Spices Business : ‘चटका जिभेचा, मसाला आमचा’

Spices Production : २२ वर्षांच्या अनुभवातून संपूर्ण कुटुंबाने मेहनत घेत व गुणवत्ता जपताना दहापर्यंत उत्पादनांच्या निर्मितीतून वर्षाला ५० ते ६० लाखांची उलाढाल करण्यापर्यंत पल्ला गाठला आहे.
Spices Business
Spices Business Agrowon
Published on
Updated on

Homemade Spices Business : दिवाळीच्या काळात घरोघरी फराळ बनविण्यासाठी बाजारपेठांत विविध प्रकारच्या मसाल्यांची मागणी वाढलेली असते. वाडेगाव (जि. अकोला) येथील भास्करराव राहुडकर यांच्या घरीही कित्येक दिवसांपासून दिवाळीची अशीच धामधूम सुरू असल्याचे बघायला मिळाले. अर्थात, ही लगबग आहे. मसाला निर्मितीची. मसाला उद्योगात सुमारे २२ वर्षांपासून कार्यरत असलेले व गुणवत्तापूर्ण उत्पादनात सातत्य ठेवलेले राहुडकर कुटुंब आता उद्योजक म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

उद्योगाचा सुरुवात

अकोला जिल्ह्यातील वाडेगाव हे कागदी लिंबू उत्पादनाचे माहेरघर समजले जाते. या गावशिवारातील लिंबू संपूर्ण भारतभर जातात. लिंबाची मोठी बाजारपेठही येथे असल्याने त्यासाठी गावाची स्वतंत्र ओळखही तयार झाली आहे. याच गावातील भास्कररावांनी सन २००२ मध्ये उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. गावच्या आठवडी बाजारात (रविवारी) एक छोटेसे दुकान थाटून ते मसाले व मसालावर्गीय पदार्थांची विक्री करायचे. त्यातून वाडेगावसह खेड्यापाड्यांतील ग्राहक त्यांनी जोडले.

Spices Business
Spices Industry : मसाले उद्योगात ‘सुजलाम्’ची भरारी

मसाल्यांना असलेली मागणी व बाजारपेठ यांचा आवाका त्यांना अनुभवातून येत गेला. त्यातील संधी पाहत स्वतःच मसाल्यांची निर्मिती करावी असे त्यांना वाटले. त्यातूनच गरम, थंडा मसाला, ग्रेव्ही मसाला असे विविध प्रकार बनविण्यास सुरुवात केली. प्रत्येक मसाल्याला विशिष्ट चव, स्वाद व सुगंध ठेवला. गुणवत्ता कायम राखली. सोबतच मसाला सुपारी, धनिया, हळद पावडर, लोणचे, पापड मसाले अशी उत्पादनांची ‘रेंज’ वाढू लागली. भास्कररावांना पत्नी गीताबाई यांची मोठी साथ मिळाली. त्यातून कष्ट हलके होत गेले.

पुढील पिढीने सांभाळली जबाबदारी

भास्कररावांचा मुलगा शिवा यांनी मुक्त विद्यापीठातून पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांनी काही दिवस स्वतःचा व्यवसायही केला. मात्र घरच्या मसाले उद्योगाची संपूर्ण धुरा त्यांनी पत्नी कांचन यांच्यासह आपल्या खांद्यावर घेतली आहे. दोन कायमस्वरूपी मजूर आहेत. त्याचबरोबर या छोट्याशा गृहोद्योगाने सात ते आठ जणांना वर्षभर रोजगारही मिळवून दिला आहे. संपूर्ण कुटुंब या उद्योगात रमले आहे.

विस्तारलेला व्यवसाय

आजमितीला सुमारे नऊ ते दहा उत्पादनांची निर्मिती केली जाते. महिन्याला गरम मसाला आठ ते १० क्विंटल, थंडा मसाला तीन ते साडेतीन क्विंटल, ग्रेव्ही मसाला एक ते दीड क्विंटल, मसाला सुपारी १५ ते २० किलो, धनिया पावडर एक ते दीड क्विंटल, हळद पावडर ५० ते ६० किलो हंगामात लोणचे मसाला दीड ते दोन क्विंटल, पापड मसाला तीन ते साडेतीन क्विंटल अशी सर्वसाधारण विक्री होते. ग्रेव्ही मसाल्याचा ८०० ते १०० रुपये, तर थंडा मसाल्याचा ३५० ते ५०० रुपये प्रति किलो दराने खप होतो.

इतक्या वर्षांच्या अनुभवातून राहुडकर यांनी एकेक ग्राहक जोडला आहे. टिकवला आहे. सुरुवातीच्या काळात बाजारपेठ मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागले. मात्र आता उत्पादनांच्या ‘मार्केटिंग’साठी फारसे प्रयत्न करावे लागत नाहीत. बहुतांश जागेवरूनच विक्री होते. जिल्ह्यातील अकोला, पातूर, खामगाव, बाळापूर अशा चार-पाच तालुक्यांत व बुलडाणा जिल्ह्यात बाजारपेठ तयार असून ‘आनंद मसाले’ ब्रॅण्डचा उद्योग आता विस्तारत चालला आहे. उद्योगासाठी आवश्‍यक सर्व प्रमाणपत्रेही घेतली आहेत. उत्पादनांचे आकर्षक लेबलही तयार केले आहे.

कच्च्या मालाची शेतकऱ्यांकडून खरेदी

उद्योगासाठी लागणारा कच्चा माल (उदा. धने, हळद) शेतकऱ्यांकडून घेण्यावर भर दिला आहे. गरजेनुसार काही माल बाजारपेठेतून देखील घेण्यात येतो. पातूर तालुक्यातील आदिवासी भागात गोडंबी व्यवसाय घरोघरी केला जातो. याच उत्पादकांकडून मसाल्यांसाठी गोडंबीची खरेदी होते.

Spices Business
Spice Industry : चटणी, मसाला उद्योगातून समृद्धी

‘लक्ष्मी’ आली घरी

एकेकाळी भूमिहीन असलेल्या राहुडकर यांनी मसाले उद्योगातून चांगली उन्नती साधली आहे. घरी लक्ष्मी नांदू लागली आहे. घरात आनंदी वातावरण तयार झाले आहे. याच उद्योगातून आपल्या सर्व मुलांचे शिक्षण, विवाह भास्कररावांनी केले. दोन एकर शेती घेतली. राहत्या घराची दुरुस्ती, रंगरंगोटी केली. राहत्या घराशेजारीच दुसरी जागा घेतली. तेथे विविध यंत्रे घेतली. यात तीन ग्रायंडर्स, पापड, शेवया निर्मिती, लसूण सोलणी आदी यंत्रांचा समावेश आहे. आता यांत्रिक पद्धतीने उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारच्या योजनेतून त्यासाठी कर्जही मिळाले आहे.

गुणवत्ता हेच गमक

एकेकाळी केवळ अडीच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत उद्योगाचा सुरुवात केली होती. आज वर्षाला सुमारे ५० ते ६० लाखांची उलाढाल करण्यापर्यंत पल्ला गाठला आहे. दिवाळी काळात मसाल्यांना मागणी वाढत असल्याने विक्रीची आकडेवारी दुपटीवर जाते. सुरुवातीपासून जपलेली उत्पादनांची गुणवत्ता हेच आपल्या उद्योगातील यशाचे गमक असल्याचे शिवा सांगतात.

कोणत्याही प्रकारचे दुय्यम पदार्थ निर्मितीत वापरले जात नाहीत. उत्पादनांची टॅगलाइन ‘चटका जिभेचा, मसाला आमचा’ अशी ठेवली आहे. ग्राहकांच्या आरोग्याला कुठलीही बाधा येणार नाही अशी काळजी घेतली जाते. दर्जामुळे ग्राहकांची साथ कायम टिकून राहिली असल्याचेही शिवा सांगतात.

शिवा राहुडकर ९८६०२०६७४१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com