
Agriculture Success Story : सेलूपासून आठ किलोमीटरवरील मोरेगाव (जि. परभणी) येथील चव्हाळ परिवाराची गावशिवारात प्रयोगशील शेतकरी कुटुंब म्हणून ख्याती आहे. भगवानराव चव्हाळ यांची चाळीस एकर शेती आहे. सिंचनासाठी दोन विहिरी, दोन कूपनलिका तसेच एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे आहे.
भगवानरावांचे चिरंजीव प्रभाकर यांनी २०१२ मध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून कृषी व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर काही काळ एका कंपनीमध्ये नोकरी केली. परंतु तेथे त्यांचे मन फारसे रमले नाही. त्यामुळे त्यांनी घरची शेती करण्याचा निर्णय घेतला.त्यासोबत सेलू येथे कृषी सेवा सल्ला केंद्र सुरू केले.
प्रभाकर यांचे आजोबा कै. बापूराव चव्हाळ हे शेतीनिष्ठ शेतकरी होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेत प्रभाकर यांनी शेतीमध्ये प्रयोगशीलता जपली आहे. गेल्या दहा वर्षांपासून त्यांनी हळद, आले, मिरची, ढोबळी मिरची, फ्लॉवर, पपई, बिगर हंगामी टरबूज, उन्हाळी हंगामात काकडी, खरबूज आदी पिकांच्या लागवडीवर भर दिला आहे. शेती नियोजनात वडील भगवानराव, आई सौ. सीताबाई, पत्नी सौ. पूजा यांची मदत होते. शेती व्यवस्थापनासाठी तीन सालगडी आहेत. प्रभाकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेतकरी पिकांचे प्रयोग करून चांगले उत्पादन घेत आहेत.
प्रयोगशील शेतीकडे वाटचाल
प्रभाकर चव्हाळ हे भाजीपाला शेतीमध्ये विविध प्रयोग करतात. ठिबक सिंचन पद्धती, मल्चिंग, क्रॉप कव्हर, शेडनेट वापरावर त्यांनी भर दिला आहे. कीड नियंत्रणासाठी सापळा पिके, चिकट सापळा, फळमाशी सापळ्याचा वापर केला जातो. मल्चिंग पेपरमुळे पाण्याची बचत होते. तण नियंत्रण होते. वेलवर्गीय पिकांची तारांनी बांधणी केल्यामुळे पीक उत्पादनात दीड पट वाढ होत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.
प्रभाकर चव्हाळ हे मिश्र पद्धतीने कमी -अधिक कालावधीच्या भाजीपाला पिकांची लागवड करतात. तसेच बिगर हंगामी टरबुजामध्ये मिरची, झेंडूमध्ये फ्लॉवर, खरबुजामध्ये पपई, कोथिंबीर लागवड केली जाते. दसरा-दिवाळी सणानिमित्त बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन दरवर्षी झेंडू लागवडीचे नियोजन असते.
गतवर्षी प्रभाकर चव्हाळ यांनी काटेकोर व्यवस्थापन करून दोन एकरांमध्ये झेंडूचे दर्जेदार उत्पादन घेतले. झेंडूमध्ये कोथिंबीर आणि फ्लॉवरचे आंतरपीक घेत बोनस उत्पन्न मिळविले. २०२४ च्या ऑगस्ट महिन्यात दोन एकरांमध्ये झेंडू लागवड केली.
दोन सऱ्यांमध्ये चार फूट अंतर ठेवले. एकआड एक सरीमध्ये झेंडू आणि फ्लॉवरची लागवड केली. झेंडू लागवड असलेल्या सरीच्या एका बाजूला कोंथिबिरीची टोकण केली. गतवर्षी या भागात ऑक्टोबरमध्ये पाऊस झाला. प्रतिकूल हवामानामुळे रोगाचे प्रमाण वाढले. त्यामुळे झेंडू उत्पादकांचे नुकसान झाले. या काळात चव्हाळ यांनी झेंडूची रोपे बांबूच्या साहाय्याने तारांना बांधली.
रोगाचे वेळेवर नियंत्रण केले. त्यामुळे प्रतिकूल हवामान स्थितीतही अन्य शेतकऱ्यांच्या तुलनेत कमी नुकसान झाले. कोथिंबिरीला प्रति किलो १०० ते १२० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीतून ४० हजार रुपये उत्पन्न मिळाले. दसरा-दिवाळी मिळून ९० क्विंटल झेंडूची विक्री झाली.
थेट शेतातून प्रतिकिलो ५० रुपये दराने व्यापाऱ्यांनी खरेदी केली. परभणी, सेलू, मंठा येथील बाजारात फ्लॉवरची विक्री केली. त्यातून तीन लाख रुपये उत्पन्न मिळाले. कोथिंबिरीच्या उत्पन्नातून झेंडू, फ्लॉवर बियाणे तसेच लागवडीवरचा खर्च निघाला. यंदा हळद पाच एकरावर हळदीची तसेच दोन एकरावर आल्याची लागवड केलेली आहे.
काकडी, खरबूज लागवड
उन्हाळी हंगामातील काकडी, खरबूज या पिकांची दरवर्षी २ ते ३ एकरांवर लागवड असते. रमजान महिन्यात फळांना मागणी असते. त्यादृष्टीने दोन ते अडीच महिने आधी काकडी, खरबुजाची लागवड करतात. दरवर्षी नोव्हेंबर ते जानेवारी या कालवधीत पाच बाय सव्वा फूट अंतरावर मल्चिंगवर खरबूज लागवड केली जाते.
जानेवारी महिन्यात चार एकरांवर लागवड केली असून दोन गादीवाफ्यामध्ये चार फूट अंतर ठेवले आहे. त्यावर मल्चिंग पेपर अंथरला. एकआड एक गादीवाफ्यावर खरबूज आणि पपई लागवड केली आहे. पपईच्या दोन झाडांमध्ये पाच फूट आणि खरबुजाच्या दोन वेलींमध्ये १.२५ फूट अंतर ठेवले आहे. पपईच्या दोन झाडांमध्ये कोथिंबीर लागवड केली आहे.
खरबूज रोपांच्या लागवडीनंतर तिसऱ्या दिवशी विद्राव्य खतांची आळवणी केली. सहाव्या दिवशी कीडनाशकाची फवारणी केली. रोप लागवडीनंतर दहाव्या दिवशी खरबुजावर क्रॉप कव्हर टाकले.लागवडी पासून पुढे २० दिवस क्रॉप कव्हर ठेवले. क्रॉप कव्हरमुळे अति थंडी, धुके तसेच फुलकिडीपासून संरक्षण झाले.
पोषक वातावरण मिळाल्याने रोपांची जोमाने वाढ झाली. शिवाय फवारणीचा खर्च देखील कमी झाला. लागवडीनंतर तिसाव्या दिवशी क्रॉप कव्हर काढून टाकले. गेल्या वर्षी चांगले परागीभवन होत नसल्यामुळे उत्पादनात घट येत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.
परागीभवन व्हावे यासाठी यंदा १ फेब्रुवारी रोजी चार एकरांमध्ये सहा मधमाश्यांच्या पेट्या ठेवल्या. त्यामुळे यंदा चांगली फलधारणा झाली आहे. वेळापत्रकानुसार विद्राव्य खते, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केल्यामुळे खरबूज फळांचा दर्जा उंचावला आहे. खरबुजाचा हंगाम ६० ते ६५ दिवसांचा असतो. पपईचा हंगाम लागवडीपासून आठ महिन्यांनतर सुरू होतो.
खरबुजाचे एकरी १० ते १२ टन उत्पादन मिळते. यंदा काटेकोर व्यवस्थापनामुळे एकरी २० टन उत्पादन अपेक्षित आहे. पपईचे एकरी ४० ते ५० टन उत्पादन मिळते. दिल्ली येथील व्यापारी थेट शेतातून खरबुजाची खरेदी करतात. खरबुजाला सरासरी प्रतिकिलो १८ ते २० रुपये दर मिळतो. पपई विक्रीला ऑगस्ट महिन्यात सुरुवात होते. प्रति किलो १५ ते २० रुपये दर मिळतो.
नवरात्रीच्या काळातील मागणी लक्षात घेऊन दरवर्षी बिगर हंगामी टरबुजाचे उत्पादन घेतले जाते. टरबुजामध्ये मिरची लागवड असते. चांगले बाजारभाव मिळत असतील तर हिरव्या मिरचीची विक्री केली जाते. दर कमी मिळत असतील तर लाल मिरची विकली जाते. वाळवलेली मिरची शीतगृहामध्ये साठवली जाते. बाजारात तेजी आल्यास विक्री केली जाते. वाळविलेल्या लाल मिरचीचे एकरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन मिळते.
बिगर हंगामी टरबूज काढणीनंतर त्याच मल्चिंग पेपरचा वापर करून यंदा दीड एकरावर पाच बाय सव्वा फूट अंतरावर काकडी लागवड केली आहे. बांबू वापर करून तारांची बांधणी केली आहे. लागवडीपासून ४५ दिवसांनी काकडीचे उत्पादन सुरू झाले आहे. एकरी सरासरी २५ ते ३० टन उत्पादन मिळेल अशी आशा आहे. विक्री परिसरातील बाजारपेठेत केली जाते.
- प्रभाकर चव्हाळ ८४८३८८३३३३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.