Bhakari Production : भाकरीनिर्मिती व्यवसायाचा तयार केला ब्रॅण्ड

Women Empowerment : धामणेर (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील अमृता मयूर मोरे यांनी ओम साई महिला गृह उद्योगाच्या माध्यमातून ज्वारी आणि बाजरी भाकरीनिर्मितीला सुरुवात केली. सध्या परिसरातील हॉटेल व्यावसायिकांना दररोज ५०० भाकऱ्यांचा पुरवठा केला जातो. सुधारित यंत्रांचा वापर करून त्यांनी भाकरी उत्पादनात वाढ केली आहे. या व्यवसायात त्यांनी चार गरजू महिलांना कायमस्वरूपी रोजगारदेखील दिला आहे.
Bhakari Production
Bhakari ProductionAgrowon

Success Story : धामणेर (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील अमृता मयूर मोरे यांचे शिक्षण बीएस्सीपर्यंत झाले आहे. पती मयूर हे रंगकाम व्यावसायिक आहे. यामुळे कुटुंबात सातत्याने विविध व्यवसायवाढीबद्दल चर्चा होत असते. अमृता यांना शेतीमाल प्रक्रिया उद्योगाची आवड होती. त्यादृष्टीने त्यांनी बाजारपेठेचा अभ्यास सुरू केला.

इंटरनेट तसेच पेपर वाचनातून त्यांनी विविध प्रक्रिया व्यवसायाची माहिती घेण्यात सुरुवात केली. या दरम्यान त्यांना सोलापुरी भाकरी बनवण्याचा व्यवसाय समजला. त्यादृष्टीने त्यांनी प्रक्रिया उद्योगातील व्यावसायिकांकडून माहिती घेतली.

या दरम्यान त्यांना सोलापूर येथील लक्ष्मी बिराजदार यांच्या पापड भाकरीनिर्मिती उद्योगाची माहिती मिळाली. अमृता यांना पापड भाकरी निर्मिती उद्योगाची संकल्पना आवडली. याबाबत त्यांनी पती मयूर, सासू छायाबाई आणि सासरे अशोक मोरे यांच्याशी चर्चा केली. घरच्यांनी देखील भाकरी निर्मिती उद्योगास सुरुवात करण्यासाठी पाठिंबा दिला.

या व्यवसायाची माहिती घेण्यासाठी अमृता यांनी सोलापूर येथे जाऊन प्रत्यक्ष लक्ष्मीताई यांच्याशी व्यवसायाबाबत चर्चा केली. सातारा जिल्ह्यात ज्वारी, बाजरी सहज उपलब्ध होते. तसेच भाकरीला स्थानिक ग्राहकही मिळू शकते हे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी भाकरीनिर्मिती आणि विक्रीच्या अर्थकारणाचा अभ्यास करून हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

Bhakari Production
Bhor Farmer Story : शेतकरी मित्रांच्या प्रयत्नातून गावाला मिळाला तीन कोटींचा रस्ता, पूल

व्यवसायास सुरुवात ः

अमृताताईंनी २०२१ मध्ये श्री ओमसाई महिला गृह उद्योग या नावाने ज्वारी, बाजरी भाकरी निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. यासाठी घराशेजारील छोटी पत्राची योग्य आकारात शेड तयार केली. सुरुवातीस परिसरातील शेतकऱ्यांकडून ज्वारी खरेदी करून घरगुती पातळीवर भाकरी निर्मितीला सुरुवात झाली.

धामणेर गावात सोलापूर भागातील काही महिला वास्तव्यास होत्या. चार महिलांना सोबत घेऊन अमृताताईंनी भाकरी निर्मितीस सुरुवात केली. या महिलांकडून अमृताताई आणि सासू छायाबाई यांनी पापड भाकरी निर्मितीचे धडे घेत त्यापद्धतीने भाकरी करण्यास सुरुवात केली. स्थानिक प्रदर्शनात या भाकरीची जाहिरात करण्यात सुरुवात केली.

गावशिवारात हळूहळू पापड भाकरीस मागणी होऊ लागल्याने उत्साह वाढू लागला. याचबरोबरीने अमृताताईंनी पती आणि सासऱ्यांच्या मदतीने गाव परिसरातील हॉटेल, धाबाचालकांशी संवाद साधून पापड भाकरीची माहिती देण्यास सुरुवात केली.

हॉटेल व्यावसायिकाकडून पापड भाकरीची खरेदी सुरू झाल्याने दिवसाला ४०० भाकऱ्यांची मागणी सुरू झाली. स्थानिक ठिकाणी गरम भाकरी तसेच इतर ठिकाणी पापड भाकरी या प्रमाणे विक्रीचे नियोजन अमृताताईंनी केले.

हॉटेलचालक तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार पापड भाकरी पॅकिंग करून दिली जाते. सध्या ज्वारीची गरम भाकरी १५ रुपये, बाजरीची भाकरी आणि पापड भाकरी दहा रुपये या दराने विक्री केली जात आहे.

Bhakari Production
Farmer Success Story : बांधकाम व्यवसायासोबत मिळवली निर्यातक्षम केळीच्या उत्पादनात ओळख

उद्योगात वाढ ः

पहिली दोन वर्षे अमृताताईंनी भाकरी निर्मितीचा व्यवसाय चार महिलांच्या मदतीने करत होत्या. ज्वारी, बाजरी भाकरीला मागणी वाढल्याने त्यांनी या व्यवसायाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून अमृताताईंनी दहा लाख रुपयांचे कर्ज घेतले.

या कर्जाच्या रकमेतून भाकरी बनविण्याची स्वयंचलित यंत्र, पीठ मळणी यंत्र आणि इतर आवश्यक गोष्टी खरेदी केल्या. पूर्वीच्या पत्र्याच्या शेडचे नूतनीकरण केले. सध्या या व्यवसायास तिसरे वर्ष आहे. यांत्रिकीकरणामुळे भाकरी निर्मितीमधील कष्ट कमी झाले. कमी वेळेत जास्त प्रमाणात भाकरी

निर्मिती सुरू झाली. या यंत्रामुळे दररोज एक हजार भाकरी करता येतात. सध्या मागणीनुसार दररोज ५०० भाकऱ्यांचा पुरवठा परिसरातील हॉटेल व्यावसायिक तसेच ग्राहकांना केला जातो.

स्वयंचलित यंत्रामुळे मजुरांमध्ये बचत झाली तसेच मागणीनुसार वेळेवर भाकरी पुरवठा करणे सोपे जाऊ लागले. स्वतःच्या एक एकर शेतीमध्ये अमृताताई ज्वारी आणि बाजरीची लागवड करतात. येत्या काळात भाकरीच्या बरोबरीने चार प्रकारच्या पापडाच्या निर्मितीचे त्यांनी नियोजन केले आहे.

गुणवत्तेमुळे मागणीत वाढ ः

- स्वतःच्या शेतातील तसेच परिसरातील शेतकऱ्यांना दर्जेदार ज्वारी, बाजरीची खरेदी.

- गरम भाकरीला वर्षभर मागणी, पापड भाकरीस नऊ ते दहा महिने मागणी.

- पापड भाकरी तयार केल्यावर अर्धा तास उन्हामध्ये सुकवली जाते.

- पाच पापड भाकरीचे एक पॅक. पापड भाकरी पॅकिंगमध्ये २५ दिवस टिकते.

- गाव परिसरातील सहा हॉटेलमध्ये दररोज ५०० भाकऱ्यांचा पुरवठा. याचबरोबरीने मुंबईमध्ये पापड भाकरीचा पुरवठा.

- भाकरी विक्रीसाठी ‘ओम साई’ ब्रॅण्ड. व्यवसायातून साधारणपणे २० टक्के नफा शिल्लक.

घरच्यांची साथ मोलाची...

भाकरीनिर्मिती व्यवसायात अमृताताईंना सासूबाई छाया, सासरे अशोक, पती मयूर यांची चांगली मदत आणि मार्गदर्शन मिळाले आहे. याचबरोबरीने तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर जाधव, मंडळ कृषी अधिकारी डी. टी. शिंदे, जिल्हा प्रकल्प समन्वयक आरती साबळे, कृषी पर्यवेक्षक मंगेश कुंभार, कृषी सहायक गणपत गायकवाड यांचे वेळोवेळी सहकार्य मिळते. भरडधान्य कार्यक्रमात आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते दर्जेदार भाकरी उत्पादन व्यवसायाबद्दल अमृताताईंचा प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान करण्यात आला आहे.

संपर्क ः अमृता मोरे, ९७६६३५५९८५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com