Exotic Vegetable : परदेशी भाज्यांच्या शेतीत मिळवले नंबरी नाव

सातारा जिल्ह्यातील म्हसवे येथील शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते धनंजय व आशा हे चव्हाण दांपत्य सुमारे ११ वर्षांपासून विविध प्रकारच्या १५ परदेशी (एक्सॉटिक) भाज्यांची शेती करते आहे. अनेक वर्षांचा अनुभव, तांत्रिक ज्ञान, मिळवलेले कौशल्य, बाजारपेठांचा अभ्यास व त्यात आलेला आवाका या गुणांच्या जोरावर या शेतीत प्रगती करून स्वतःचे नाव तयार केले आहे.
Exotic Vegetable
Exotic VegetableAgrowon
Published on
Updated on

परदेशी (एक्सॉटिक) भाजीपाल्याची शेती (Exotic Vegetable Farming) तशी आव्हानात्मक असते. याचे कारण एकाच पिकावर अवलंबून न राहता बाजारपेठेतील मागणी (Exotic Vegetable Demand) लक्षात घेऊन विविध भाज्या पिकवण्याची (Vegetable) कसरत सातत्याने करावी लागत असते. सातारा जिल्ह्यातील म्हसवे येथील धनंजय चव्हाण यांनी याच परदेशी भाजीपाला शेतीत सुमारे ११ वर्षांहून अधिक काळाच्या अनुभवाच्या जोरावर आपले नाव तयार केले आहे.

शेतीचा प्रवास

धनंजय यांनी ‘बीएस्सी ॲग्री’चे शिक्षण २००० मध्ये पूर्ण केले. त्यानंतर लोणावळा येथील एका खासगी कंपनीत ते नोकरीस लागले. तेथे डच गुलाब, विविध परदेशी भाजीपाला उत्पादन घेतले जायचे. नोकरी सुरू असताना घरच्या शेतीकडेही धनंजय लक्ष ठेवून होते. जमीन सपाटीकरण, फळझाडे लागवड, विहीर, पाइपलाइन ही कामे त्या काळात पूर्ण केली. पत्नी आशा यांची यात मोठी मदत झाली. त्याचवेळी स्वतःच्या दहा गुंठ्यांत ग्रीनहाउस उभारून रंगीत ढोबळी मिरची घेतली. सुमारे ११ वर्षांचा नोकरीतील अनुभव तयार झाल्यानंतर स्वतःच्याच शेतीत प्रगती करायचे धनंजय यांनी ठरवले.

Exotic Vegetable
केंद्र सरकारने महाराष्ट्राला दर्जेदार परदेशी मत्स्यबीज द्यावे : मंत्री अर्जुन खोतकर

स्वशेतीत करिअर

नोकरी सोडल्यावर घरी प्रत्येकी दहा गुंठ्यांची ‘ग्रीन हाउसेस’ उभारून एकूण ३० गुंठ्यांत पॅालिहाउस केले. कंपनीतील अनुभव, तांत्रिक ज्ञान यांच्या जोरावर पाच एकरांत देखील परदेशी भाज्यांची शेती करण्यास सुरुवात केली. पत्नीही समर्थ साथ होती. शेती व बाजारपेठ यांचा आवाका व त्यावर पकड येत गेली तशी भाडेतत्त्वावर १५ एकरांपर्यंत क्षेत्र घेतले. सन २०१८ पर्यंत २० ते २२ एकरांत चव्हाण दांपत्य परदेशी भाज्यांची शेती करायचे. आज ते ८ ते १० एकरांपर्यंत आहे.

Exotic Vegetable
परदेशी भाज्यांच्या लागवडीचा प्रयोग

शेतीची वैशिष्ट्ये

-बोक्रोली, चायनीज कोबी, पॅाकचॅाय, चेरी टोमॅटो, लेट्यूसचे विविध प्रकार (उदा. आइसबर्ग, रेड लेट्यूस, रोमन, रॉकेट), गवती चहा, हिरवी, पिवळी झुकेनी, लीक, थाई व जालापिनो मिरची,

सेलेरी आदी सुमारे १५ प्रकारच्या भाज्या घेण्यात येतात.

-सुमारे १० ते २० गुंठे क्षेत्र. वर्षभर विविध हंगामांत बाजारपेठेतील मागणीनुसार लागवडीचे नियोजन.

- बहुतांशी पिकांत मल्चिंग पेपरचा वापर.

-प्रियांका व्हेजिटेबल असे ‘ब्रॅंडनेम’ तयार केले आहे.

- प्रतवारीवर विशेष लक्ष. त्यामुळे चांगला दर घेता येतो.

- भाजीपाला व्यवस्थित आणि वेळेत पोहोच होईल असे नियोजन.

-काढणी, पॅकिंग आदी दैनंदिन कामांचे आशा यांच्याकडे नियोजन. विक्री, वाहतूक व्यवस्था जबाबदारी धनंजय यांच्याकडे. कामांच्या जबाबदाऱ्या निश्‍चित केल्याने त्रुटी कमी होतात. कामे वेळेत व सुरळीत होतात.

-ट्रॅक्टर, वाहतुकीसाठी पीक अप व आठ मजूर कायमस्वरूपी.

-उत्पादन- प्रातिनिधिक

झुकिनी- प्रति १० गुंठे- चार टन, चेरी टोमॅटो- अडीच टन.

दर (प्रति किलो)

आइसबर्ग- ४० ते ६० रु., चेरी टोमॅटो व झुकिनी- ३५ ते ४५ रु.

Exotic Vegetable
परदेशी कंपन्या उतरल्या पारंपरिक पत्रावळी व्यवसायात

तयार केले मार्केट

नोकरीत असताना अनेक व्यापारी वा व्यावसायिकांशी संपर्क झाला होता. त्याचा फायदा धनंजय यांना स्वतःच्या शेतीत झाला. आज ते महाबळेश्‍वर येथे होटेलला थेट विक्री, मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत, दिल्ली, बंगळूर, हैदराबाद येथे मध्यस्थांना पुरवठा करतात. पुरवठ्यात सातत्य, मालाचा दर्जा व शेतीत टिकून राहणे यामुळे खरेदीदारांमध्ये विश्‍वास व त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करणे शक्य झाले. लग्नसराई, उन्हाळी सुट्ट्या, आयपीएल क्रिकेट वा तत्सम इव्हेंट्स अशा काळात मागणी वाढते. चांगला दर मिळतो.

उलाढाल

सन २०१८ पर्यंत क्षेत्र जास्त असल्याने वार्षिक ५० लाख रुपयांपर्यंत उलाढाल व्हायची. सध्या ती २५ ते ३० लाखांपर्यंत होते. ३० ते ४० टक्के नफा होतो.

लाखोचे नुकसान तरीही उभारी

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या काळात सुमारे २० एकरांत लागवडीचे नियोजन झाले होते. लॉकडाउन सुरू झाला आणि बाजारपेठ ठप्प झाली. सर्व भाजीपाला शेतातच सोडून देण्याची वेळ आली. या वेळी तब्बल ३० ते ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले. तरीही खचून न जाता चव्हाण दांपत्याने पुन्हा हिम्मत एकवटली. या शेतीत सकारात्मक व उत्साहरूपी चैतन्य भरले. आता व्यापारी स्वतः संपर्क करून भाजीपाल्यांची मागणी करीत असल्याचे चव्हाण दांपत्य अभिमानाने सांगते.

स्वतःची नर्सरी

एक महिन्यापासून ते तीन, सहा महिन्यांपर्यंत पिके काढणीस येत असल्याने वर्षाकाठी एका पिकाचे सतत प्लॅाट निघतात. यासाठी रोपेही तेवढीच लागतात. ती प्रत्येकवेळी बाहेरून आणणे शक्य नसल्याने स्वतःची नर्सरी उभारली आहे. पुणे, मुंबई येथून बियाणे आणून पॅालिहाउसमध्ये ट्रेमध्ये दर्जेदार रोपे तयार केली जातात. मार्केटची मागणी ओळखून कशाची किती रोपे तयार करायची याचा अंदाज येतो.

पुरस्काराने सन्मान

आई-वडिलांचा आशीर्वाद सोबत असल्याने इथवर प्रगती झाल्याचे धनंजय सांगतात. कृषी विभागाचेही सहकार्य मिळते. सन २०१९ मध्ये वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्काराने धनंजय यांना सन्मानित करण्यात आले आहे.

धनंजय चव्हाण, ९०४९२५५०१३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com