Team Agrowon
मेण हा मधमाश्यांपासून मिळणारा महत्त्वाचा पदार्थ. मधापेक्षा या मेणाला बाजारात खूप मागणी आहे. मधमाश्यांच्या पोटाखाली शरीरावर मेण ग्रंथी असतात. विशिष्ट वयाच्या मधमाशा या मेणग्रंथीपासून मेणाची निर्मिती करतात.
मधमाश्यांच्या मेणाचा वापर ग्रामीण भागातील महिला कपाळावर कुंकू लावण्यासाठी तसेच तेल बनवण्यासाठी करतात.
प्राचीन काळापासून भारतात मेणाचा वापर आयुर्वेद तसेच सौंदर्य प्रसाधनांसाठी होत आहे. जगात सौंदर्य प्रसाधनांच्या निर्मितीमध्ये मेणाचा वापर ७० टक्के होतो.
रंग, पॉलिश, शाई, वीजविरोधक, पाणी प्रतिकारक, पुतळे निर्मिती, कृत्रिम कवळ्या बनविण्याचे साचे, वस्त्र छपाईसाठी, काडतुसांच्या टोकाचे आवरण अशा अनेक कामांसाठी मेणाचा उपयोग होतो.
औषधांचे गोळ्यांचे आवरण बनविताना किंवा पावडर सांधण्यासाठी मेणाचा एक रासायनिक उदासीन घटक म्हणून वापर करतात.
मेणातील पराग वा अन्य घटकांमुळे मेणाला रंग छटा प्राप्त होते. मध संकलनासाठी सूर्याच्या उष्णतेचा वापर करता येतो, यासाठी विशिष्ट यंत्र उपलब्ध आहे.
शुद्ध मेणाचे संकलन करण्याकरिता विशिष्ट दाबयंत्राचा वापर करता येतो. शुद्ध मेणाच्या गुळाच्या ढेपेसारख्या ढेपा वा विटा बनविता येतात. त्यासाठी मेणाला उष्णतेवर पाण्याच्या भांड्यात वितळवून योग्य प्रमाणे साच्यात ओतून घ्यावे लागते. म्हणजे विशिष्ट आकार आपणास मिळतो.