Agriculture Management : पाचट व्यवस्थापनातून जमीन झाली सुपीक

Indian Agriculture : सातारा जिल्ह्यातील सैनिक पंरपरा असलेले चिंचनेर संमत निंब (ता. सातारा) हे प्रयोगशील ऊस उत्पादकांचे गाव आहे. सातत्याने ऊस लागवड आणि रासायनिक खतांच्या अनियंत्रित वापराने जमिनीचा पोत खराब होऊ लागल्याने येथील शेतकऱ्यांनी पाचट आच्छादनावर भर दिला
Agriculture
AgricultureAgrowon

Success Story of Agriculture Land Fertile : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर तालुका वगळता सर्वच तालुक्यात उसाची कमी अधिक प्रमाणात लागवड आहे. ऊस तुटल्यानंतर अनेक शेतकरी पाचट पेटवून देत असल्याने सेंद्रिय घटक आणि पर्यावरणाची मोठी हानी होते. उसाला पाणी, रासायनिक खतांच्या अनियंत्रित वापरामुळे जमिनीचा पोत खराब होऊ लागला आहे.

वेळेवर हा धोका ओळखून चिंचनेर गावातील कृषिरत्न आणि श्री जोतिर्लिंग स्वयंसाह्यता गटाने पाचट न जाळता शेतामध्ये कुजविण्यासाठी मोहीम हाती घेतली. या दोन्ही गटांमध्ये ३४ प्रयोगशील शेतकरी सहभागी झाले आहेत. सुरुवातीला काही शेतकऱ्यांनी पाचट व्यवस्थापन करण्यास सुरवात केली.

परंतु हे पाचट लवकर कुजवण्यासाठी काही उपाय केले जात नसल्याने तसेच शेतात राहत होते. यामुळे उंदीर, साप तसेच पाणी देण्यास विलंब लागत होता. यामुळे शेतकरी पाचट आच्छादन करण्यासाठी टाळाटाळ करू लागले. हे लक्षात घेऊन शेतकरी गटांनी कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव यांच्या माध्यमातून पाचट व्यवस्थापनाविषयी शेतीशाळेचे आयोजन केले. या कार्यशाळेत तज्ज्ञांनी पाचट कुजविण्याच्या तंत्राबद्दल प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन केले. त्यामुळे शेतकऱ्यांना चुका लक्षात आल्या.

पाचट व्यवस्थापनाला गती

गावातील सर्व शेतकऱ्यांनी पाचट व्यवस्थापन करावे यासाठी २०२० मध्ये कृषीरत्न आणि श्री जोतिर्लिंग स्वयंसाह्यता गटाने अनोखी शक्कल लढवली. किमान वीस गुंठे क्षेत्रावर पाचट ठेवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना नाममात्र ५० रुपये फी ठेवण्यात आली.

या स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांना पहिले बक्षीस दोघांना विमान प्रवास, दुसरे बक्षीस दोघांना रेल्वे (एसी) प्रवास आणि तिसरे बक्षीस महाबळेश्‍वरमधील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये दोन दिवस मुक्काम अशी बक्षिसे ठेवण्यात आली. या स्पर्धेमध्ये गावातील ३०० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.

यातून शंभरहून अधिक एकर क्षेत्रावर पाचट व्यवस्थापन शेतकऱ्यांकडून करण्यात आले. गटातील दोन शेतकऱ्यांनी टॅक्ट्ररचलित पाचट कुट्टी यंत्रांची खरेदी केली. या यंत्रासाठी कृषी विभागाकडून अनुदान मिळाले. लावणीचा ऊस तुटला की या यंत्राद्वारे पाचटाची कुट्टी केली जाते. त्यानंतर पाचट कुजविण्यासाठी शिफारशीत रासायनिक खत मात्रा, पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धक तसेच वेस्ट डीकंपोझर, जिवामृताच्या वापरावर भर देण्यात आला. याचा चांगला परिणाम दिसून येत आहे.

Agriculture
Agriculture Management : शेतीमध्ये गाळमातीचा योग्य वापर

गटातर्फे पाचट व्यवस्थापन स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांना तत्कालीन जिल्हाधिकारी शेखरसिंह यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील ऊस लागवड क्षेत्राला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले होते. या स्पर्धेमुळे शेतकऱ्यांमध्ये पाचट आच्छादनाबाबत जागृती झाली.

सध्या गावात सुमारे ५०० एकरांहून अधिक ऊस लागवड असून, त्यातील २५० एकरांमध्ये खोडवा क्षेत्र आहे. त्यातील ८० टक्के शेतकरी पाचट आच्छादन करतात. पाचट आच्छादनाचे क्षेत्र वाढल्याने गावातील दोन शेतकऱ्यांनी पाचट कुट्टी यंत्र, खोडकी कटर यंत्र तसेच ऊस भरणीसाठी पॅावरटिलर खरेदी केला आहे.

या यंत्रासाठी कृषी विभागाकडून अनुदान मिळाले आहे. गावातील शेतकऱ्यांना इतरांपेक्षा कमी दराने यांत्रिक कामे करून दिली जातात. गटाचे अध्यक्ष धनाजी डांगे, विजय जाधव तसेच विलास जाधव, दीपक डांगे, विनोद डांगे, मोहन पानस्कर, सुनील जाधव, दीपक जाधव, युवराज किर्दत आदी शेतकरी पाचट आच्छादन उपक्रम सुरू राहावा यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे दरवर्षी पाचट आच्छादनाचे क्षेत्र वाढत आहे.

पाचट आच्छादनाचे नियोजन :

आडसाली लागवडीमध्ये सात ते आठ कांड्यावर ऊस असताना पाचट काढून सरीत आच्छादन केले जाते. सर्व पाचट सरी दाबले जाते. पाचट कुजण्यासाठी एकरी शंभर किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ५० किलो युरिया मिश्रण सरीत टाकले जाते. त्यानंतर पाणी दिले जाते.

ऊस तुटल्यावर कुट्टी यंत्राद्वारे पाचटाची कुट्टी केली जाते. त्यानंतर बुडखे छाटून पाचट काढले जाते. दुसरा पर्याय म्हणजे पाचट कुट्टी केल्यावर पॉवरटिलरने उसाची फोडणी केली जाते. यामुळे पाचट मातीआड होते.

शिफारशीनुसार उसाला रासायनिक खताची बेसल मात्रा दिली जाते. पाचट जलद गतीने कुजण्यासाठी जिवाणू संवर्धक तसेच वेस्ट डीकंपोझरचा वापर केला जातो.

पिकाला दर दहा दिवसांनी पाच वेळा जिवामृत दिले जाते. त्यामुळे पाचट लवकर कुजते. यामुळे जमिनीत उपयुक्त जिवाणू आणि गांडुळांच्या संख्येत वाढ झाली आहे.

Agriculture
Indian Agriculture : खरिपात नको अफवांचे पीक

पाचट आच्छादनाचे फायदे :
पाण्याच्या पाळ्या लांबल्या तरी जमिनीतील ओलावा टिकून रहातो. जमीन भुसभुसीत राहण्यास मदत.

आडसाली उसाचे एकरी ८० टन उत्पादनात सातत्य. खोडवा उसाची एकरी ३० टनांवरून ६० टनांपर्यंत वाढ.

तण नियंत्रण झाल्याने आंतरमशागतीच्या खर्चामध्ये कपात. भांडवली खर्चात बचत.

सेंद्रिय कर्बात वाढ. काही ठिकाणी सेंद्रिय कर्ब ०.९० पर्यंत पोहोचला आहे.

सोयाबीनचे एकरी ८ क्विंटलवरून १४ क्विंटलपर्यंत वाढ.

गावातील ८० टक्के शेतकऱ्यांचा पाचट व्यवस्थापनामध्ये सहभाग.

सोयाबीन बीजोत्पादनाला चालना...

गावात उसानंतर सोयाबीन लागवड मोठ्या प्रमाणात आहे. पाचट जमिनीत मिसळल्याने पोत सुधारला आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादनात वाढ मिळाल्याने येथील शेतकरी गट सोयाबीन बीजोत्पादनाकडे वळले आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या फुले संगम, फुले दूर्वा, फुले किमया या जातींचे ५० एकर क्षेत्रावर बीजोत्पादन केले जाते. गटाच्या नावाने पॅकिंग आणि ब्रॅंडिंग करण्यात आले आहे. सध्या गटाकडे विक्री योग्य ३० टन बियाणे तयार झाले आहे.

गटाच्या माध्यमातून सोयाबीन पिकासाठी लागणाऱ्या खतांची एकत्रित खरेदी होते. गटातील शेतकऱ्यांना ना नफा ना तोटा या पद्धतीने बियाणे उपलब्ध करून दिले जाते. तसेच विक्रीसाठी मदत करण्यात येते. शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी हरिश्‍चंद्र धुमाळ, कृषी सहायक धनाजी फडतरे, कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ डॉ. महेश बाबर, भूषण यादगीरवार, संग्राम पाटील यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

शेतीशाळेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना पाचट आच्छादनाचे महत्त्व समजावून सांगितले. कृषिरत्न, श्री जोतिर्लिंग आणि सिद्धिविनायक स्वयंसाह्यता शेतकरी गटातील सदस्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संघटित करून पाचट आच्छादनाच्या प्रयत्नांना आम्हाला यश मिळाले आहे.
धनाजी डांगे, ९४२२०२९३३७ (अध्यक्ष, कृषिरत्न स्वयंसाह्यता शेतकरी गट)
पाचट व्यवस्थापातून ऊस उत्पादनात वाढ होऊन भांडवली खर्चात बचत झाली आहे. जमिनीची सुपीकता वाढल्याने ऊस आणि सोयाबीन पिकाच्या उत्पादनात वाढ मिळाली आहे. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव येथील तज्ज्ञांचे आम्हाला चांगले सहकार्य मिळाले आहे.
विजय जाधव, ९०९६२९८२१४(अध्यक्ष, श्री जोतिर्लिंग स्वयंसाह्यता शेतकरी गट)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com