Agricultural Success : सांगली जिल्ह्यातील जत हा कायम अवर्षणग्रस्त तालुका म्हणूनच ओळखला जातो. आजही तालुक्याला पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवते. पूर्वी गावातील शेतकरी ऊस पिकवायचे. कमी पाण्यामुळे एकरी उत्पादकताही कमी होती. परंतु दुष्काळाची तीव्रता वाढत गेल्याने ऊस पिकविणे बंद झाले. पुढे खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांवर शेतकऱ्यांची भिस्त सुरु झाली. त्यानंतर कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेत त्यांनी शेततळी घेतली. कूपनलिका, विहिरीचे पाणी शेततळ्यात साठवून ठेऊन त्याचा उन्हाळ्याच्या कठीण काळात उपयोग होऊ लागला. या सिंचनावर उसासह द्राक्षाच्या बागाही फुलू लागल्या. तालुक्यातील खोजनवाडी हे देखील कायम दुष्काळाच्या खाईत असलेले गाव आहे.खरीप हंगामातील पिकांमध्ये गावात उडदाची शेती करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मागील तीन वर्षांचा आढावा घ्यायचे ठरवल्यास या पिकाखाली गावात २०२२-२३ मध्ये २९५ हेक्टर,२३-२४ मध्ये ३२० तर यंदा हे क्षेत्र ३४८ हेक्टर एवढे होते. निंगाप्पा केंपवाड हे गावातील मुख्य उडीद उत्पादक आहेत. त्यांची एकूण सुमारे १४ एकर शेती आहे. मागील पंधरा वर्षांपासून सातत्याने उडीद शेती करून त्यात हातखंडा तयार केला आहे.
शेतीतील कष्ट
निंगाप्पा यांची शेती कोरडवाहू. आर्थिक परिस्थिती बेताची. वडील देखील शेतीच करायचे. पण हाताशी फारसे काही लागायचे नाही. केवळ शेतीवर अवलंबून राहणे शक्य नव्हते. त्यामुळे निंगाप्पा यांनी पस्तीस वर्षांपूर्वीच गाव सोडले. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे रोजगार करून ते उदरनिर्वाह करू लागले. इकडे वडील प्रतिकूल परिस्थितीत शेतीत कष्ट उपसत होते. मध्यंतरी तळ्याकाठी जमीन गेली. पण न खचता हे कुटुंब शेतीत मागे हटले नाही. वेळप्रसंगी कर्ज काढले. विहीर घेतली. पुरेसे पाणी लागले. त्यावर थोडी शेती बागायती झाली. ऊस पिकवला. त्यातून दोन-चार पैसे शिल्लक पडू लागले. पण पुन्हा दुष्काळाच्या भीषण संकटाचा फेरा सुरू झाला. मग मात्र नाइलाजाने ऊस पिकविणे बंद झाले. परिस्थितीमुळे निंगाप्पा यांचा मुलगा विनोद यासही पुरेसे शिक्षण घेता आले नाही. दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे तो वाहतुकीच्या व्यवसायात उतरला. कोरोनाच्या काळात तो बंद करावा लागला. त्यानंतर मात्र या कुटुंबाने जिद्दीने शेतीतच काहीतरी करायचा असा चंग बांधला. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले.
उडीद झाले मुख्य पीक
पाण्यासाठी शेतात कूपनलिका घेतल्या. पाणी कमी होईल तशी त्यांची संख्या वाढवली. आज पाचकूपनलिका असून प्रत्येक कूपनलिकेला पुरेसे पाणी आहे. त्यामुळे दोन वर्षापासून ऊस पिकाकडे केंपवाड कुटुंबाने मोर्चा वळवला आहेत. शेतीची मुख्य जबाबदारी विनोद यांनी घेतली आहे. विनोद सांगतात की मका, ज्वारी हीच आमची पारंपरिक पिके होती. सन २०२२ पासून उसाची जोड दिली. पूर्वी एक-दोन एकरांत उडदाचे पीक असायचे. आता ते मुख्य पीक झाले असून दरवर्षी पाच एकरांपासून ते कमाल आठ एकरांपर्यंत त्याचे क्षेत्र असते. पावसावर अवलंबून हे पीक असल्याने दरवर्षी पावसाच्या स्थितीनुसार क्षेत्र राहते. मागील वर्षी तीन एकर तर यंदा ते सहा एकरांवर आहे. शेतीत वडिलांसह आई दोडवा, पत्नी प्रियांका यांचाही मोलाचा सहभाग लाभतो. त्यामुळे कष्ट हलके होऊन जातात. मजुरी व उत्पादन खर्चात बचत होते.
उडीद शेतीतील नियोजन
रोहिणी नक्षत्राचा पाऊस झाल्यानंतर १० दिवसांत पेरणी होते. पूर्वी घरच्या बियाणांचा वापर केला जायचा. त्यामुळे उत्पादन व आर्थिक ताळमेळही फारसा लागत नसे. आता कृषी विभागाकडून२५ टक्के अनुदानातून बियाणे मिळते. एकरी चार किलो बियाणे लागते. ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे पेरणीहोते. दोन ओळीत १८ इंच तर दोन बियाणांतील अंतर चार इंच ठेवले जाते. पेरणीवेळी युरिया व डीएपी यांचा वापर होतो. या पिकात तण काढणी व्यतिरिक्त फवारणी किंवा बाकी फारशी कामे करण्याची गरज भासत नाही. पीक फुलोरावस्थेत आल्यानंतर टॉनिक, एखादे कीटकनाशक किंवा बुरशीनाशक व ०-५२-३४ आदींची गरजेनुसार फवारणी घेतली जाते. यामुळे फूलकळी चांगली मिळून शेंगांची संख्या अधिक मिळते.
आश्वासक उत्पादन
पाऊसमान व हवामान बऱ्यापैकी राहिल्यास एकरी अडीच ते पाच व काही प्रसंगी सहा क्विंटलच्या दरम्यान उत्पादन मिळते. उत्पादन खर्च एकरी सुमारे सात हजार ते नऊ हजारांच्या दरम्यान होतो. उडदाची शेती निसर्गावरच अवलंबून असल्याने हवेतील आर्द्रता, ऊन मानवते. जास्त पाऊस किंवा कमी पाऊसही चालत नाही. असे झाल्यास उडीद काही प्रमाणात पांढरे पडतात. यामुळे अपेक्षित दर मिळत नाही. पूर्वी बडवून मळणी केली जायची. आता ती यंत्राद्वारे केली जाते.
फायदेशीर ठरलेले उडीद पीक
एकतर कमी पाण्यावर येणारे म्हणूनही उडीद फायदेशीर ठरले आहे. शिवाय तीन-साडेतीन महिन्यांत निघून जाणारे असल्याने रब्बीत ज्वारी किंवा हरभऱ्याचे पीक वेळेवर घेता येते. यात धान्याबरोबर कडबादेखील हाती लागतो. घरची सहा जनावरे असल्याने ही पीकपद्धती फायदेशीर ठरते. ज्वारीत हरभऱ्याचे आंतरपीक घेतले जाते. त्याचेही वेगळे उत्पन्न मिळते. मागील वर्षी सहा एकरांत ज्वारीचे ४० क्विंटलपर्यंत तर हरभऱ्याचे चार एकरांत २२ क्विंटल उत्पादन मिळाले.
विक्री व्यवस्था
उडदासाठी सांगली. जत, सोलापूर, लातूर आणि कर्नाटक राज्यातील चडचण या बाजारपेठा आहेत. काढणी सुरु करण्यापूर्वी गावातील दहा-बारा शेतकरी एकत्र येतात. कोणत्या बाजारपेठेत कसे दर आहेत. याची चाचपणी केली जाते. त्यानुसार विक्रीचे नियोजन केले जाते. गावात खरेदीसाठी व्यापारी देखील येतात. प्रामुख्याने चडचण येथील बाजारपेठ मोठी असल्याने विक्रीला तेथेच मुख्य प्राधान्य देण्यात येते. व्यापाऱ्याकडून बाजारपेठेपेक्षा दोन रुपये अधिक दर देऊ केल्यास जागेवरही विक्री केली जाते. यामुळे वाहतूक, हमाली आदी खर्चही वाचतात.
मागील तीन वर्षांतील उत्पादन (एकरी क्विंटल) व दर रुपये. (प्रति क्विंटल.)
वर्ष उत्पादन दर
२०२१-२२ ७ ६५००
२०२२-२३ ५ ७०००
२०२३-२४ ३ ९०००
विनोद केंपवाड ९७६६४४३८२७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.