
Success Story : सातारा जिल्ह्यात शेतीमाल प्रक्रिया करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. उच्चशिक्षित तरुण शेतीकडे व्यावसायिक पद्धतीने पाहू लागल्याने जिल्ह्यात असे प्रक्रिया व्यवसाय उभे राहत आहेत. यापैकी एक तुषार मोहन निकम. ते बीएस्सी (फिजिक्स) पदवीधर आहेत. सहा एकर शेती आहे.
पुणे येथे त्यांनी काही काळ स्पर्धा परीक्षांचे वर्ग घेतले. कोरोना लॉकडाउन काळात त्यांनी गाव गाठले. त्या वेळी शेतीतच नवे काही करावे असे वाटू लागले. लहानपणापासून शेतीची सवय तर होतीच.
मित्र विशाल भेदूलकर यांच्याकडे मोट्या प्रमाणात शेवग्याची शेती व्हायची. बीदेखील मुबलक प्रमाणात होते. तुषार यांचीही या पिकाबाबत उत्सुकता वाढली. त्यांनी त्याचे वाण, लागवड पद्धत व बाजारपेठ यांचा अधिक अभ्यास सुरू केला.
दरम्यान, राज्यातील प्रगतिशील शेवगा उत्पादक बाळासाहेब मराळे यांचीही शेवगा शेती पाहण्यात आली. मराळे यांना शेवगा निर्यातीचाही अनुभव असून, त्यांनी काही जातीही विकसित केल्या आहेत. त्यांच्याकडूनच मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली.
शेवगा पावडर निर्मितीचे महत्त्व उमगले बार्शी येथून पीकेएम १ व ओडीसी या जातीचे बियाणे आणून तुषार यांनी २० गुंठ्यांत शेवग्याची प्रायोगिक १० बाय ८ फूट अंतरावर लागवड केली. या पिकाबाबत अधिक अभ्यास होत असल्याने शेवग्याच्या पाल्यापासून पावडरनिर्मिती (मोरिंगा पावडर) व त्याचे महत्त्वही समजू लागले.
राजकीय, क्रीडा, सिनेजगत तसेच एकूणच ग्राहकवर्गाकडून या पावडरीला मागणी चांगली असल्याचे समजू लागले. सखोल अभ्यास व बाजारपेठेचे सर्वेक्षण यातून या क्षेत्रात उतरायचे असे तुषार यांनी नक्की केले. निव्वळ पाल्यासाठी घरच्या शेतातही शेवग्याची लागवड केली.
सुरुवातीपासून अभ्यासपूर्वक शेती करत असल्याने पावडरीचे नैसर्गिक गुणधर्म कुठेही कमी होणार नाही याची दक्षता घेतली. सूर्यप्रकाशात पाला सुकविला, तर त्यातील महत्त्वाचे घटक निघून गेले असते. त्यामुळे ४० बाय २० फुटांचे शेडनेट उभारून त्यात पाला सुकविण्याचे ठरविले. शेडवर पत्र्यापेक्षा ताडपत्रीचा वापर केला. रेशीम शेतीप्रमाणे थर तयार केले.एकावेळेस ५०० किलो पाला प्रक्रियेसाठी उपलब्ध होईल असा शेडचा आकार आहे.
पावडर निर्मितीची प्रक्रिया
-शेतातून मजुरांकरवी पाल्याची कापणी होते. पाला व्यवस्थित धुऊन घेतला जातो.
- थर तयार करून पाच दिवस सुकविला जातो. दररोज खाली-वर करून हलवला जातो.
- सहाव्या दिवशी मोठ्या क्षमतेच्या मिक्सरवर पहिले ग्रायंडिंग होते. यातून तयार झालेली पावडर स्टीलच्या डब्यात सात दिवस ठेवली जाते.
- त्यानंतर दुसरे ग्रायंडिंग होते. ही पावडर विक्रीसाठी तयार असते.
-महिन्याला अशा दोन- तीन बॅच होतात.
-या व्यवसायासाठी पाला भरपूर लागतो. सात किलो पाल्यापासून केवळ एक किलो पावडर तयार होते.
त्यामुळे सुमारे ३० शेतकऱ्यांकडून प्रति किलो दहा ते १४ रुपये दराने पाला खरेदी केला जातो.
-शेतकऱ्यांना शेवगा बी देखील दिले जाते. वर्षातून चार ते पाच वेळा पाला कापणी होत असल्याने संबंधित शेतकऱ्यांना एक एकर क्षेत्रातून एक ते सव्वा लाख रुपये मिळण्याची संधी असते.
आधीच तयार केली मार्केटिंग व्यवस्था
व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपले स्पर्धक कोण आहेत, आपला माल कुठे विकला जाऊ शकतो, आपले ग्राहक कोण आहेत याचा पूर्वअभ्यास तुषार यांनी केला होता. पावडरीची गुणवत्ता जपण्याबरोबर उत्पादनाचे पॅकिंगदेखील ग्राहकांचे लक्ष वेधणारे असावे यासाठी कष्ट घेतले. वसई येथून ‘थ्री लेअर पॉलिपाउच आणले.
त्यावर आकर्षक डिझाइन करून शंभर ग्रॅम वजनाच्या पाऊच पॅकिंगचा अर्थ पूर्ण हा ब्रॅण्ड तयार केला. विक्रीवृद्धीसाठी रिटेल क्षेत्रातील प्रसिद्ध ऑनलाइन कंपनीकडेही पावडर उपलब्ध केली आहे. शिवाय ‘ऑफलाइन’, कुरिअर सेवा यांचा योग्य पद्धतीने वापर तुषार करतात. महाराष्ट्र व गोवा या राज्यांसाठी वितरक नेमले आहेत. कर्नाटक, आंध्र पदेश, तेलागंणा येथेही ग्राहकांना पुरवठा केला जात आहे.
झालेली विक्री किलोमध्ये (प्रातिनिधिक)
२०२० - २०० किलो- (कोरोना काळात सहा महिने)
२०२१ व २०२२- प्रत्येकी ८०० किलो
२०२३- ६०० किलो (आतापर्यंत)
व्यवसायातील संधी
शेवग्याच्या पाल्यात प्रथिने, कॅल्शिअम, लोह, ॲटिऑक्सिडंट, तंतुमय घटक आदी घटक भरपूर प्रमाणात असल्याने ग्राहकांकडून मागणी चांगली आहे. केवळ पाला उपलब्धता हीच मुख्य समस्या आहे. व्यवसायवृद्धीचे पुढील प्रयत्नही सुरू आहेत.
बाळासाहेब मराळे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके, अजित जगताप, संजय अभंग, अजित चतुरे, आरती साबळे यांची मदत व मार्गदर्शन तुषार यांना वाटचालीत मिळाले आहे.
संपर्क - तुषार निकम, ७०४०३८३८४६
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.