Team Agrowon
महाराष्ट्रात ८० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र कोरडवाहू आहे. त्यामुळे बऱ्याचशा जमिनी हलक्या आणि नापिक म्हणून पडून आहेत. शेवगा पीक पावसाच्या पाण्यावर येणारे असल्यामुळे अशा जमिनीत शेवगा लाग वड फायदेशीर ठरते.
हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून शेवगा पीक ओळखले जाते. शेवगा झाडांची विशेषतः घराभोवती किंवा शेताच्या बांधावर घरगुती वापरासाठी लागवड केली जाते. शेवग्याचे मूळ, फूल, पाने व साल यांचा वापर आयुर्वेदिक औषध निर्मितीत केला जातो.
बाजारपेठेत शेवग्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आधुनिक तंत्राने शेवग्याची व्यापारी तत्त्वावर लागवड नक्कीच फायदेशीर ठरू शकते.
शेवगा पीक बहुपयोगी असले तरी त्यावर विशेष असे संशोधन झाले नाही. त्यामुळे हे पीक काहीसे दुर्लक्षित राहिलेले आहे. त्यामुळे शेवगा पिकामध्ये फारशा जाती उपलब्ध नाहीत.
लागवडीसाठी शेवगा जातीची निवड करताना शेवग्याच्या शेंगांची लांबी साधारण ५० ते ६० सेंमी असावी. त्यात भरपूर गर असावा. कडवट चव असणाऱ्या शेंगाना जास्त बाजारभाव मिळत नाही. शेंगा काढल्यानंतर त्याचा तजेला २ ते ३ दिवस टिकून राहणे अपेक्षित असते.
बऱ्याच वेळा शेंगा लवकर पोचट होतात. दोन्ही हंगामात भरपूर शेंगा देणारे असे शेवग्याचे झाड निवडून त्याच्या फाटे वापरून लागवड केल्यास चांगले उत्पादन देणारा वाण मिळण्यास मदत होते.
सध्या तमिळनाडू कृषी विश्वविद्यालय, कोइमतूर या संस्थेने कोइमतूर- १, कोइमतूर -२, पी.के.एम.- १ आणि पी. के. एम.-२ या लवकर शेंगा येणारे व भरपूर प्रथिने असलेले वाण प्रसारित केले आहेत. दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ‘कोकण रुचिरा’ हे वाण प्रसारित केले आहे.