
Agriculture Success Story : रब्बी हंगाम म्हटला, की प्रामुख्याने गहू, हरभरा ही दोन पिकेच डोळ्यासमोर येतात. मात्र प्रयोगशील असलेल्या वाशीम जिल्ह्यातील शेतकरी कायम नावीन्याचा ध्यास घेऊन शेती करतात.
या कामाला गती देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन (अकोला) अंतर्गत ‘योगऋषी जैविक शेती मिशन’ या कंपनीची स्थापना ३ डिसेंबर २०२० मध्ये झाली.
नेतन्सासह पंचक्रोशीतील नावली, कुकसा, केनवड, मांगूळझनक, गोवर्धन या सहा गावांमध्ये कंपनीचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे. सध्या कंपनीचे सुमारे पावणेतीनशे सभासद आहेत.
तेलघाण्यापासून सुरुवात
मागील काही वर्षांत नेतन्सा परिसरात करडईची लागवड वाढली आहे. शेतकऱ्यांकडून करडई तेलाचा वापर खाण्यासाठी म्हणून वाढू लागला आहे. मागणी निर्माण झाल्याने कंपनीच्या कार्यक्षेत्रात मांगूळझनक गावात नीलेश काळबांडे यांनी तेलघाणा सुरू केला.
नाममात्र ढेपीच्या बदल्यात कंपनीचे सभासद शेतकरी येथून तेल काढून घेऊन जातात. त्या तेलाचा वापर स्वतःच्या घरगुती वापरासह काही प्रमाणात विक्रीसाठी करतात. घाण्यावरील तेलाला चांगली मागणी आहे.
मागील वर्षी ६ ते ९ मार्च या दरम्यान वाशीमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई मंत्रालय परिसरात तीन दिवस करडई तेल विक्रीचे दालन लावण्याची संधी कंपनीला मिळाली. त्यातून मुंबईतील नवीन ग्राहक थेट कंपनीसोबत जुळले.
सेंद्रिय पद्धतीने चियासीड उत्पादन
वाशीम जिल्ह्यात मागील दोन-तीन रब्बी हंगामात चियासीड हे नवीन पीक रुजते आहे. बाजारात चांगला दर आणि एकरी उत्पादकताही चांगली असल्याने शेतकऱ्यांकडून या पिकास पसंती मिळते आहे. शेतकरी कंपनीच्या पुढाकाराने सुरुवातीला सहा गावांमध्ये ४० हेक्टरवर चियासीडची लागवड करण्यात आली.
या वर्षी कंपनीने करार करून चियासीडचे क्षेत्र १२० हेक्टरपर्यंत विस्तारले आहे. चियासीडचे उत्पादन एकरी सरासरी साडेचार ते पाच क्विंटलपर्यंत मिळते आहे. चियासीड उत्पादकांना बियाणे उपलब्ध करणे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, जैविक निविष्ठांचा पुरवठा तसेच तयार मालाच्या विक्रीसाठी कंपनीद्वारे प्रयत्न केले जातात.
मागील हंगामात सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या चियासीडची पुण्यातील एका खरेदीदार कंपनीला १४ हजार रुपये प्रति क्विंटल दराने विक्री करण्यात आली. मागील वर्षी खरेदीदार कंपनीमार्फत सुमारे १८० क्विंटल चियासीड खरेदी करण्यात आले.
त्याच कंपनीने या वर्षी देखील पुन्हा खरेदी करण्यासाठी करार केला आहे. चियासीडच्या लागवड व मार्केटिंगसाठी वाशीम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन कंपनीसाठी मोलाची बाब ठरली आहे.
जैविक निविष्ठा निर्मितीत सहभाग
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविणे असा शेतकरी उत्पादक कंपनीचा मूळ उद्देश आहे. यासाठी सरकारच्या पाठबळातून शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासद शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खत निर्मितीच्या उद्देशाने सुमारे १६७ बेड मिळाले.
धान्य स्वच्छ करण्यासाठी ३० स्पायरल सेपरेटर मिळाले. सुमारे १०० सीड ड्रील मिळाले. आता लवकरच कंपनीची जैविक लॅब कार्यान्वित होत आहे. कंपनीचे कृषी निविष्ठा निर्मिती केंद्र (माती सेंटर-Making agriculture traditional inputs center) आहे.
तेथे तयार केलेल्या निविष्ठा कंपनीमधील सभासदांना ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर दिल्या जातात. इतर शेतकऱ्यांकडून केवळ सेवा शुल्क तसेच निविष्ठा निर्मितीसाठी आलेला खर्च घेतला जातो. जैविक निविष्ठा निर्मितीमध्ये राजेश तिवारी, कुवरसिंह मोहणे, शंकर शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन वेळोवेळी कंपनीला मिळते आहे.
...असे आहे संचालक मंडळ
अध्यक्ष संदीप रामभाऊ बाजड, सचिव दामोधर आनंदा गोळे, संचालक शरद आत्माराम बाजड, पंकज विजय बाजड, गजानन हरिभाऊ बाजड, गजानन श्रीपत बाजड, ओम तुळशीराम बाजड, विजय प्रल्हाद सरोदे, परमेश्वर प्रकाश राऊत, रतन जिजेबा ठाकरे, गजानन तुळशीराम बाजड, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मांडवगडे, सेंद्रिय प्रमाणीकरण आणि निविष्ठा निर्मिती तज्ज्ञ म्हणून सचिन बाजड कार्यरत आहेत.
- संदीप बाजड, अध्यक्ष, ९०२१८२००२६
- संजय मांडवगडे, मुख्य कार्यकारी अधिकारी ८४०८९८१२५१
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तेलबिया संशोधन विभागातर्फे करडई पिकाच्या लागवडीसाठी वाशीम जिल्ह्यात सामूहिक प्रयत्न केले जात आहेत. ‘पंदेकृवि’ अकोला आणि भारतीय तेलबिया संस्था (हैदराबाद) यांच्या सहकार्याने प्रथम रेषीय प्रात्यक्षिकाचे आयोजन केले जाते. २०२४-२५ या वर्षामध्ये १५० प्रात्यक्षिकाचे दोन क्लस्टरमध्ये आयोजन करण्यात आले आहे.
एका क्लस्टरमध्ये गोभणी, मांगूळ झनक, नेतन्सा, नावली ही गावे असून, या गावांत ७५ प्रात्यक्षिके दिली आहेत. एका क्लस्टरमध्ये पीडीकेव्ही व्हाइट (एकेएस-३५१) व आयएसएफ-७६४ हे वाण, दुसऱ्या क्लस्टरमध्ये पीकेव्ही पिंक हा वाण देण्यात आला आहे.
तेलबिया संशोधन केंद्राचे वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ डॉ. संतोष गहूकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विद्या सहायक प्रा. डॉ. भारत फरकाडे यांनी २०२० मध्ये ७५ प्रात्यक्षिके, २०२१ मध्ये १५०, २०२२ मध्ये ३०० प्रात्यक्षिके आणि २०२४ मध्ये १५० प्रात्यक्षिकांचे आयोजन केले.
संजय मांडगवडे (गोभणी), संदीप बाजड, गजानन बाजड (नेतन्सा), दत्तराव ठाकरे (मांगूळ झनक) यांच्या सहकार्यामुळे या भागात करडई क्षेत्र ५०० हेक्टरपर्यंत विस्तारले आहे. उत्पादित बियाणे स्वतः वापरून इतर शेतकऱ्यांना तेल काढण्यासाठी दिले जाते.
सध्या तेलाला प्रति लिटरला ३५० ते ४०० रुपयांपर्यंत दरही मिळतो आहे. हे एक प्रकारचे चांगले मॉडेल तयार झाले असून वाशीम जिल्ह्यात आता करडईचे क्षेत्र टिकून आहे, असे डॉ. फरकाडे यांनी सांगितले. करडई क्षेत्र वाढीसाठी कुलगुरू डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे.
- डॉ. भारत फरकाडे ८२७५०३९५०९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.