश्वास यांच्या बळावर कंपनी आज एकेक दमदार पाऊल पुढे टाकून आपला विस्तार पावू लागली आहे. मिळत असलेल्या उत्पन्नातून आदिवासी महिला आपले घरदार सजवू लागल्या आहेत. आर्थिक स्वावलंबी झाल्या आहेत. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या कार्याची प्रसंशा केली आहे..Goat Farming: शेळीपालनातून मिळविले आर्थिक स्थैर्य.‘वूमेन्स पॉवर’ कंपनीचे कार्य दृष्टिक्षेपातएकूण २६५ सदस्य. पैकी ४० पुरुष. सर्व सदस्य इगतपुरी तालुक्यातील.कंपनी उभारणीसाठी शासन अनुदान ४३.२५ लाख, बँक कर्ज २१.६३ लाख तर कंपनीचा स्वहिस्सा ७.३७ लाख रुपये.अध्यक्षा मथुरा जाधव यांच्या नेतृत्वाखाली विमल डुकरे, दीपाली सरोदे, सुलोचना भुसेकर, सीमा कर्डक, सावित्री म्हसने, अनिता परदेशी, साधना भगत आणि सुमन घोडे या संचालिका कार्यरत.वीटभट्टीवर मजुरी करणाऱ्या आदिवासी, भूमिहीन, विधवा आणि दिव्यांग महिलांना संचालकपदाची संधी.फूड सेफ्टी विषयक ‘एफएसएसएआय’चे प्रमाणपत्र. जीएसटी नोंदणी, नियमित लेखापरीक्षणप्रयोगशाळेत उत्पादनांची गुणवत्ता तपासणी.मध्यस्थांची साखळी मोडून स्थानिक शेतकऱ्यांकडून थेट कच्च्या मालाची खरेदी.उत्पादने१० आधुनिक स्वयंचलित लाकडी तेलघाणे, मशिनरी शेड आणि १२८ टन क्षमतेचे गोदाम.पिढ्यान् पिढ्या विश्वास असलेला परंपरेचा स्वाद हे ब्रीदवाक्य घेऊन खाद्यतेलांचा ‘नेचर ब्लिस’ हा ब्रँड आकर्षक पॅकिंगधून सादर. शेंगदाणा, सूर्यफूल, खोबरे, जवस, एरंडेल, तीळ, खुरसणी, मोहरी, करडई आणि बदाम आदींपासून तेल उत्पादन.मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आदी शहरांमध्ये पुरवठा. मुंबईतील महालक्ष्मी सरस, नाशिक तसेच प्रदर्शनांमध्ये ४० ते ५० हजारांपासून ते तीन लाखांंच्या दरम्यान होते विक्री..दरवर्षी सुमारे ४० क्विंटलच्या दरम्यान हातसडीच्या तांदळाची विक्री १४० रुपये प्रति किलो या प्रीमियम दराने. तांदळाला मोठी मागणी.हिरव्या मसाल्याची वर्षाला दोन ते तीन क्विंटल विक्री. जात्यावर दळून व चुलीवर भाजून तयार केलेल्या थालीपीठ भाजणी पिठालाही चांगली मागणी.एकूण वार्षिक उलाढाल ३० ते ३५ लाखांच्या आसपास..बाजारातील मोठ्या स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्तेशी तडजोड केली नाही. प्रत्येक आदिवासी भगिनीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे हेच ध्येय ठेवून वाटचाल सुरू आहे.मथुरा जाधव ९१४५७०९७१९ अध्यक्षा, वूमेन्स पॉवर शेतकरी उत्पादक कंपनी.पूर्वी वीटभट्टीवर उन्हातान्हात चिखल तुडवावा लागायचा. वर्षातून सात- आठ महिनेच काम आणि दिवसभराची फक्त २५० रुपये रोजंदारी मिळायची. आता शेतकरी कंपनीमुळे सन्मान वाढला आहे. हक्काच्या उत्पन्नावर घराचे बांधकाम आणि मुलांना उच्चशिक्षित करण्याचे स्वप्न पूर्ण करणे शक्य झाले आहे.सावित्री म्हसने, संचालिका व कर्मचारी.हातसडीच्या तांदूळ विक्रीपासून मी कंपनीसोबत आहे. प्रशिक्षण व तांत्रिक अनुभवातून कंपनीतील यांत्रिकीकरण व देखभाल या जबाबदाऱ्या सांभाळते. शिक्षण अवघे चौथी असताना कंपनीमुळे मला स्वतंत्र ओळख मिळाली. घरी लक्ष्मी आली. स्वतःचे घर झाले. मुले चांगले शिक्षण घेत आहेत.मोहिनी गुरबुडे, भागधारक व कर्मचारी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.