Food Industry : युवकाने नावारूपाला आणला प्रक्रिया उद्योग

Processing Industry : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील मयूरेश पुरोहित या कृषी पदव्युत्तर पदवीधारक तरुणाने कोकणातील विविध फळांवर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू केला. आठ वर्षांपासून सातत्य ठेवत सुमारे २१ उत्पादनांच्या निर्मितीपर्यंत उद्योगाचा विस्तार केला आहे.
Food Processing
Food Processing Agrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : आजपासून राज्यात गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात व दिमाखात प्रारंभ होत आहे. कोकणात या उत्सवाच्या निमित्ताने काही हजार कोटींची उलाढाल दरवर्षी होते. या काळात प्रक्रियायुक्त पदार्थांना विशेषतः मोदकांना मोठी मागणी असते. त्या दृष्टीने अनेक प्रक्रिया उद्योजक वैशिष्ट्यपूर्ण मोदकांची निर्मिती करण्यावर भर देत असतात. दापोली येथे मूळ निवास असलेला मयूरेश अरविंद पुरोहित त्यापैकीच प्रक्रिया उद्योगातील तरुण आज नावारूपाला आला आहे. त्याचे बालपण रत्नागिरी येथे गेले, लहानपणापासून त्याला शेतीची आवड होती.

गुरे चरावयास नेण्यापासून ते आंबा, काजू. हळद, मका या माध्यमातून शेतीच्या विविध कामांत तो रमायचा. दुग्धव्यवसायही केला. शेण भरण्यापासून ते गोवऱ्या थापण्याचेही काम केले. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून बीएस्सी हॉर्टिकल्चर ही पदवी घेतली. याच विद्यापीठाच्या रोहा येथील महाविद्यालयातून ‘पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट’ या विषयातून एमएस्सी केले. सहा महिने रत्नागिरी येथे कृषी पणन मंडळासोबत आंबा निर्यात व्यवस्थापन विषयातील नोकरीचा अनुभव घेतला.

Food Processing
Leenseed Food Processing : जवसाचे प्रक्रियायुक्त पदार्थ

थाटला प्रक्रिया उद्योग

मयूरेश यांना नोकरीत रस कधीच नव्हता. आपल्या मुलाने नोकरीपेक्षा फळप्रक्रिया क्षेत्रात काहीतरी करावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. कोकणात आंबा, काजू, आवळा, करवंद, कोकम आदी फळांवर मोठ्या प्रमाणात प्रक्रिया होते. परंतु औषधी गुणधर्माच्या जांभळावर त्या तुलनेत कमी प्रकिया होत नसल्याचे मयूरेश यांच्या लक्षात आले.

जांभूळ ज्यूस, पोळी व बी पावडर यांची निर्मिती करण्याचे त्यांनी ठरवले. दापोली पट्ट्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आकेरी, निरुखे, कुंदे, मालवण, कुडाळ आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जांभूळ उत्पादन होते हे मयूरेश यांना माहीत होते. त्यामुळे कुडाळ येथे स्थलांतरित होऊन तेथेच युनिट सुरू करावे असे ठरवले.

प्रक्रियेतील वाटचाल

कुडाळ ‘एमआयडीसी’ येथे भाडेतत्त्वावर शेड व आवश्यक यंत्रसामग्री घेऊन जांभळावर प्रकिया सुरू केली. अनेक अडचणीही निर्माण झाल्या. परंतु त्यांच्याशी सामना करीत उत्पादनात सातत्य व त्याच्या दर्जावर सर्व लक्ष केंद्रित केले. जांभूळ प्रकियेत आत्मविश्‍वास आल्यानंतर आंबा, फणस, काजू, कोकम, लिंबू आदींवर प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. चार वर्षे प्रचंड मेहनत करीत व्यवसाय स्थिरस्थावर केला.

त्यानंतर याच ‘एमआयडीसी’ आठ गुंठ्यांचा प्लॉट खरेदी केला. याच जागेत सतराशे चौरस फुटांचे शेड उभारले. अशा रीतीने २०२० मध्ये स्वमालकीच्या जागेत प्रकिया उद्योग सुरू करण्याचा महत्त्वाचा टप्पा गाठला. भांडवलासाठी बँकेकडे १७ लाख २० हजार रुपये रकमेचा प्रस्ताव ठेवला होता. त्यातून दोन पल्पर्स, दोन ड्रायर्स, खवा यंत्र, आवळा क्रशर, ज्यूस यंत्र यांसह पॅकिंग यंत्र, डीप फ्रिज, १०० क्रेट आदी सामग्री घेतली.

Food Processing
Ginger Food Processing : आल्यापासून पावडर, मुरंबा, कॅण्डी

उद्योग आला आकारास

आज मयूरेश यांचा प्रकिया उद्योगात आठ वर्षांचा तगडा अनुभव तयार झाला आहे. जांभूळ ज्यूस, पोळी, जांभूळ बी पावडर, आंब्यापासून पोळी, पल्प, आवळ्याचे सरबत, कॅण्डी व मुखवास, कैरी पन्हे, फणसापासून पोळी व भाजी, केळफूल भाजी, कोकम आगळ, अळू भाजी, सांडगी मिरची, अमसूल, गोड कोकम, आले लिंबू सरबत, आदी सुमारे २१ उत्पादनांची निर्मिती केली जाते.

बहुतांश कच्चा माल शेतकऱ्यांकडून तर गरजेनुसार बाजारातून घेण्यात येतो. शंभर ग्रॅम, अर्धा ते एक किलो पॅकिंगमध्ये उत्पादने उपलब्ध केली असून ३०, ८५ रुपयांपासून ते सव्वादोनशे रुपयांपर्यंत त्यांच्या किमती आहेत. ‘रेडी टू कूक’ प्रकारात कोवळ्या फणसाची भाजी, अळू भाजी तर ‘रेडी टू ड्रिंक्र’ प्रकारात यंदापासून कैरी पन्हे सरबत बाजारपेठेत आणले आहे. उद्योगातून सहा स्थानिकांना बारमाही रोजगार दिला आहे. हंगामी याहून अधिक कामगार काम करतात. वडिलांच्या भक्कम पाठबळावर मयूरेश यांना उद्योगाला आकार देणे शक्य झाले आहे.

लाखांची उलाढाल

‘मयूरेश ॲग्रो प्रॉडक्ट’ हे फर्मचे नाव, तर अभिकल्प हा उत्पादनांचा ब्रॅण्ड तयार केला आहे. सन २०२१ मध्ये ३६ लाख, २०२२ मध्ये ५३ लाख तर मागील वर्षी (२०२३) ४५ लाख रुपये उलाढाल करण्यापर्यंत मजल गाठली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, डोंबिवली, कोल्हापूर यांसह दिल्ली, हैदराबाद, गुजरात या ठिकाणी उत्पादने पाठवली जातात. वितरक व किरकोळ विक्रेते नेमले आहेत.

शिवाय उत्पादनांच्या विपणनासाठी विविध ‘सोशल मीडिया’चा वापर करण्यात येतो. सन २०१७ मध्ये सांगली येथील कृषी प्रदर्शनात ३५ हजार रुपयांची विक्री झाली होती. त्या वेळी अनेक विक्रेते संपर्कात आले. डोंबिवली येथील प्रदर्शनात भाग घेतल्याचाही फायदा झाला. जगात आघाडीवर ऑनलाइन विक्री क्षेत्रातील कंपनीमार्फतही मोठ्या प्रमाणात विक्री होते. उत्पादनांचा दर्जा व तत्पर सेवा या बळांवर प्रगती शक्य झाल्याचे मयूरेश सांगतात.

गणपतीसाठी ‘स्पेशल’ मोदक

मयूरेश यांनी आंबा, काजू आणि फणसापासून मोदक तयार केले आहेत. ते बनविताना त्यात कोणतेही कृत्रीम घटक न वापरण्याचे ठरवले. वेगळेपण जपताना मोदकांचा आकार इतरांपेक्षा मोठा ठेवला. तसेच डब्यामध्ये त्याचे आकर्षक पॅकिंग केले. वर्षभरात सुमारे पाचशे ते सहाशे किलोपर्यंत राज्याच्या विविध भागांत विक्री होते.

मयूरेश पुरोहित, ८२७५४३३०७९, ८६९८८९३८७९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com