
Fruit crop Cultivation Solapur : सोलापूर जिल्ह्यात सोलापूर-बार्शी मार्गावर मार्डी हे श्री यमाईदेवीचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. सोलापूरपासून १५ ते २० किलोमीटरवर हे गाव असल्याने येथील शेतकऱ्यांचा ओढा भाजीपाला (Vegetable), कांदा (Onion) आणि फळबागांकडे (Fruit Orchard) आहे.
गावात नरोटेवाडी रस्त्यावर प्रवीण आणि प्रशांत या काशीद बंधूंची आठ एकर शेती आहे. त्यांचे वडील गजेंद्र (बाळासाहेब) भूविकास बँकेचे अध्यक्ष होते. राजकारणात त्यांचे चांगले नाव होते. त्या काळात डाळिंब, आंबा या पिकांत चांगल्या उत्पादनासह (Pomegranate Production) त्यांनी लौकिक मिळवला.
दुर्दैवाने २००४ मध्ये रस्ता अपघातात ते व पत्नी रंजना यांचे निधन झाले. त्या वेळी दोघे बंधू शालेय शिक्षण घेत होते. लहान वयातच आई-वडिलांचे छत्र गेल्याने मोठा आघात त्यांच्यावर झाला. त्यातूनही सावरत त्यांनी शिक्षण घेतले.
आज प्रवीण बीई (मेकॅनिकल), तर प्रशांत बीए पदवीधर आहेत. दोन्ही बंधू पुढे वीटभट्टी, खडी क्रशर आदी व्यवसायांतून स्वतःच्या पायांवर उभे राहिले. अलीकडील काही वर्षांपासून शेतीवर अधिक लक्ष केंद्रित करून त्यांनी वडिलांचा आदर्श पुढे सुरू ठेवला आहे.
तैवान पिंक पेरूची शेती
प्रवीण यांनी काही काळ मुंबई, रत्नागिरी आदी ठिकाणी नोकरी केली. सन २०२० मध्ये कोरोना काळात ते गावी परतले. नोकरीपेक्षा घरच्या शेतीतच पूर्णवेळ उतरण्याचे त्यांनी ठरविले. लहान बंधू प्रशांत यांनीही त्यांना साथ देत एकत्रितपणे काहीतरी करून दाखविण्याचा निर्धार केला.
कोंडीचे प्रगतिशील पेरू उत्पादक अमोल पाटील, नानासाहेब भोसले यांच्याकडून मार्गदर्शन घेत अडीच एकरांत तैवान पिंक पेरू लागवडीचा निर्णय घेतला. विशाखापट्टणम येथून ६० रुपये प्रति नग याप्रमाणे रोपे आणली.
पेरू लागवड व्यवस्थापन (ठळक बाबी)
-नोव्हेंबर २०२० मध्ये बेडवर १० बाय चार फूट अंतरावर लागवड. एकरी सुमारे एक हजार रोपे. त्यानंतर ठिबक सिंचन यंत्रणा.
-लागवडीपूर्वी दहा टन कोंबडीखताचा वापर.
-पहिल्या दिवशी ह्युमिक ॲसिड, तिसऱ्या यादिवशी १९-१९ः१९ आणि चौथ्या दिवशी जैविक खताची आळवणी. लागवडीनंतर प्रति एकरी पाच किलो एनपीके, दुय्यम अन्नद्रव्ये.
- पिकाच्या वाढीनुसार विद्राव्य खतांचा वापर.
-दरमहा ट्रायकोडर्मा आणि ह्युमिक ॲसिड प्रत्येकी एक किलो या प्रमाणे २०० लिटर पाण्यातून दिले.
-वेस्ट डी कंपोजर या जैविक घटकाची महिन्यातून एक फवारणी व महिन्यातून एक ते दोन वेळा ठिबकमधून एकरी २०० लिटर पाण्यातून वापर.
-दर आठ दिवसांनी जिवामृत स्लरी आणि गोमूत्र प्रति २०० लिटर पाण्यातून.
-झाडे वर्षभरानंतर सशक्त झाल्यानंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये छाटणी. त्यानंतर डीएपी, सूक्ष्म अन्नद्रव्ये, सिलिकॉनयुक्त घटक, एमओपी, सुपर फॉस्फेट, १०ः२६ः२६, २०ः२०ः० यांचा तसेच विद्राव्य खतांचा वापर.
-दुसऱ्या छाटणीनंतर लेंडीखत एकरी १० टन याप्रमाणे वापर.
-फळांच्या अवस्थेत कॅल्शिअम नायट्रेट आणि बोरॉन यांचा वापर.
-सुरुवातीला दररोज अर्धा तास व पुढे महिनाभर दररोज पाऊण तास ते पुढे वाफसा पाहून पाणी वाढवले.
उत्पादन व दर्जा
पहिली काढणी गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये सुरू झाली. ती एप्रिलपर्यंत चालली. जून दरम्यान दुसरी छाटणी झाली. ऑक्टोबर ते जानेवारीदरम्यान काढणी हंगाम राहिला. आधुनिक तंत्राचा वापर व व्यवस्थापनामुळे पेरूच्या गुणवत्तेत वाढ झाली.
वजन, आकारमान सुधारले. पेरूचे वजन तीनशे ग्रॅमपासून ४५० ग्रॅमपर्यंत व कमाल सव्वा किलोपर्यंत मिळाले. पहिल्या काढणीत एकरी १५ ते २० टन, तर त्यापुढील वर्षी उत्पादन त्याहीपेक्षा अधिक मिळाले.
डागरहित फळाची गुणवत्ता
पेरूमध्ये फळमाशी व अन्य किडी, ‘सन बर्निंग’मुळे पेरूची गुणवत्ता खालावते. त्यापासून संरक्षणासाठी प्रत्येक फळाला फोम, त्यानंतर प्लॅस्टिक बॅगेचे आवरण घातले. उन्हापासून संरक्षण व तापमान नियंत्रणासाठी क्रॉप कव्हरचाही वापर केला.
त्यामुळे पेरूला डागरहित गुणवत्ता, आकारमान, वजन आणि चकाकी मिळाली. प्रवीण सांगतात, की या बाबींमुळे खर्च व मजुरी काही प्रमाणात वाढली. मात्र पेरूच्या वाढलेल्या दर्जामुळे दरही तसाच मिळाला. कीडनियंत्रणासाठी फवारणीही व त्यावरील खर्चही काही प्रमाणात कमी झाला.
थेट बांधावरून खरेदी
खरेदीसाठी थेट व्यापारी बांधावर आले. गेल्या वर्षी स्थानिक भागासह केरळ, हैदराबाद येथील व्यापाऱ्यांनाही विक्री केली. यंदा सोलापूरसह मुंबई, पुण्यासह परराज्यांतील बाजारपेठांत पेरू पाठवला. दोन वर्षांत प्रति किलोला ३५, ४० , ४५ ते किमान २५ रुपये दर मिळाला.
तैवान पेरूची वैशिष्ट्ये
-आतून गुलाबी. टिकवणक्षमता चांगली. काढणीनंतर १५ दिवस टिकतो.
-वर्षातून दोन वेळा उत्पादन घेता येते.
-स्वादही मध्यम गोड. त्यामुळे कोणासही खाण्यासाठी चांगला.
संपर्क - प्रवीण काशीद, मोबाईल- ७७१००६१००४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.