
चंद्रकांत जाधव
Agriculture Success Story: केऱ्हाळे (जि. जळगाव) येथील प्रयोगशील शेतकरी अमोल पाटील यांनी केळीमध्ये कांदा, झेंडू तसेच तुरीमध्ये मका आदी आंतरपिकांचे प्रयोग केले आहेत. त्यातून मुख्य पिकाचा खर्च कमी करण्याबरोबर अन्य फायदेही मिळवले आहेत. हवामान बदलाच्या संकटातही शेतीतील प्रयोगशीलता टिकविण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे.
जळगाव जिल्ह्यात केऱ्हाळे (ता. रावेर) गाव केळीसाठी प्रसिद्ध आहे. ज्वारी, कापूस, तूर, मका, उडीद, मूग, कांदा आदी पिकांसोबत केळीला चांगले बेवड मिळावे यासाठी तूर लागवडही शिवारात अधिक प्रमाणात दिसून येते. केळीची शेती अनेक वर्षे करीत असल्याने जमीन सुपीकतेकडेही शेतकरी कटाक्ष ठेवतात. जलसाठेही मुबलक आहेत. गावातील अमोल गणेश पाटील प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहेत.
त्यांची ४० एकर बागायती शेती आहे. पाच कूपनलिका, मोठे ट्रॅक्टर, दोन सालगडी, दोन पॉवर टिलर अशी यंत्रणा आहे. प्रत्येकी तीन गाई व म्हशी आहेत. स्लरीच्या माध्यमातून शेण, गोमूत्राचा शेतीत मोठा उपयोग होतो. केळी हे अमोल यांचे मुख्य पीक आहेत. सुमारे २० एकरांत उती संवर्धित रोपांची लागवड ते करतात. पांढरा कांदा, आले, कलिंगड, मका आदी पिकेही असतात.
आंतरपीक पद्धतीचे प्रयोग
सिंचन व्यवस्थापन, यांत्रिकीकरणात अमोल यांनी प्रयोग केलेच. पण आंतरपीक पद्धतीच्या शेतीतही त्यांनी हातखंडा मिळवला आहे. खरिपात तूर पाच एकरांत असते. दहा फूट, त्यानंतर अडीच फूट व त्यानंतर पुन्हा दहा फूट अशा अंतराने ते तूर घेतात. मधल्या जागेत मक्याचे आंतरपीक असते. तुरीची पूर्वहंगामी किंवा बागायती लागवड जूनमध्ये होतो. पाऊस आल्यानंतर जुलैत मका घेतला जातो.
कमी दिवसात येणाऱ्या वाणाची निवड केली जाते. तुरीची टोकण पद्धतीने लागवड होते. त्याचे एकरी दोन किलो तर मक्याचे एकरी तीन किलो बियाणे वापरले जाते. आंतरपीक मका पिकातून सुरुवातीला हिरवा चारा मिळतो. नंतर कापणी, मळणीनंतर कोरडा चाराही मिळतो. एकरी १० ते १२ क्विंटलपर्यंत धान्याचे उत्पादन मिळते. त्यातून तुरीवरील बराच खर्च कमी होऊन हे पीक पुढे बोनस म्हणून हाती येते.
केळी- कांदा पद्धती
केळी- कांदा या पीकपद्धतीच सुरवातीला जून-जुलैमध्ये पांढऱ्या कांद्याची गादीवाफ्यावर लागवड केली जाते. येथील प्रसिद्ध कंपनीसोबत या कांदा शेतीसाठी करार केला आहे. साधारण सप्टेंबरमध्ये पाच बाय पाच फूट अंतरावर केळी लागवड केली जाते. अर्थात, लागवड अंतराची आखणी पूर्वनियोजितच असते. कांद्याची काढणी नोहेंबर- डिसेंबरमध्ये होते. तर केळीची पुढील ऑगस्टमध्ये काढणी सुरू होते.
या पद्धतीतील कांदा पावसाळी असून त्याचे एकरी चार ते पाच टनांपर्यंत उत्पादन मिळते. त्याला किलोला ९ रुपयांपासून ते कमाल ४० रुपयांपर्यंतही दर मिळाला आहे. अमोल सांगतात की कांद्याला गंधकाची आवश्यकता असते. त्याला दिलेले गंधक केळीला मिळून जाते. आंतरपीक असल्याने तण व आंतरमशागतीचा खर्च या समस्या दूर होतात. शिवाय केळी पिकातील सुमारे ३० ते ४० टक्के खर्च कांद्यातून कमी होतो.
केळीतील झेंडू रोखतो सूत्रकृमी
केळी पिकात सूत्रकृमीची समस्या असते. ती रोखण्यासाठी पाच ते सात एकर केळीत झेंडूचे आंतरपीक फायदेशीर ठरल्याचे अमोल सांगतात. अर्थात, बाजारपेठ व दर या बाबी अभ्यासूनच ते हा प्रयोग करतात. पाच ते सात एकर केळी पिकात हा प्रयोग केला जातो. अर्थात या पद्धतीत झेंडू केळीच्या सरींमध्ये घेतला जातो. मे ते जुलै कालावधीत केळीची तर त्यापूर्वी झेंडूची लागवड असते. पाच ते सहा एकरांमध्ये ७० ते ८० क्विंटलपर्यंत झेंडूचे उत्पादन साध्य केले आहे. त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून केळीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. केळीचे एकरी ३० ते ३५ टनांच्या आसपास उत्पादन मिळते.
अन्य प्रयोगशीलता
कांदा व तुरीवर फवारणीसाठी यंत्रणा विकसित केली आहे. यात एक इंची प्लॅस्टिक पाइप, त्यास प्रत्येक १८ इंचांवर नोझल्स जोडले आहेत. बॅटरीचलित दोन पंपांची ऊर्जा दिली आहे. पंप पाठीवर घ्यावे लागतात. दोन मजूर फवारणीचा आडवा दांडा हातात धरून एकसमान गतीने चालतात.अमोल यांनी आपल्या भागात बटाटा पीक लागवडीचाही प्रयोग केला असून, एकरी आठ टन उत्पादन मिळवले आहे.
हवामान केंद्राची उभारणी
अलीकडे हवामानाचा लहरीपणा वाढला आहे. शेतात हवामान केंद्र उभारले आहे. यामुळे सिंचन, फवारण्या, खतांचे व्यवस्थापन सुकर होण्यासह २५ टक्के खर्च कमी झाला आहे. कमी खर्चाची स्वयंचलित ठिबक यंत्रणा विकसित केली आहे. सध्या हळद लागवड केली जात नाही. परंतु ट्रॅक्चरचलित हळद लागवड यंत्रणा व काढणी यंत्रणा अमोल यांनी विकसित केली आहे. त्यातून मजुरी खर्चासह वेळेत बचत करणे शक्य झाले आहे. कांदा लागवडीसाठी बैलजोडीचलित यंत्रात सुधारणा करून ते ट्रॅक्टरचलित करून घेतले आहे.
तज्ज्ञांचे सातत्याने मार्गदर्शन
अमोल यांना काका किशोर पाटील यांचे मार्गदर्शन व मोठे बंधू विकास पाटील यांची साथ आहे. पाल (ता. रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्र, केळी संशोधन केंद्र, कृषी विभाग आदी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या संपर्कात ते सतत असतात. केळी, तूर, कांदा व अन्य पिकांच्या अभ्यासासाठी त्यांनी दाक्षिणात्य भागासह उत्तरेकडेही अभ्यास दौरे केले आहेत. त्यात केरळ येथील केंद्रीय मसाले संशोधन संस्था, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आदींचा समावेश आहे.
अमोल पाटील ९७६४०६९४११
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.