
डॉ. संतोष वानखेडे, डॉ. किरण मालशे, डॉ. विनायक जालगावकर
Success Story : डंखविरहित मधमाशी (Stingless bee) महाराष्ट्रात सर्वत्र आढळून येणारी मधमाशी आहे. मात्र विशेषत: कोकणातील अतिपाऊस, अति आर्द्रता आणि खाऱ्या हवामानातही अस्तित्व टिकवून तग धरणारी एकमेव मधमाशी होय. अन्य मधमाश्या दक्षिण कोकणात अपेक्षित प्रमाणात आपले अस्तित्व टिकवू शकल्या नाहीत.
म्हणूनच या डंखविरहित मधमाशीचे जतन आणि संगोपन करण्याची आवश्यकता आहे. ही मधमाशी आंबा, काजू, नारळ, फणस, चिकू यासह अनेक पिकांच्या परागीकरणात महत्त्वाची भूमिका निभावते. तिची वसाहत नैसर्गिक अधिवासातून काढून तिचे संवर्धन करण्याची गरज आहे. त्यासाठी खास तंत्र विकसित केले आहे.
डंखविरहित मधमाशीचा नैसर्गिक अधिवास प्रामुख्याने झाडांची पोकळी/ढोली, घराच्या तडा गेलेल्या भिंती, खिडक्यामधील फटी, इलेक्ट्रिक पाइप, नळाचे पाइप, दगड खाचा या ठिकाणी केलेल्या वसाहतीमध्ये आढळून येतो. मात्र ही वसाहत नैसर्गिक अधिवासातून काढल्यास संपूर्ण विस्कळीत होऊन नुकसान होऊ शकते.
म्हणूनच या मधमाशीची वसाहत नैसर्गिक अधिवासातून सुखरूप व सुरक्षित काढण्यासाठी प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये येथे एक तंत्र विकसित केले आहे. त्याबाबतची शिफारस डंखविरहित मधमाशीच्या महत्त्वपूर्ण माहितीसह मधमाशी पालक आणि शेतकऱ्यांसाठी प्रसारित केली आहे.
भारतीय उपखंडात डंखविरहित मधमाश्यांच्या आठ प्रजातींची नोंद : लेपिडोट्यगोना आर्किफेरा, लिसोट्यगोना कॅसिए, लिसोट्यगोना मोहनदासी, टेट्रागोनूला इरिडीपेनिस, टेट्रागोनूला बेंगालेन्सिस, टेट्रागोनूला ग्रेसिटी, टेट्रागोनूला प्रोटेरिटा, टेट्रागोनूला रूफिकॉर्निस उत्तर भारतामध्ये जम्मू आणि काश्मीर, हरियाना, राजस्थान आणि दक्षिण व मध्य भारतात कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या सोबतच ईशान्य भागातील आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालॅंड, मेघालय या राज्यांत या माश्या आढळून येतात.
महाराष्ट्रात कोकणामध्ये आढळलेली जात – टेट्रागोनूला एनआर. पागडेनी (Tetragonula nr. pagdeni)
घरट्यांचे वर्णन :
- घरट्याचे प्रवेशद्वार एक साधे छिद्र असते. बाह्य प्रवेशिका ही नलिकाकार असून तेथे घरटे वाढविले जाते. घरट्याची प्रवेश अभिमुखता आणि सुरक्षेच्या सोयी हे प्रजातीनुसार वेगवेगळ्या असतात.
- इनव्होल्यूक्रम - इनव्होल्यूक्रम ही आच्छादनाची मालिका असते. त्या भोवती ब्रूड सेल असतात. हे सेरूमेण (मेण आणि रेसीन मिळून) पासून बनलेले असतात. कामकरी माश्यांच्या मेणग्रंथीमध्ये निर्माण स्राव आणि वनस्पतींचे रेसिन यांच्या एकत्रीकरणातून सेरूमेण तयार केले जाते.
- बटूमेन - बटूमेन हा मुळात जाड इनव्होल्यूक्रमच्या भिंतीप्रमाणे असतो. राळेचा एखादा थर घरट्याच्या पोकळीवर पसरवला जातो.
- परागकण आणि मध साठवणीची भांडीही सेरूमेणने बनविलेली असतात. ती अंडाकृती असून ब्रूड सेल्सपेक्षा मोठी असतात.
- वेगवेगळ्या प्रजातींच्या घरट्यांच्या वैशिष्ट्यांनुसार साठवणीची भांडी ही वर, खाली किंवा ब्रूड साठवणूक पेशींच्या दोन्ही बाजूंनी उपलब्ध असतात.
वसाहतीची रचना :
- ब्रूड पेशी - कामकरी माश्या सर्वप्रथम मेणाचे खांब तयार करतात. या खांबावर ब्रूड सेल्स पुंजक्याने बांधले जातात. ते अंडाकार किंवा लंब गोलाकार देखील असतात. नर आणि कामकरी ब्रूड सेलचा आकार जवळ जवळ समान असतो. त्या एकमेकांशी चिकटलेल्या असतात. त्यांना समान प्रमाणात अन्न दिले जाते. राणी पेशी या कामकरी ब्रूड पेशींपेक्षा मोठ्या आणि उंच असतात.
- पोळांची संरचना ही झाडाच्या पोकळीमध्ये, जमिनीच्या पातळीपासून सरासरी उंची २२२ सेंमी असते. भिंतीच्या पोकळीत संरचना बांधली गेल्यास ती १९२ सेंमी उंच असते.
- वृक्ष पोकळी आणि भिंत पोकळीतील पोळाच्या प्रवेश ट्यूबची लांबी अनुक्रमे १०८ मिमी आणि ९६ मिमी असते.
- ब्रूड सेल्सचा रंग तपकिरी असतो.
- डंखविरहित मधमाशीची जीवन अवस्था :
- अंडी, अळी, कोष आणि प्रौढ या चार अवस्था.
- अंड्याची लांबी ०.८३ मिमी व रुंदी ०.३३ मिमी असून, ती ६ ते ७ दिवसांत उबतात.
- अळ्या मलईदार पांढऱ्या रंगाच्या, पाय नसलेल्या आणि सी-आकाराच्या असतात. वयानुसार अळ्याची लांबी आणि रुंदी वाढते. अळी अवस्थेतील कालावधी १४ ते १६ दिवसांचा असतो.
- कोष अवस्था १८ ते २० दिवसांची असते. एकूण विकासात्मक जीवनक्रम कालावधी ३६ ते ४३ दिवसांचा असतो.
- स्टिंगलेस मधमाश्या झुंडशाही प्रक्रियेद्वारे पुनरुत्पादित होतात. ज्यात आईच्या पोळ्यातील कामकरी माश्या नवीन पोकळी निवडतात.
- नवीन पोळे तयार करण्यासाठी त्याची साफसफाई सुरू करतात. पुढे ते आईच्या घरट्यातील साहित्य आणतात.
- झुंडीने आलेल्या नरमाश्यांपैकी एकाशी राणीमाशीचे हवेमध्येच मिलन होते.
कामकरी मधमाश्यांचे जीवशास्त्र :
- पिलांची कोठी (ब्रूड सेल) तयार करणे, अळ्यांना अन्न देणे आणि सेल बांधकाम आणि मधमाशीच्या अळ्यांचे नियमित संगोपन करणे.
-राणीमाशी अनुपस्थित असल्यास सेल बांधकाम थांबविले जाते. वसाहत दिवसेंदिवस कमी होत जाते.
- कामकरी माश्या ४ ते ६ च्या तुकड्यांमध्ये जोड्यांसारख्या स्तंभाद्वारे एकमेकांशी जोडलेले एकसारख्या गोलाकृती ब्रूड पेशी तयार करतात.
- पूर्ण झाल्यानंतर ६ ते ८ परिचर कामकरी माश्यांकडून विशेष मध आणि परागकण खाद्य मिश्रण प्रत्येक सेलमध्ये भरण्यात येते.
- बांधकाम चालू असताना व नंतरही राणीमाशी आपले पंख लयबद्ध पद्धतीने फडफडवत ब्रूड सेल्सची तपासणी करते.
- नंतर ती उभ्या किंवा तिरकस स्थितीत प्रत्येक ब्रूड सेलमध्ये अळ्यांच्या खाद्याच्या मध्यभागी अंडी ठेवते.
...असे आहे तंत्रज्ञान
नैसर्गिक अधिवासामधून डंखविरहित मधमाशीची वसाहत पकडण्यासाठी डॉ. बा. सा. को. कृ. विद्यापीठ, दापोली येथे खास तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. ते पुढील प्रमाणे...
पावसाळा संपल्यानंतर पी.व्ही.सी. पाइप सापळा दोन कप्प्यामध्ये (३"-२० सेंमी आणि २.५"-१८ सेंमी) तयार करावा. त्याच्या पुढे व खालील बाजूस ५ मिमी आकाराचे मधमाशीला प्रवेश करण्यासाठी छिद्र करावे. पाच इंच लांबीचा आणि २५ मिमी व्यासाचा छोटा पाइप घ्यावा. तो पी.व्ही.सी. पाइप सापळ्याच्या मागील बाजूने वर घट्ट बसवावा. दुसरे टोक डंखविरहीत मधमाशीच्या नैसर्गिक अधिवासाच्या प्रवेशद्वारामध्ये घट्ट बसवावा.
चिकट किंवा सिमेंट घटकांने इतरत्र असलेल्या भेगा व छिद्रे बंद करावीत. वसाहत पकडण्यासाठी हा सापळा चार महिने तसाच ठेवावा.
संपर्क - डॉ. संतोष वानखेडे, ९७६५५४१३२२, (डॉ. वानखेडे हे कनिष्ठ कीटकशास्त्रज्ञ, तर डॉ. मालशे हे कृषी विद्यावेत्ता म्हणून प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, रत्नागिरी येथे कार्यरत आहे. डॉ. जालगावकर हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे कृषी कीटकशास्त्र विभाग प्रमुख आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.