Crab Farming : खेकडापालनाचा कांदळवन सफारीला आधार

Mangrove Tourism : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा जामडूल बेट (ता. मालवण) येथील ओमप्रकाश आचरेकर यांनी कांदळवन सफारी आणि पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासह पिंजऱ्यातील खेकडापालन उद्योगही यशस्वी केला आहे.
Crab Farming
Crab Farming Agrowon
Published on
Updated on

Konkan Seafood Business : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वांत मोठे कांदळवन मालवण तालुक्यात आचरा येथे आहे. सुमारे ५५० ते ६०० एकरांत विस्तारलेल्या या कांदळवनात कंकर, किरकिरी, चिप्पी, तीवर, सुगंधा, मारंडी, हुरशी, आदी विविध महत्त्वपूर्ण वनस्पती आढळतात. चहूबाजूंनी कांदळवन आणि मध्यभागी खाडीचे संथ पाणी असे हे वातावरण जगभरातील पर्यटकांना भुरळ घालणारे व अभ्यासासाठी आदर्श असे आहे.

याच आचरा येथे जामडूल बेटावर ७० ते ८० घरे आहेत. बेटाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत खाडीचे पाणी आहे. आणि त्यातच घनदाट कांदळवन विस्तारले आहे. बेटावर वास्तव्य करणाऱ्या बहुतांशी ग्रामस्थांकडे घरापुरतीच जागा आहे. शेती करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी जमीनच नाही. काही जणांकडे थोडीफार जमीन आहे. परंतु त्यात खाडीचे क्षारयुक्त पाणी जात असल्याने शेतीला खूपच कमी वाव आहे. मासेमारीवरच येथील लोकांचा उदरनिर्वाह चालतो. बहुतांशी लोक अरबी समुद्रात मासेमारीला जातात. तर काही जण आचरा खाडीतही मासेमारी करतात.

Crab Farming
Crab Farming : पाच गुंठे क्षेत्रावर खेकडापालनाचा प्रयोग

खेकडापालनातील आचरेकर

याच जामडुल बेटावर ओमप्रकाश आचरेकर कुटुंबासमवेत राहतात. त्यांनी इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग विषयात पदविका घेतली आहे. वडील पूर्वी समुद्रात, खाडीत मासेमारी करायचे. त्यामुळे सुनील यांनाही लहानपणापासूनच मासेमारीची आवड होती. खाडी जवळ असल्यामुळे सुनील आणि अमित या दोघा बंधूंना खेकडे पकडण्याचा छंदच जडला होता.

या छंदातूनच खेकडेपालन व्यवसाय करण्याचा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. त्यातून घरचे अर्थकारण बळकट होणार होते. आणि मुख्य म्हणजे बदलत्या वातावरणात मासेमारी शाश्‍वत देखील राहिली नव्हती. सुरवातीला लोखंडी फ्रेम, त्याला ट्रॉलर्सचे जाळे जोडू पिंजरा तयार केला. त्या आधारे खाडीतील लहान खेकडे पकडून पिंजरा पद्धतीने त्यांचे पालन सुरू केले.

परंतु काही दिवसांतच खेकडे जाळी तोडून पसार होत असल्याचे निर्दशनास आले. पहिला प्रयोग अयशस्वी झाला. पण सुनीलही जिद्द हारले नाहीत. त्यांनी पुन्हा मजबूत जाळी तयार केली. काही दिवसांनी खाऱ्या पाण्यामुळे लोखंडाला गंज धरण्याची प्रकिया होऊ लागली. अखेर पुन्हा सखोल अभ्यास करून फायबरची पोटी तयार केली. त्यात खेकडे सोडले. अशा अनेक प्रयत्नांनंतर प्रयोगांना यश येऊ लागले.

कांदळवन प्रतिष्ठानचे सहकार्य

खाडी किंवा समुद्रातील खेकडे बहुधा मऊ असतात. परंतु पालन करून त्यांना कडक केल्यास त्यांना मोठी मागणी असल्याचे सुनील यांच्या लक्षात आले. याच कालावधीत कांदळवन संरक्षण व स्थानिकांना उपजीविकेचे साधन या हेतूने कांदळवन प्रतिष्ठानने पुढाकार घेतला होता. त्या अंतर्गत मत्स्यपालन, खेकडापालन, कोळंबीपालन असे प्रकल्प अनुदान तत्त्वावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला.

सुनील यांचे प्रयोगही प्रतिष्ठानच्या निर्दशनास आला होता. प्रतिष्ठानचे अधिकारी केदार पालव आणि मयूर पानसरे यांच्या सल्ल्यानुसार सुनील यांनी खेकडापालनासाठी प्रस्ताव दिला. सुरुवातीला ५० पिंजऱ्यांच्या प्रस्तावाला प्रायोगिक तत्त्वावर मंजुरी मिळाली. पिंजरे खाडीत सोडण्यातही आले.

परंतु प्रशिक्षणाचा अभाव, तांत्रिक अंगांची अपुरी माहिती यामुळे पहिल्या वर्षी पालन केलेल्या खेकड्यांपैकी ३० टक्के खेकडे मृत झाले. त्यानंतर कांदळवन प्रतिष्ठानने त्याची दखल घेत तज्ज्ञ मार्गदर्शक आणून आचरेकर यांच्यासह अन्य शेतकऱ्यांना पुन्हा प्रशिक्षण दिले. त्यानंतर मात्र आचरेकर यांनी पुन्हा मात्र मागे वळून पाहिले नाही. खेकडापालनात त्यांनी जम बसविण्यास सुरुवात केली.

Crab Farming
Crab Farming : खेकडापालन, पदार्थ अन् तेलनिर्मितीही...

...असे आहे खेकडापालन

आज आचरेकर यांचा खेकडापालनात १० वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. ग्रीन मड क्रॅब या जातीच्या खेकड्यांचे पालन केले जाते. हे खेकडे प्रामुख्याने कांदळवनात दलदलीच्या ठिकाणी आढळतात. त्यांचा रंग हिरवा ते तपकिरी असतो. पंजे मजबूत असून त्यावर काटे असतात. सध्या २५० पिंजऱ्यांमध्ये खेकडापालन केले जाते.

पिंजरा पद्धतीचा हा तीन लाखांचा प्रकल्प असून प्रतिष्ठानकडून त्यास ९० टक्के अनुदान देण्यात आले. प्रत्येक पिंजऱ्यात एक खेकडा सोडला जातो. स्वतः पकडून किंवा स्थानिकांकडून ते खरेदी केले जातात. दोनशे ते ३०० ग्रॅम वजनाचा हा खेकडा असतो. ऑक्टोबरमध्ये हे खेकडे खाडीत सोडले जातात. मेच्या दरम्यान ते विक्रीयोग्य होतात. अडीचशे खेकड्यांना प्रति दिन १० किलो खाद्य लागते. काटेरी ताज्या माशांचा वापर खाद्य म्हणून होतो.

कांदळवन सफारी व्यवसाय

खेकडपालनासोबत कांदळवन सफारीचाही पूरक व्यवसाय आचरेकर यांनी विकसित केला आहे. हा हंगाम ऑक्टोबर ते मेअखेरीपर्यत चालतो. प्रति बोटीतून सहा व्यक्ती सफारी करू शकतात. ही सफर पाच- सहा किलोमीटरची असते. सफारीसाठी आवश्‍यक बोटखरेदीसाठी बँकेकडून एक लाख २० हजारांचे कर्ज घेतले व अन्य स्वगुंतवणूक केली. कांदळवन सफारी व पर्यटनासाठी महाराष्ट्र, परराज्यांसह ऑस्ट्रेलिया, अमेरिका येथूनही पर्यटक व अभ्यासक येथे येतात.

सफारीत पर्यटकांना बोट चालविण्याचा स्वानुभव देण्यासह कांदळवनातील विविध वनस्पती, पक्षांची माहिती दिली जाते. समुद्रकिनारी टेंटमध्ये राहण्याची सोय उपलब्ध करून दिली जाते. ट्रेकिंग, मासेमारीचा अनुभव तसेच शक्य झाल्यास डॉल्फिन दाखवण्याचा आनंदही पर्यटकांना देण्यात येतो. ओमप्रकाश यांना थोरले बंधू एकनाथ तसेच मुंबई येथे नोकरीला असलेले मधले बंधू अमित यांचे भक्कम पाठबळ आहे. हंगामात गावी येऊन अमित देखील व्यवसायात मदत करतात. कोकणस्पर्श या फर्मने आचरेकर कुटुंबाने आपल्या सर्व व्यवसायांचा विस्तार केला आहे.

बाजारपेठ, वजनावर विक्री

टणक खेकड्यांना मोठी मागणी आहे. त्यामुळे देवगड, मालवण, कुडाळ आदी स्थानिक व्यापारी बांधावर येऊन रोखीने आचरेकर यांच्याकडून खेकडे खरेदी करतात. पुढे हे व्यापारी मुंबई, दिल्ली, चेन्नई तसेच भारताबाहेर सिंगापूरला खेकडे पाठवितात. सहाशे ग्रॅमहून अधिक व ८०० ग्रॅम वजनापर्यंतच्या खेकड्याला मोठा आकार (बिग साइज) मानला जातो.

त्यास प्रति नग ६०० ते ८०० रुपये दर मिळतो. ८०० ग्रॅमच्या पुढे ‘एक्सएल’ आकाराला दोन हजार रुपयांच्या आसपास तर ‘डबल एक्स एल आकाराला (एक किलोपेक्षा अधिक) २२०० रुपयांपर्यंत दर मिळतो. खेकड्यांमध्ये मरतुकीचे प्रमाण ५ ते १० टक्के असते. या व्यवसायातून वर्षाला चांगले उत्पन्न मिळत असल्याचे आचरेकर यांनी सांगितले.

ओमप्रकाश आचरेकर, ९४०४७५४२३७, ९३०९५१४२२३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com