
Rural Women Empowerment: मिरजगाव (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) येथील आश्विनी कुलदीप केदारी यांनी घरची शेती सांभाळत दोन वर्षांपूर्वी घरगुती स्तरावर मसाले निर्मिती सुरू केली. या प्रक्रिया उद्योगाला ‘रानातलं किचन’ असे नाव दिले. सोशल मीडियाच्या माध्यमातून विक्री व्यवस्था उभी केली. अवघी पाच हजारांची गुंतवणूक करून सुरू झालेला हा मसाला व्यवसाय केदारी कुटुंबासाठी आर्थिक समृद्धीचा मार्ग ठरला आहे.
मिरजगाव (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) येथील केदारी हे शेतकरी कुटुंब. कुलदीप, संदीप आणि प्रदीप हे तिघे भाऊ. या सर्वांची सात एकर वडिलोपार्जित शेती. संदीप आणि प्रदीप हे नोकरी करतात आणि कुलदीप शेती पाहतात. दैनंदिन शेतीत कामामध्ये मदत करताना कुलदीप यांच्या पत्नी आश्विनी यांनी दोन वर्षापूर्वी पूरक उद्योग म्हणून घरगुती स्तरावर मसाले निर्मितीला सुरुवात केली. या उद्योगासाठी त्यांना कुटुंबातील सदस्यांची चांगली साथ मिळाली. या प्रक्रिया उद्योगाला त्यांनी ‘रानातलं किचन’ हे नाव दिले. या प्रक्रिया व्यवसायाने आश्विनीताईंच्या जीवनात आर्थिक समृद्धी आणली आहे.
ग्रामीण ‘रेसिपी’ने दाखविला मार्ग
कुलदीप केदारी यांना दैनंदिन शेती व्यवस्थापनात आश्विनीताई मदत करतात. सोशल मीडियाचा छंद असलेल्या कुलदीप यांनी तीन वर्षांपूर्वी स्वतःचे यू-ट्यूब चॅनेल सुरू केले. त्याला ‘रानातलं किचन’ हे नाव दिलं. आश्विनीताई दररोज घरी जेवणासाठी तयार करत असलेल्या वेगवेगळे पदार्थांच्या निर्मितीची (रेसिपी) माहिती कुलदीप स्वतःच्या ‘यू-ट्यूब’ चॅनेलवर पोस्ट करू लागले. ही रेसिपी पाहून अनेक लोक फोन करून माहिती घेऊ लागले, यास प्रतिसाद वाढत गेला. शहरी भागातील महिलांकडून ग्रामीण खाद्य पदार्थांच्या ‘रेसिपी’साठी वापरत असलेले मसाले पुरवठा करण्याची विनंती होऊ लागली अन त्यातून आश्विनीताईंच्या मसाला निर्मिती उद्योगाची सुरुवात झाली. सोशल मीडियामुळे ग्राहकांकडून मसाल्याला मागणी वाढू लागली.
आश्विनीताईंनी वर्षभर यू-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून ग्रामीण मसाल्याची मागणी करणारा ग्राहक तयार केला. मसाल्याची चांगल्या प्रकारे मागणी सुरू झाल्यानंतर त्यांनी सासूबाई मंगलबाई बापू केदारी यांच्या मदतीने मसाले निर्मितीला सुरुवात केली. पहिल्या दिवशी एक ते दोन किलो मसाला विक्री झाली. आता दररोज वीस किलोपेक्षा अधिक मसाल्याची विक्री होते. आश्विनीताई प्रामुख्याने दोन प्रकारचा मिरची मसाला, खडा मसाला, खोबरे, धने यांपासून तयार होणारा मसाला तयार करतात.
सर्वाधिक मागणी असलेला काळा मसाला आणि ग्रामीण भागात सर्वच भाज्यांसाठी लोकप्रिय असलेला बाजरी, फुटाणे, मगज बी, तीळ, हरभरा डाळ, खडा मसाला, मिरचीपासून तयार होणारा येसूर मसाला ग्राहकांच्या अधिक पसंतीत उतरला आहे. याशिवाय धने पावडर, मिरची पावडर, शेंगदाणा चटणी, हळद पावडर निर्मिती केली जाते. सुरुवातीच्या काळात आश्विनीताई परिसरातील कांडप यंत्रावर मसाला तयार करून घेत होत्या. आता दर दिवसाला पन्नास किलो मसाला तयार करण्याची क्षमता असलेले अत्याधुनिक कांडप यंत्र त्यांनी घेतले आहे. केवळ दहा हजारांपासून सुरू झालेल्या या व्यवसायातून आता महिन्याला चार ते पाच लाखांची उलाढाल होत आहे.
शेतकऱ्यांकडून खरेदी
आश्विनीताईंना प्रक्रिया उद्योगासाठी वर्षभरात पाच टनांपर्यंत मिरची तसेच धने, फुटाणे, हळद, बाजरी, तीळ, हरभराडाळ लागते. प्रामुख्याने मिरची, हळद, बाजरी, तीळ, हरभरा डाळीची खरेदी स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांकडून केली जाते. काही घटक शेतकऱ्यांच्याकडून उपलब्ध झाले नाहीत, त्यांची खरेदी बाजारातून केली जाते. केदारी दांपत्य स्वतःच्या शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने कांदा, मिरची, धने उत्पादन घेते. शेतकऱ्यांकडून दर्जेदार शेतीमाल खरेदी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
देशभरात ऑनलाइन विक्री
कुलदीप केदारी यांच्या मदतीने आश्विनीताईंनी सोशल मीडियाच्या मदतीने मसाल्यास देशभरात ऑनलाइन ग्राहक तयार केला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूरसह राज्यातील प्रमुख शहरात तसेच देशातील बहुतांश भागातून मागणी करणाऱ्या ग्राहकांनी मागणीप्रमाणे ऑनलाइन पैसे पाठवल्यानंतर पोस्टातून कुरिअर मार्फत मसाले आणि इतर प्रक्रिया पदार्थ पाठवले जातात.
सध्याच्या काळात काळा मसाला ६५० रुपये किलो, येसूर मसाला ३५० रुपये किलो, मिरची पावडर ४५० रुपये किलो, धने पावडर २५० रुपये किलो, शेंगदाणा चटणी ४०० रुपये किलो, हळद पावडर ३६० रुपये किलो या दराने विक्री होते. काही वर्षांपूर्वी शेतात मजुरी करणाऱ्या आश्विनीताईंनी आता त्यांच्या मसाला प्रक्रिया उद्योगामध्ये चार गरजू महिलांना कायम स्वरूपी रोजगार दिला आहे. देशभरातील ग्राहकांना मागणीनुसार दररोज पोस्टाने कुरिअर पाठवले जाते. आता अनेक ग्राहक शेतामध्ये ग्रामीण जेवणाची मागणी करु लागले आहे. त्यामुळे भविष्यात स्वतःच्या शेतातच कृषी पर्यटन करण्याचा संकल्प केदारी दांपत्याने केला आहे.
दुष्काळी भाग असलेल्या मिरजगाव परिसरात सातत्याने पाणी टंचाई असते. केदारी कुटुंबाच्या एकत्रित जमिनीत कुलदीप केदारी पीक उत्पादन वाढीसाठी सातत्याने अनेक प्रयोग करत असतात. २०१८ मध्ये पीक बदल म्हणून त्यांनी जिरॅनियमची लागवड तसेच तेल निर्मिती प्रकल्प उभारला. मात्र मजूर, पाणीटंचाई आणि तेलाचे पडलेले दर यामुळे जिरॅनियम उत्पादन बंद केले. बाजारपेठेचा अभ्यास करून उपलब्ध पाण्यात टोमॅटो, दुधी भोपळा, वांगी लागवडीचेही त्यांचे नियोजन असते. मजूरटंचाई लक्षात घेऊन त्यांनी तीन एकरांवर केसर आंबा लागवड केली आहे. उर्वरित चार एकरावर कांदा, ज्वारी, बाजरी, धने, मिरची या पिकांची लागवड असते. परिसरातील प्रयोगशील शेतकरी म्हणून कुलदीप यांची ओळख तयार झाली आहे.
- आश्विनी केदारी ९५०३२३१८१८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.