Sugarcane : सुधारित तंत्र व अभ्यासातून ऊस शेतीत हातखंडा

वडगाव दरेकर (जि. पुणे) येथील कापसे कुटुंबाने सुधारित ऊस लागवड पद्धतीतून एकरी ७० ते १०० टनांच्या पुढे उत्पादनाचा पल्ला गाठला आहे. सुमारे ५० ते ६० एकर ऊसशेतीत (Sugarcane Farming) सुपर केन नर्सरी (Super Cane Nursery), पट्टा पध्दत, अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन (Nutrition Management), प्रयोगशील शेतकऱ्यांची संगत व कुटुंबातील सर्वांची साथ या वैशिष्ट्यांतून ऊसशेतीत त्यांनी चांगलाच हातखंडा तयार केला आहे.
Sugarcane
SugarcaneAgrowon

पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या वडगाव दरेकर येथील विश्‍वनाथ शिवा कापसे यांची वडिलोपार्जित तीन एकर शेती होती. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने अकरा वर्षे ते दुसऱ्या गावी काम करू लागले. कष्ट व जिद्दीने पुन्हा स्वतःची शेती (Agriculture) विकसित करण्यास सुरुवात केली. बॅक व नातेवाइकांच्या मदतीने शेती टप्प्याटप्प्याने घेण्याचे प्रयत्न सुरू केले. अनेक अडचणी आल्या. पण माघार घेतली नाही. वय वाढत गेले तसा शेतीचा कारभार मुलांकडे दिला. आज त्यांचा नातू म्हणजेच युवा शेतकरी माउली व कुटुंबातील अन्य सदस्य शेती सांभाळतात. आजमितीस एकूण ९५ एकर शेती आहे. त्यापैकी ५० ते ६० एकर ऊस आहे.

Sugarcane
Sugarcane : दुष्काळामुळे ब्राझीलमध्ये ऊस लागवडीत घट

ऊसशेतीचे व्यवस्थापन

माती परीक्षणावर भर- सातत्याने प्रत्येक प्लॉटमधील माती परिक्षण केले जाते. त्यामुळे कोणत्या जमिनीत कोणते घटक आहेत याची माहिती होते. त्यानुसार पीक बदल आणि खतांचाही वापर करता येतो.

पीक पद्धतीत बदल

ऊस काढल्यानंतर त्या शेतात कांदा, कापूस, ज्वारी, गहू, हरभरा अशी विविध पिके घेतात. त्यामुळे चांगल्या प्रकारे बेवड होऊन ती जमीन उसासाठी तयार होते. त्यातून उत्पादनात वाढ होत असल्याचा अनुभव आला आहे.

लागवड पद्धत

पूर्वी तीन फूट सरी पद्धतीचा वापर व्हायचा. आता साडेचार फूट पट्टा व दोन रोपांतील अंतर दीड फूट अशी पद्धत असते. त्यामुळे उसामध्ये हवा खेळती राहून मशागत सोपी होते. लागवडीपूर्वी शेणखत, लेंडीखत, कंपोस्ट किंवा ताग गाडून जमीन तयार केली जाते. त्यानंतर चांगल्या पद्धतीने मशागत करून सरी काढली जाते.

Sugarcane
Sugarcane : सांगलीत आडसाली ऊस लागवड संथ गतीने

ऊस बेणे मळा :

पुढील वर्षी किती क्षेत्रावर लागवड करायची त्यानुसार बेणे किती लागेल हे ठरवून चांगल्या प्रतीचा बेणे मळा तयार करण्यावर भर असतो. ८ ते १० महिन्यांच्या उसाचा वापर होतो.

सुपरकेन नर्सरी

मागील तीन वर्षांपासून ऊसशास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी यांच्या मार्गदर्शनाखाली सुपरकेन नर्सरीचा प्रयोग माउली राबवीत आहेत. तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी संदीप घोले यांचेही मार्गदर्शन मिळते. रोपे तयार करण्यासाठी छोट्या आकाराचे बेड तयार करून त्यावर रिकाम्या गोण्या अंथरल्या जातात. जेणे करून मुळांना धक्का पोहोचू नये. त्यावर माती पसरून एक डोळा बेणे लावले जाते. एकवीस दिवसाच्या रोपांची पुनर्लागवड होते. माऊली सांगतात की बाहेरून रोपे घेतल्यास तीन रुपये प्रति नग पडते. त्याऐवजी घरीच ७० पैशात दर्जेदार रोप तयार करता येते. को ८६०३२, फुले २६५ या जाती व आडसाली लागवडीवर भर असतो. बेणेप्रक्रिया आवर्जून केली जाते.

खत व्यवस्थापन

-घरच्या ८ ते १० म्हशी. त्यांच्या शेणखताचा वापर.

-लागवडीपूर्वी शेणखतात मुरवून मॅग्नेशिअम, झिंक, फेरस सल्फेट आदी सूक्ष्मद्रव्यांचा वापर.

-बेसल डोस मध्ये एकरी १०-२६-२६ किंवा १२-३२-१६ आदींचा वापर १०० किलोनुसार, पोटॅश ५० किलो.

-बाळबांधणीवेळी एकरी युरिया ५० किलो, तेवढाच पोटॅश व २४:२४:० १०० किलो. त्या वेळी

सूक्ष्म अन्नद्रव्यांचाही वापर.

-मोठ्या बांधणीवेळी एकरी १०-२६-२६ हे १०० किलो, गंधक १५ किलो. (याचा वापर बेसल डोसवेळीही), ह्युमिक ॲसिड दाणेदार- पाच किलो

-पाच- सहा वर्षांपासून उसाच्या पाचटाची कुट्टी वापरतात. साखर कारखान्याकडून त्यासाठी यंत्राची मदत. दोन ट्रॅक्टर्स व त्याआधारित अवजारेही आहेत.

पाणी व्यवस्थापन

-३ ते ४ विहिरी व बोअरवेल्स. १५ ते २० एकरांवर ठिबक.

-नदीजवळ शेती व जमीन काळी असल्याने अद्याप अन्यत्र ठिबक केले नाही.

-पाणी देण्यासाठी विजेची मुख्य अडचण येते. अनेक वेळा ट्रान्स्फॉर्मर जळतो. वीज वेळेवर उपलब्ध होत नाही. त्याचा पीकवाढीवर परिणाम होतो. त्यावर उपाय म्हणून सौरऊर्जेवर चालणारे दोन सौर युनिट उभारले आहेत. त्यामुळे दिवसाही पाणी देण्याचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटला आहे.

एकरी १०९ टनांपर्यंत उत्पादन

सुधारित व्यवस्थापनातून माउली यांनी एकरी २० ते ३० टनांपर्यंत उत्पादनक्षमता वाढवली आहे. त्यांना सध्या ७० ते ९० टन उत्पादन मिळते. दोन वर्षांपूर्वी फुले २६५ उसाचे एकरी १०९ टनांपर्यंत उत्पादन घेतले. त्यासाठी दौंड शुगर कारखान्याने सर्वोत्कृष्ट ऊस उत्पादक म्हणून पुरस्कार देऊन गौरव केला. गेल्या हंगामात आडसाली उसाचे एकरी ९७ टनांपर्यंत उत्पादन घेतले. एकरी ८० ते ९० हजार रुपये उत्पादन खर्च येतो. कारखान्याकडून प्रति टन २८०० ते २९०० रुपये दर मिळतो.

कुटुंबाचा एकोपा

बापूराव (माउली यांचे वडील), दत्तात्रेय व विठ्ठल असे तीन भावंडांचे कुटुंब आहे. एकूण २६ सदस्य

गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. तालुक्यात कापसे हे आदर्श कुटुंब म्हणून प्रसिद्ध आहे. ऊस शेतीतून आर्थिक सक्षमता मिळवलेल्या या कुटुंबाने शेतात तीन डौलदार घरे बांधली आहेत. शेतीत अनेक वेळा बँकेकडून कर्ज घेण्याची वेळ आली. मात्र वेळेत परतफेड करण्याची वृत्ती जपली. एकही कर्ज थकविले नाही. त्यामुळे बँकेत चांगली पत तयार झाली असून, अडचणीच्या काळात बँक चांगली मदत करत असल्याचा अनुभव आहे.

माउली कापसे - ९७६४८५०२०२, ९०११०६६४११

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com