Soil Health : मातीचे आरोग्य जपल्याचे मिळविले समाधान

Agriculture Fertility : सांगली जिल्ह्यातील लिंगनूर (ता. मिरज) येथील अनिल मगदूम यांनी पंधरा वर्षांपासून सेंद्रिय शेतीचा ध्यास घेतला आहे. उसासह थोड्या थोड्या क्षेत्रात विविध प्रकारच्या भाज्या घेऊन मिश्रपीक पद्धती त्यांनी विकसित केली आहे. थेट विक्री व्यवस्था तयार करून शेतीतील नफा वाढविला आहे. पिकांचे व मातीचे आरोग्य जपल्याचे समाधान त्यांनी मिळविले आहे.
Soil Health
Soil HealthAgrowon
Published on
Updated on

Soil Conservation : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील पूर्व भाग तसा दुष्काळीच. लिंगनूर हे याच पट्ट्यातील गाव. पानमळ्यासाठी हे गाव प्रसिद्ध आहे. मात्र पाण्याच्या टंचाईमुळे बागायती क्षेत्र अत्यल्प आहे. उपलब्ध पाण्यावर पूर्वी शेतकरी कापूस घेत. द्राक्ष बागा हळूहळू उभ्या राहिल्या. ऊस होऊ लागला. सन २००७ च्या दरम्यान गावशिवारात म्हैसाळ योजनेचे पाणी फिरले. शेती बागायती झाली. द्राक्ष, उसाचे क्षेत्र वाढले. तसे पाहायला गेल्यास आजही उन्हाळ्यात पाणीटंचाई तशी जाणवतेच.

मगदूम यांची शेती

गावातील अनिल बाबूराव मगदूम यांची सहा एकर शेती आहेत. बंधू श्रीकांत यांच्यासह ते शेती पाहतात. लहान वयात असतानाच वडिलांचे छत्र हरपले. त्यामुळे शेतीची जबाबदारी आई मालन व दोघा बंधूंवर आली. प्रतिकूल परिस्थितीमुळे शिक्षण घेण्याची इच्छा असताना शिकता आले नाही. प्रपंचाला जोड म्हणून दुधाळ जनावरांचे संगोपन सुरू केले. वडिलांनी शेतीत खूप कष्ट उपसले. तेच संस्कार आमच्यावर झाल्याचे अनिल सांगतात. द्राक्ष शेतीतून कुटुंबाची आर्थिक उन्नती होऊ लागली. पण नैसर्गिक संकटांमुळे दोन वर्षापूर्वी त्याचे क्षेत्र कमी करावे लागले.

सेंद्रिय शेतीची मिळाली दिशा

हा काळ होता सन २००० च्या दरम्यानचा. एका वाहिनीवर सेंद्रिय शेतीचा कार्यक्रम अनिल यांच्या पाहण्यात आला. सेंद्रिय शेतीमुळे मातीचे आरोग्य व सुपीकता राखणे, आरोग्यदायी अन्नाची निर्मिती करणे यासाठी दिशा मिळाली. मग या विषयाची गोडी लागली. अजून अभ्यास सुरू झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील कण्हेरी मठातही सेंद्रिय शेतीचे बारकावे अभ्यासण्यास मिळाले. कृषी विभागाच्या सहकार्याने लखनौ, कोइमतूर आणि सांगली येथील कांचनपूर कृषी विज्ञान केंद्रातही विविध पिकांचे प्रशिक्षण घेता आले. पहिली काही वर्षे सेंद्रिय व रासायनिक अशी एकात्मिक शेती केली. आता अनिल शंभर टक्के सेंद्रिय शेतीवर आले आहेत.

शेतीतील व्यवस्थापन

अनिल सांगतात, की सेंद्रिय शेती करणं तसं सोप नाही हे लक्षात आलं होते. सुरुवातीला जमिनीची सुपीकता वाढविण्यास प्राधान्य दिले. ‘सोशल मीडिया’द्वारेही तंत्रज्ञानाची माहिती घेतली. घरच्या दोन खिलार, दोन गीर गायी व सहा म्हशी या पशुधनाच्या आधारे शेण, गोमूत्रापासून जिवामृत निर्मिती सुरू केली. दशपर्णी अर्क, तसेच ‘वेस्ट डी कंपोजर’ कल्चरपासूनही पुढे सेंद्रिय घटक तयार करण्यास सुरुवात केली. आज ही पद्धत सवयीचा भाग झाला आहे. तीन वर्षांतून एकदा ताग, धैंचा अशी हिरवळीची खते घेतली जातात. पीक फेरपालट केली जाते. सर्व भाजीपाल्यांचे अवशेष मातीच गाडण्यात येतात. जमिनीवर खड्डा पद्धत व बांधीव अशी दोन प्रकारची गांडूळ खत निर्मितीची युनिट्स आहेत.

Soil Health
Soil Conservation : मृदा संवर्धन ही काळाची गरज...

...अशी आहे पीक पद्धती

पंधरा वर्षांपासून सेंद्रिय शेतीत सातत्य ठेवले आहे. सहा एकरांत वर्षभरात २० प्रकारचा भाजीपाला थोड्या थोड्या ओळींत गादीवाफ्यावर (बेड) घेण्यात येतो. दोन बेडमधील अंतर चार फूट ठेवले जाते. पॉली मल्चिंगचा वापर होतो. भेंडी, वारणा, दोडका, पडवळ, दुधी, घोसावळे, कारले, साधी व सिमला मिरची, कोबी, फ्लॉवर, गवार, मुळा, पालक, शेपू, घेवडा, आंबट चुका असे प्रकार असतात. पाऊस, रोग आदी कारणांमुळे एखाद्या प्लॉटचे नुकसानही सोसावे लागते. भाजीच्या प्रकारानुसार व जागेनुसार दोनशे किलोपासून पाचशे, नऊशे किलोपर्यंत प्रत्येक भाजीचे उत्पादन मिळते. टोमॅटोचे टनापर्यंत उत्पादन मिळते. शेताच्या चारही बांधांवर आंबा, चिकू, नारळ, सीताफळ, रामफळ, तूर अशी पिके घेतली आहेत. पाण्याचे व्यवस्थापनही काटेकोर जपले आहे.

थेट विक्री व्यवस्था उभारली

सेंद्रिय शेतीमालाची विक्री व्यवस्था उभी करणे कठीण काम असते. नेहमीच्या व्यापाऱ्यांकडून अपेक्षित दर मिळत नव्हता. अशावेळी २०१५-१६ मध्ये सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथे सेंद्रिय भाजी विक्रीसाठी स्टॉल मिळाला. तेथे इचलकरंजी येथील मित्रासह अनिल आठवड्यातून एकदा भाजीपाला विक्रीस जायचे. सकाळी भाजीपाला काढणी करायची. रात्री चारचाकीतून भाजीपाला घेऊन पहाटेच्या वेळी तिथे पोहोचायचे. विक्री करायची आणि पुन्हा गावी परतायचे हा क्रम सुरू झाला. पण मध्येच कोरोनाचा प्रादुर्भाव झाला अन् बसलेली घडी विस्कटली. पण अनिल हार मानण्यातील नव्हते. प्रयत्न करणाऱ्याला नियती साथ देते असे म्हणतात. शिरोळ (जि. कोल्हापूर) येथील साखर कारखान्याकडून थेट भाजी विक्रीची संधी उपलब्ध झाली. कोरोना काळात या संधीचे सोने केले.

Soil Health
Soil Fertility : मातीच्या सुपीकतेसाठी जैविक घटकांचा योग्य वापर

विक्रीची घडी बसली

सांगली शहरातील बापट मळा परिसरात ‘मॉर्निंग वॉक’ला येणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्या परिसरात शासनाच्या सहकार्यातून थेट विक्रीचा स्टॉल अनिल यांना मिळाला आहे. भल्या पहाटे दुचाकीवरून माल वाहून नेऊन तो दर बुधवारी व शनिवारी ते विक्रीस आणतात. स्टॉल सुरू झाला त्या वेळी ग्राहकांचा फारसा प्रतिसाद नव्हता. पण आता ग्राहक सेंद्रिय, आरोग्यदायी व दर्जेदार माल पाहून ग्राहक तो खरेदी करू लागले. येथे विक्री करून शिल्लक माल सांगली शहरातीलच एका विक्री केंद्राला देण्यात येतो. अशा रीतीने अनिल यांनी आपल्या मालाला हक्काची बाजारपेठ निर्माण केली आहे. प्रति किलो सरासरी ६० ते ८० रुपये व काही वेळा त्याहून अधिक दराने व आठवड्याला सुमारे ८० ते ९० किलो या प्रमाणात भाज्यांची विक्री होते. या पद्धतीतून महिन्याला किंवा प्रति एकर समाधानकारक व शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत अनिल यांनी तयार केला आहे.

मातीचा वाढला सेंद्रिय कर्ब

माझ्या शेतातील मातीत कोठेही शोधा, गांडुळेच दिसतील असे अनिल म्हणतात. पूर्वी त्यांच्या मातीचा सेंद्रिय कर्ब ०.५ टक्का होता. दोन वर्षांपूर्वी केलेल्या माती परीक्षणानुसारतो २.५ टक्क्यांपर्यंत पोहोचला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सेंद्रिय पद्धतीच्या शेतीतून मातीचे आरोग्य जपण्यासह अवशेषमुक्त अन्न उत्पादन घेत आर्थिक प्राप्तीसह मानसिक समाधानही मिळविले असल्याचे अनिल सांगतात.

शेतीत राबते संपूर्ण कुटुंब

वर्षभर विविध भाजीपाला घेणे म्हणजे लावणीपासून ते काढणीपर्यंत सातत्याने मोठा व्याप असतो. खूप कष्ट असतात. पण आई मालन, अनिल यांच्या पत्नी गीता, बंधू श्रीकांत व त्यांची पत्नी शोभा असे कुटुंबातील सर्व सदस्य शेतीत राबून एकमेकांचा भार हलका करतात.

गटाची स्थापना

मगदूम यांच्या सेंद्रिय शेती पद्धतीची प्रेरणा परिसरातील अनेक शेतकऱ्यांना मिळाली आहे. त्यातून २९ शेतकरी एकत्र येत २०२३ मध्ये शिवकृपा सेंद्रिय शेतकरी गटाची आत्मा विभागाकडे नोंदणी झाली आहे. गटाच्या माध्यमातून शेतकरी विविध पिकांचे उत्पादन घेतात. तालुका कृषी अधिकारी मिलिंद निंबाळकर, कृषी सहायक व्ही. ए. गायकवाड यांचे मार्गदर्शन होते. दर गुरुवारी गटाची बैठक होते.त्यातून विविध बाबींवर चर्चा होते.

अनिल मगदूम ७०२०४८४९२६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com