
Agriculture Success Story: मंगळवेढा - विजयपूर महामार्गावरील मरवडे गावाच्या अलीकडे फुटणाऱ्या फाट्याने ५ ते ६ कि.मी. अंतरावर डोणज गाव आहे.पाण्याचा कोणताही स्रोत नसलेल्या या गावात प्रामुख्याने ज्वारी, गहू अशी पिके घेतली जातात. त्याला विहीर बागायतीमध्ये ऊस या पिकाची जोड दिली जाते. येथे चंद्रकांत केदार यांची ४ एकर शेती आहे. शेतीची आवड असली तरी सुरुवातीला भारतीय वायुसेनेत दोन दशके नोकरी, त्यानंतर १९ वर्षे प्राध्यापकी यात रमून गेले होते.
कुटुंबामध्ये मुलगा डॉ. संतोष, सून सौ. दर्शना, धाकटा मुलगा सागर, सून सौ. मनीषा हे सर्व उच्चशिक्षित असून, आपापल्या नोकरीमध्ये सुस्थापित आहेत. त्यामुळे आयुष्यातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर आता ते आपल्या पत्नी सौ. लक्ष्मी यांच्यासह संपूर्ण वेळ शेतीचा ध्यास घेतला आहे. सुरुवातीला पिकांचे काही प्रयोग केल्यानंतर ते आता ३ एकरमध्ये ऊस, तर एक एकर क्षेत्रामध्ये कांदा, मिरची आणि ऊस अशी साखळी पद्धतीने पिके घेतात. त्यात उत्पन्नाची शाश्वती मिळाल्याने गेल्या पाच वर्षापासून राबवत असल्याचे ते उत्साहाने सांगतात.
एक नाही, तर चक्क तीन करिअर...
१९८३ मध्ये वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी चंद्रकांत केदार भारतीय वायुसेनेत भरती झाले. तिथे नवी दिल्ली, बंगळूर, चंडीगड अशा विविध भागांत दोन दशके नोकरी करताना देशाची सेवा करण्याची संधी मिळाली. नोकरीमध्येच त्यांनी हिंदी विषयामध्ये बी.ए. नंतर एम.ए. आणि एम.एड. अशा पदव्युत्तर पदव्या घेतल्या. विशेष म्हणजे नोकरीतील व कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत वयाच्या चाळिशीनंतर त्यांनी हे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळेच वायुसेनेतील निवृत्ती घेताच त्यांना सोलापुरातील कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी विषयाचे प्राध्यापक म्हणून संधी मिळाली. एकोणीस वर्षे अध्यापन केल्यानंतर निवृत्त झाले. ते हसत म्हणतात, ‘‘आता पूर्णवेळ शेतीतच करिअर करण्याचा विचार आहे.’’ त्यात त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मी यांची मोलाची साथ आहे.
....म्हणून निवडली साखळी पीक पद्धती
परिसरात ऊस आणि ज्वारी ही मुख्य पिके असली तरी त्यांनी कांदा, हिरवी मिरची आणि ऊस निवडली आहेत. कमीत कमी मजूर लागणारी, उत्पन्नाची शाश्वत खात्री देणारी साखळी पीक पद्धती बसवली आहे. त्यांच्या साखळी पीक पद्धत (रिले क्रॉपिंग) मध्ये एकाच हंगामात एकाच शेतात दोन किंवा त्यापेक्षा अधिक पिकांचे एकत्रितपणे नियोजन केले जाते. पुढील पिकाची पेरणीही पहिले पीक पूर्णपणे पक्वता गाठण्याच्या दरम्यान केली जाते.
व्यवस्थापनातील ठळक बाबी
साधारण एक एकर क्षेत्रावर ऊस लावण्यासाठी तयार केलेल्या सरीमध्ये जुलै महिन्यात कांदा लागवडीआधी एकरी १०० किलो निंबोळीखत, त्यानंतर सरीवर १०ः२६ः२६ एकरी ५० किलो आणि युरिया २० किलो दिला जातो. त्यानंतर सरीवर कांदा लागवड केली जाते. पुढे दीड महिन्यात (ऑगस्ट) त्याच सरीवर हिरव्या मिरची रोपांची लागवड अडीच बाय पाच फूट अशी दोन ओळींत केली जाते. त्यानंतर आठवड्यांनी ह्युमिक ॲसिडची आळवणी केली जाते.
२० दिवसांनी ३ किलो १९ः१९ः१९ आणि ३ किलो सूक्ष्म अन्नद्रव्येही खते ड्रीपद्वारे सोडली. त्यानंतर दुसऱ्या महिन्यात ३ किलो १२ः६१ः० खत सोडले जाते. दीड महिन्यांनी मॅग्नेशिअम सल्फेट, कॅल्शिअम नायट्रेट आणि बोरॅान ही खते प्रत्येकी ३ किलो दिली जातात. त्यानंतर १९ः१९ः१९ आणि ०ः०ः५० ही खते प्रत्येकी ३ किलो प्रमाणात आलटून-पालटून दिली जातात. ऑक्टोबरच्या सुरुवातीला कांदा वाढीसाठी २० किलोचा पोटॅशचा डोस दिला. ही खते एकाचवेळी कांदा आणि मिरचीला मिळतात.
पाणी व्यवस्थापनासाठी सरीवर एक आणि सरीच्या बुडात एक अशा दोन ड्रीप लॅटरल्स सोडल्या आहेत. त्याद्वारे वाफसा पाहून पाणी दिले जाते. त्याशिवाय वातावरणानुसार कीटकनाशक आणि बुरशीनाशकाच्या आलटून पालटून दर आठ-दहा दिवसांनी फवारणीचे नियोजन असते. या दोन्ही पिकाच्या शेवटच्या टप्प्यातर त्याच सरीच्या बुडात ऊस लागवड केली जाते. सध्या हा ऊसही चांगला दोन फुटापर्यंत वाढला आहे. यानंतर केवळ ऊस पीक शेतात वाढते. त्याच्या व्यवस्थापनाचे वेळापत्रक बसवले आहे.
ऑक्टोबर अखेरीस कांद्याची काढणी होते. तर नोव्हेंबरमध्ये मिरची पहिल्या तोडणीसाठी तयार होते. याच काळात सरीमध्ये पॉवर टिलर चालवून जमिनीची मशागत केली जाते. त्याद्वारे तणाचेही व्यवस्थापन होते. नोव्हेंबरअखेर उसाची लागवड एक डोळा टिपरी पद्धतीने केली जाते. दोन टिपरीतील अंतर दीड फूट, तर दोन ओळींतील अंतर पाच फूट असते.
तीन महिन्यांनी म्हणजे साधारण फेब्रुवारीमध्ये मिरचीचे पीक शेवटच्या काढणीला असते. ते काढून झाले की उसाला माती भरली जाते. ऊसतोड पुढील वर्षाच्या डिसेंबर अखेरीस होते. काढणीनंतर कमी खर्चात खोडवा ऊस घेतला जातो. खोडवा उसामध्ये पाचट कुट्टी करून जमिनीत गाडली जाते. त्यामुळे ओलावा टिकण्यासोबतच जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढून उपयुक्त सूक्ष्मजिवांच्या वाढीला पोषक वातावरण तयार होते. अशा साखळी पद्धतीच्या नियोजनातून एकाच वेळी तीन पिके घेतली जातात. त्यामुळे एकत्रित पाणी, अन्नद्रव्य व मजूर व्यवस्थापनामुळे खर्चातही बचत साधते.
चंद्रकांत केदार ९४२१०२६८४७
बाजारातील चढ-उतारावर असा काढला मार्ग
कांदा, हिरव्या मिरचीच्या दरात अनेक वेळा चढ-उतार होताना दिसते. पण कांद्याची विक्री सोलापूरसह सांगली बाजारात होते, कांद्याची लागवड जुलैमध्ये लागवड केलेला कांदा ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान निघतो. कांद्याचा हंगाम सुरू होतानाच कांदा बाजारात आल्याने हमखास दर मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. मिरचीच्या दरामध्ये चढ-उताराच्या स्थितीनुसार हिरवी मिरची बाजारात न्यायची की सुकवून लाल करायची याची निर्णय घेतला जातो. लाल मिरचीच्या टिकाऊपण व दर यामुळे उत्पन्नांची एक शाश्वती राहते.
...या पद्धतीचे फायदे
एकाच क्षेत्रात एकामागोमाग एक अशी तीन पिके घेतली जातात.
पिकांच्या विविधतेमुळे एका पिकाचे नुकसान झाले, तरी दुसरे पीक हमखास लाभ देते. परिणामी जोखीम कमी होते.
जमिनीतील अन्नद्रव्ये आणि पाण्याचा पूर्णपणे वापर होतो. ऊस पिकाला अधिक पाणी लागत असले तरी ठिबक सिंचनाद्वारे त्यातही बचत साधता येते.
मुख्यतः कांद्याला बाजारात सतत मागणी असते. तर हिरव्या मिरचीपेक्षा दीर्घकालीन टिकाऊपणामुळे सुकवलेली मिरची फायदेशीर ठरते. बाजारातील चढ-उताराचा परिणाम नसलेल्या ऊस पिकातून शाश्वत उत्पन्नाची खात्री असते.
पिकाची फेरपालट साधली जाते. पिकांचे अवशेष तिथेच गाडले जात असल्याने पोषक घटकांचे चांगले पुनर्भरण होते.
मशागतीसाठी लागणाऱ्या ऊर्जा व श्रमांत बचत होते.
प्रयोगासह उत्पन्न, उत्पादनात सातत्य
यंदाही कांद्याचे सुमारे ७५ क्विंटल उत्पादन मिळाले. प्रतिक्विंटल सरासरी ३८०० (सर्वाधिक ४५०० रुपये) दर मिळाला. कांद्यातून पावणेदोन लाख रुपये मिळाले.
हिरव्या मिरचीची सध्या काढणी सुरू आहे. आतापर्यंत १२०० किलो मिरची काढून झाली असून, सुरुवातीला प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये दर मिळाला असला तरी सध्या दर तुलनेने कमी आहेत. त्यामुळे त्यांनी लाल मिरची करण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील वर्षी (२०२३) कांद्यातून १ लाख ७० हजार रुपये मिळाले. मिरचीला दर कमी (१५ ते २० रु. प्रति किलो) होते.
त्या आधी (२०२२ ) कांद्यातून त्यांना २ लाख रुपये आणि मिरचीतून १ लाख ४१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.
उसाचे एकरी ६० ते ७० टन उत्पादन मिळते. त्याला प्रतिटन २८०० ते ३००० रुपये दर मिळतो.
एकत्रित पद्धतीने केलेल्या या सर्व पिकांच्या व्यवस्थापनाचा खर्च साधारण ५० हजारांपर्यंत येतो.
तो पहिल्याच पिकातून निघून येतो. उर्वरित पिकांचे उत्पन्न हा निव्वळ फायदा राहतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.