
Agriculture Success Story : सांगलीपासून शंभर किलोमीटरवर जत हा अवर्षणग्रस्त तालुका वसला आहे. येथून पूर्वेला सुमारे पन्नास किलोमीटवर २५ हजार लोकसंख्येचे उमदी गाव आहे. येथून सोलापूर व कर्नाटक राज्याची हद्द तासाच्या अंतरावर आहे. पाच एकरांपासून दहा एकरांच्या पुढे येथे द्राक्ष शेती पाहण्यास मिळते.
तसे पाहायला गेल्यास चाळीस वर्षांपूर्वी गावातील कै. रावसाहेब चव्हाण, कै. मंगल शहा यांनी द्राक्ष शेतीचा श्रीगणेशा केला. त्यांचे यश पाहून इतरांनाही प्रेरणा मिळाली. पुढे पाण्याच्या दुर्भिक्षामुळे शेतकऱ्यांना द्राक्ष बागा काढण्याचीही वेळ आली.
त्या वेळी सांगली जिल्ह्यात इतरत्र द्राक्ष बागेचा विस्तार झाला होता. अशावेळी उमदी भागातील शेतकरी १९९९-२००० कालावधीत पुन्हा या पिकाकडे वळले. सन २००५ मध्ये शासनाच्या शेततळे योजनेचा लाभ मिळून लागवडीस अधिक चालना मिळाली.
बेदाणा निर्मितीकडे कल
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा टेबल ग्रेप्सपेक्षाही बेदाणा निर्मितीकडे कल होता. त्यास १९८४ नंतर अधिक वाव मिळाला. कै. वसंतराव आर्वे, सुभाष आर्वे तसेच अन्य द्राक्ष बागायतदारांनी बेदाणा निर्मिती तंत्रज्ञानावर संशोधन, अभ्यास व प्रयोग केले. त्यानंतर कवठेमहांकाळ तालुक्यातील मिरज-पंढरपूर राज्यमार्गावरील (आताचा रत्नागिरी-नागपूर मार्ग) केरेवाडी, तासगावसह सोलापूर जिल्ह्यातील जुनोनी भागात १९९७ पासून बेदाणा निर्मितीस प्रारंभ झाला. उमदी गावातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी जाऊन बेदाणा निर्मितीचे बारकावे शिकून घेतले. त्यानंतर गावात घरांसमोर बेदाणा निर्मितीचे शेड्स उभारलेले दिसू लागले. आज उमदी गाव बेदाणा निर्मितीसाठी प्रसिद्ध झाले आहे.
इथल्या शेतकऱ्यांकडे जिद्द अफाट. पाण्यासाठी त्यांनी आंदोलने केली. प्रसंगी टॅंकरने पाणी देऊन बागा जगविल्या. बेदाण्यातून चार पैसे मिळू लागले. त्यातून शेततळी खोदली. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी गावात आले. गेल्या वर्षी काही अंशी पाणी मिळाले. परंतु आजही पाण्यासाठी प्रतीक्षा संपलेली नाही.
पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत बेदाणा शेड निर्मितीसाठी प्रकल्पाच्या ३५ टक्के अनुदान दिले जाते. तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम, कृषी सहाय्यक सचिन काटकर यांनी त्यासाठी शेतकऱ्यांना सहकार्य केले आहे. त्यातून ३५ शेतकऱ्यांना शेड उभारणे शक्य झाले आहे. शेतकऱ्यांनी स्व खर्चातूनही बेदाणा प्रतवारीची चौदा तर शासकीय अनुदानातून दोन युनिट्स उभारली आहेत.
गुणवत्तेवर भर
गावातील पिराजी शिंदे, संगप्पा माळी सांगतात, की खरड छाटणी, फळ छाटणीपासून ते द्राक्ष उत्पादन, बेदाणा निर्मितीपर्यंत शेतकरी एकमेकांशी चर्चा करतात. त्यातून बेदाण्याची गुणवत्ता उंचावण्याचा प्रयत्न होतो. बेदाण्यासाठी द्राक्षाची गुणवत्ताही महत्त्वाची ठरते.
त्यादृष्टीने बाग व्यवस्थापन, घड, मण्यांची संख्या, आकार, जाडी यांच्याकडे लक्ष दिले जाते. थॉम्पसन, माणिक चमन आदी वाणांपासून बेदाणा तयार केला जातो. माणिक चमनचे वैशिष्ट्य असे आहे, की मण्याची लांबी ३२ ते ३५ एमएम, जाडी १५ ते १६ एमएम असते. त्यामुळे त्याच्या बेदाण्याची लांबी २२ एमएम आणि जाडी १० एमएम मिळते.
बेदाणा उत्पादन, बाजारपेठ
बेदाणा उत्पादक धर्माण्णा सुरगोंड, महादेव तळ्ळी यांच्या म्हणण्यानुसार गावातील एकूण द्राक्ष शेतीतील ९० टक्के उत्पादन बेदाण्यासाठीच होते. सांगली, तासगाव आणि पंढरपूर या बाजारपेठा आहेत. मागील तीन ते चार वर्षात नैसर्गिक आपत्तीचा फटका बसल्याने बेदाणा उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे.
एकूण बेदाणा उत्पादनापैकी ८० टक्के बेदाणा ए ग्रेडचा असतो. त्यापैकी २० टक्के हा सर्वोत्कृष्ट असून त्यास प्रति किलो २०० रुपयांहून अधिक दर मिळतो. ए ग्रेड बेदाण्यास १५० ते १८० रुपये, तर त्यानंतरच्या ग्रेडसाठी ११० ते १४० रुपयांपर्यंत दर मिळतो. सद्यःस्थितीला प्रतवारीनुसार १६० ते २५० रुपये दर आहे.
दरवर्षी गावात या उद्योगातून सुमारे कोट्यवधींची उलाढाल होते. द्राक्ष शेती जोखमीची. त्यात पाण्यावर अतिरिक्त खर्च होतो. त्यामुळे मिळणाऱ्या उत्पन्नाचा विनियोग शाश्वत पाण्याची सुविधा करणे, कूपनलिका घेणे, बागेचा विकास करणे यासाठी प्रामुख्याने केला जातो. शिवार फेरी, चर्चासत्रे या माध्यमातून शेतकरी प्रगत होताना दिसत आहेत.
उमदी बेदाणा उद्योग- दृष्टिक्षेप
सुमारे तीन हजार एकरावर द्राक्ष शेतीचा विस्तार.
९० टक्के शेतकरी बेदाणा उत्पादनात गुंतलेले.
फेब्रुवारीचा दुसरा आठवडा ते एप्रिलअखेर बेदाणा निर्मिती उद्योग.
अंदाजे दीड हजार बेदाणा शेड्स.
चार किलो द्राक्षापासून तयार होतो एक किलो बेदाणा.
या भागातील सर्वाधिक तापमानामुळे बेदाणा सुकविण्याचा कालावधी कमी लागतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.