Sugarcane Farming : बोरगव्हाणचे ऊस उत्पादक सुधारित शेतीतंत्राच्या वाटेवर

Sugarcane Cultivation : परभणी जिल्ह्यातील विशेषतः बोरगव्हाण भागातील शेतकरी पारंपरिक लागवड पद्धतीपासून आता उसाच्या सुधारित तंत्राकडे वळत आहेत.
Sugarcane Farming
Sugarcane FarmingAgrowon
Published on
Updated on

Sugarcane Farming Technique : परभणी जिल्ह्यात उसाखाली सरासरी क्षेत्र २५ हजार हेक्टरच्या आसपास आहे. पैठण येथील जायकवाडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील पाथरी, मानवत, परभणी, गंगाखेड, पूर्णा तालुक्यांतील भागाची ऊस पट्टा म्हणून ओळख आहे. त्यातही पाथरी तालुक्यात लागवड अधिक असते. काही दशकांपूर्वी देवनांद्रा (ता. पाथरी) येथे एकमेव सहकारी साखर कारखाना होता. अलीकडील काही वर्षांत या तालुक्यासह जिल्ह्यात तसेच शेजारील बीड जिल्ह्यात साखर कारखाने सुरू झाले. परिणामी, उसाखालील क्षेत्राचा विस्तार झाला. पैठण येथील जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा असतो त्या वर्षी या भागातील ऊस उत्पादकांची चिंता मिटते. मात्र सातत्याने दुष्काळी स्थिती उद्‍भवत असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष असतेच.

उत्पादकता वाढीचे प्रयत्न

पाथरी ते सेलू राष्ट्रीय महामार्गावरील बोरगव्हाण हे प्रमुख ऊस उत्पादक गाव आहे. गावाच्या शिवारातून जायकवाडी डावा कालवा जातो. झरी येथे लघू सिंचन तलाव आहे. त्यामुळे तालुक्यातील अन्य गावांच्या तुलनेत पाण्याची उपलब्ध असते. मात्र जायकवाडी धरणात अपुरा पाणीसाठा असतो त्या वर्षीकालव्याची पाणी आवर्तने मिळत नाहीत. परिणामी, ऊस क्षेत्र कमी होते. बोरगव्हाण परिसरातीलबहुतांश शेतकरी पूर्वहंगामी व सुरू उसाची लागवड करतात. गावात उसाखाली सरासरी क्षेत्र २०० हेक्टरपर्यंत आहे.

Sugarcane Farming
Sugarcane Farming : अभ्यासूवृत्तीने वाढवली उसाची उत्पादकता

संतोष औताडे, प्रकाश कदम, भागवत इंगळे, महादेव शेळके, कृष्णा इंगळे, नारायण इंगळे आदी शेतकरी एकत्र येऊन ऊस उत्पादकता वाढीसाठी प्रयोग करीत आहेत. पूर्वी तीन ते सव्वातीन फूट सरी पद्धतीची लागवड असायची. प्रवाही पद्धतीने पाणी दिले जायचे. एकरी ३० ते ३५ टनांपर्यंतच उत्पादकता होती. अलीकडील काळात चार बाय दीड फूट किंवा पाच बाय दीड फूट अंतरावर ऊस लागवड केली जाते. को ८६०३२, व्हीएसआय ०८००५, फुले २६५ आदी वाणांची लागवड शेतकरी करतात. एक डोळा पद्धतीची लागवड तसेच उती संवर्धित रोपांचा वापर होतो.

पायाभूत बेण्याचा मळा तयार करून शुद्ध बेणे तयार केले जात आहे. पूर्वी दोन वर्षांपर्यंत शेतकरी खोडवा ऊस ठेवायचे. त्यामुळे हुमणी किंवा अन्य किडी- रोगांचा प्रादुर्भाव व्हायचा. शिवाय जमिनीच्या सुपीकेतवर परिणाम व्हायचा. आता अनेक शेतकरी एकच खोडवा ठेवतात. खरिपात सोयाबीन तसेच कपाशीनंतर ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये पूर्वहंगामी उसाची लागवड करतात. उसात कलिंगड किंवा अन्य आंतरपिके घेतात. सततच्या दुष्काळी स्थितीत उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. त्यामुळे ठिबक सिंचन पद्धतीवरील लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. ‘मल्चर’ यंत्राद्वारे ऊस पाचटाचे आच्छादन केले जाते. त्यामुळे जमिनीची सुपीकता व सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होत आहे. शेणखत, कोंबडी खत, हिरवळीच्या खतांचा वापर केला जात आहे.

Sugarcane Farming
Sugarcane Crop Management : पूरपरिस्थितीतील ऊस पिकाचे व्यवस्थापन

एकरी १०० टन उत्पादनाचे प्रयत्न

पाथरीचे तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे म्हणाले, की उत्पादकता वाढीसाठी कृषी विभागामार्फत शेतीशाळा, चर्चासत्रे, मेळावे आयोजित केले जातात. किडी- रोगांचे सर्वेक्षण करून कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांचा सल्ला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जातो. तंत्रशुद्ध ऊस लागवड या विषयावर राज्यातील प्रयोगशील शेतकरी संजीव माने यांचेही चर्चासत्र घेण्यात आले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीसीआय) तसेच प्रगतिशील ऊस उत्पादकांच्या शेतांवर अभ्यास सहली आयोजित केल्या जातात. अनेक गावांतील तरुण शेतकऱ्यांचा आधुनिक तंत्रज्ञानाकडे कल वाढला आहे. आगामी काळात तालुक्यात एकरी १०० टन उत्पादन घेणारे शेतकरी तयार व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

ऊस उत्पादकांचे अनुभव

दहा एकरांपैकी दरवर्षी दोन एकरांवर ऊस लागवड असते. मागील चार वर्षांपासून पाच बाय दीड फूट अंतरावर लागवड करीत आहे. दोन वर्षांपासून ठिबक सिंचनाचा वापर करतो. विद्राव्य खतांचाही वापर वाढवला आहे. खत वेळापत्रकाचे काटेकोर पालन करतो. पूर्वी एकरी ३० ते ३५ टनांपर्यंत उत्पादन मिळायचे. मागील दोन वर्षांत एकरी ५५ ते ६० टन उत्पादन मिळाले आहे. यंदा फेब्रुवारीत दोन एकरांत व्हीएसआय ०८००५ वाणाची लागवड केली आहे.
संतोष औताडे ९९२२३५५४४३, बोरगव्हाण
माझी १२ एकर शेती आहे. दरवर्षी ८ ते १० एकर ऊस लागवड असते. प्रचलित पद्धतीने सव्वातीन फूट अंतरावर तीन डोळे पद्धतीने ऊस लागवड करत असे. त्या वेळी एकरी ४० ते ५० टन उत्पादन मिळत असे. सन २०२२ पासून एक डोळा पद्धतीने ४ बाय दीड फूट अंतरावर लागवड करतो. शेणखत, कोंबडी खत तसेच रासायनिक खतांचा संतुलित वापर करतो. प्रवाही पद्धतीने पाणी देतो. मागील वर्षी पावणेतीन एकरांत सुमारे २२३ टनांपर्यंत ऊस उत्पादन मिळविण्यात यशस्वी झालो आहे.
प्रल्हाद कदम ९९२३५११५९२, बोरगव्हाण
‘व्हीएसआय’सारख्या संस्थेत आयोजित अभ्यास सहलीतून सुधारित तंत्रज्ञानाची माहिती घेतली. तेथून उसाच्या को ८६०३२ वाणाचे पायाभूत बेणे विकत आणले. त्यानंतर बेणे मळा तयार केला. त्यामुळे लागवडीसाठी शुद्ध बेणे मिळाले. दोन वर्षांपूर्वी जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथून को ८६०३२ या वाणाची उती संवर्धित रोपे आणली. तीन एकरांत ४ बाय २ फूट अंतरावर ठिबक सिंचनावर लागवड केली. खत, पाणी, आंतरमशागतीसह काटेकोर पीक व्यवस्थापन केले एकरी ७८ टन उत्पादन मिळाले. पूर्वी प्रवाही पाणी देत असे. आता ठिबक सिंचनाचा वापर करतो. कृषी सहायक गोपाल ढगे यांचे मार्गदर्शन मिळते. गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा गट तयार झाला असून, तंत्रज्ञानावर चर्चा करून प्रयोग केले जातात.
भागवत इंगळे ९९२२५४०५४८, बोरगव्हाण
सन २०२३ ऑक्टोबरमध्ये फुले एमएस १०००१ वाणाची ठिबकवर दोन एकरांत लागवड केली. एकरी ६० टन उत्पादन मिळाले. यंदाच्या जूनमध्ये आडसाली ऊस लागवडीसाठी बेण्याची विक्री झाली प्रतिटन तीन हजार रुपये दर मिळाला.
महादेव शेळके ९७६३८२४६०२
Summary

गोविंद कोल्हे ७५८८०१७६६३ तालुका कृषी अधिकारी, पाथरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com