Kartule Farming : दहा गुंठ्यांत करटुलीतून नगदी पिकावाणी पैसा

Kartule Production : अकोला जिल्ह्यातील पारस येथील श्रीकृष्ण लांडे मागील चार वर्षांपासून १० गुंठ्यांत करटुले या रानभाजीची शेती करीत आहेत. वर्षातून केवळ अडीच महिन्यांपर्यंत हे पीक उपलब्ध होत असल्याने व औषधी गुणधर्माचे असल्याने त्यास ग्राहकांकडून मोठी मागणी आहे.
Kartule Farming
Kartule Farming Agrowon
Published on
Updated on

Spiny Gourd Farming Management : पावसाळा सुरू झाला की बाजारात आपल्याला वेगवेगळ्या रानभाज्यांची आवक होताना दिसून येते.काळानुसार त्यांच्या उपलब्धतेचे प्रमाण कमी झाले तरी खेड्यापाड्यांमधून आजही या भाज्या चांगल्या प्रकारे दिसून येतात. अशा रानभाज्यांपैकी विविध गुणवैशिष्ट्ये जपलेली भाजी म्हणजे करटुली. अकोले जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस या गावचे श्रीकृष्ण लांडे मागील चार वर्षांपासून या पिकाची शेती करीत आहेत. एखाद्या व्यावसायिक, नगदी पिकाप्रमाणे त्यातून चांगले उत्पन्न मिळत असल्याचे ते नमूद करतात.

करटुले पिकाचा प्रयोग

लांडे यांची सुमारे पाच एकर शेती आहे. खरिपात सोयाबीन, तूर तर रब्बी हंगामात गहू, हरभरा अशी पिके ते घेतात. मात्र या पिकांमधून त्यांना समाधानकारक उत्पन्न मिळत नव्हते. अशावेळी सोशल मीडियावर नव्या पिकांचे पर्याय शोधले. त्यातून मराठवाड्यातील शेतकरी करटुले पीक घेत असल्याचे समजले. अधिक माहिती, अर्थशास्त्र जाणून घेतल्यानंतर त्याचा प्रयोग करण्याचे ठरवले. मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडूनच त्याचे बियाणे आणले. आता मागील चार वर्षांपासून सुमारे १० गुंठ्यांत ते दरवर्षी खरिपात करटुले घेत आहेत. यंदा ही लागवड २० गुंठ्यांत केली आहे.

...अशी आहे करटुल्याची शेती

लांडे सांगतात, की एकदा लागवड केल्यानंतर हे पीक अनेक वर्षे उत्पादन देत राहते. त्यामुळे दरवर्षी लागवड करण्याची गरज नसते. प्रत्येकी चारशे फूट अंतराच्या लांबीचे चार तास (ओळी) घेऊन त्यात लागवड केली आहे. दोन ओळींतील अंतर सहा फूट, तर दोन झाडांमधील अंतर एक फूट ठेवले आहे. त्यापूर्वी डवऱ्याने सऱ्या पाडून त्यात शेणखत भरून घेतले. त्यावर सिंचन करून त्यानंतर बी लावले आहे. आता या वेलीचे चांगले कंद तयार झाले आहेत. दरवर्षी मे-जून महिन्यात पावसाळी वातावरण तयार झाले की या कंदांमधून वेल उगवणे सुरू होते. या वेली व्यवस्थित बांधण्यासाठी सिमेंट खांब उभारून त्यावर तारा बांधल्या आहेत. या तारांवर वेली फिरवल्या जातात. धागा किंवा सुतळीने वेली बांधल्या जातात. यातील काही वेल नर तर काही मादी प्रकारातील आहेत. परागीकरणासाठी या दोन्ही प्रकारच्या वेल ठेवणे उत्पादनाच्या दृष्टीने एकमेकांना पूरक असतात असे लांडे सांगतात. या पिकात खतांचा फारसा वापर होत नाही. कडुनिंबावर आधारित कीटकनाशकांच्यादोन ते तीन फवारण्या होतात. या पिकात फळमाशीचा उपद्रव असतो. तो थांबविण्यासाठी गंध सापळ्यांचा वापर केला जातो.

Kartule Farming
Healthy Vegetable : आरोग्यदायी रानभाजी करटुल्याची लागवड

...असे मिळते उत्पादन

आपला अनुभव सांगताना लांडे म्हणतात, की लागवडीनंतर पहिल्याच वर्षी फळे लागली. माल कमी मिळाला. तरीही सुमारे ४० हजारांचे उत्पन्न १० गुंठे शेतीतून मिळाले. पहिल्या वर्षी सिमेंट खांब, तार, बांधणीची मजुरी असा सर्व खर्च या उत्पन्नातून वसूल झाला. पुढील वर्षी उत्पादन व उत्पन्न वाढले. मागील हंगामात ७० हजारांपर्यंत विक्री झाली. तर करटुल्याचे दोन किलो बी तयार केल्याने तेही तब्बल १६ हजार रुपये प्रति किलो दराने विकले. त्यातून सुमारे ३० ते ३२ हजारांची मिळकत झाली. म्हणजेच गेल्या वर्षात १० गुंठ्यांतील शेतीने एक लाखाच्या आसपास पल्ला गाठून दिला.

थेट विक्री

साधारणपणे जुलै-ऑगस्ट काळात करटुले विक्रीस येतात. मागील तीन वर्षांच्या अनुभवानुसार प्रति आठवडा ४० किलोपर्यंत तर महिन्याला एक क्विंटलपर्यंत माल उपलब्ध होतो. एकूण विचार केल्यास तीन ते चार क्विंटलपर्यंत उत्पादन हाती येते. सुमारे अडीच महिने हंगाम चालतो.पारस आणि अकोला या ठिकाणी थेट विक्री करून प्रति किलो २०० ते कमाल ३०० रुपयांपर्यंत दर लांडे मिळवतात. पारसमध्ये औष्णिक वीज प्रकल्पाची वसाहत असून, त्या ठिकाणी ग्राहकांची चांगली मागणी राहते. मागील तीन वर्षांत या रानभाजीचे असंख्य ग्राहक लांडे यांनी तयार केले आहेत.

Kartule Farming
Medicinal Herbs : औषधी रानभाजी : टाकळा

गावरान वाणाला मागणी

आता करटुल्याच्या सुधारित जाती बाजारात आल्या आहेत. त्यांची फळे आकाराने मोठी होतात. मात्र आपण घेत असलेला वाण गावरान पद्धतीचा असून त्याची फळे फारशी मोठी होत नाहीत. ती साधारण लिंबाच्या आकाराची असतात. मात्र चविष्ट व औषधी गुणवर्धक असल्याने ग्राहकांची याच वाणाला पसंती असल्याचे लांडे यांनी सांगितले. दरवर्षी अकोला येथील कृषी विभागाच्या रानभाजी महोत्सवात लांडे सहभाग घेतात. त्याद्वारे प्रति किलो २०० रुपये दराने ३० ते ३५ किलोपर्यंतची विक्री साधतात. यंदा माल कमी असल्याने केवळ १५ किलोचा माल विकता आला.

कृषी विद्यापीठाने घेतले बियाणे

करटुले या रानभाजीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातही अभ्यास सुरू आहे. तेथील संबंधित शास्त्रज्ञांनी लांडे यांच्याकडून एक किलो बियाणे नेऊन त्याची लागवड केली आहे. अन्य शेतकरी काही प्रमाणात या भाजीच्या लागवडीसाठी पुढाकार घेऊ लागले आहेत. विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी भेट देऊन त्यांना मार्गदर्शन केले आहेच. शिवाय ‘आत्मा’ यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे यांनीही शेताला भेट देत त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

संकटांमध्येही जपली प्रयोगशीलता

लांडे यांच्या शेतापर्यंत जाण्यास पक्का रस्ता नाही. पावसाळ्यात करटुल्याची काढणी करावी लागत असल्याने शेतापासून मुख्य रस्त्यापर्यंत दीड किलोमीटर पायी चालत जावे लागते. मातीचा रस्ता असल्याने पाऊस पडला की वाहन शेतापर्यंत जात नाही. वन्यप्राण्यांमध्ये साळिंदराचा मोठा त्रास आहे. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ते शेतात येते. त्यातून पाचशे ते सातशे वेल खाऊन प्रचंड मोठे आर्थिक नुकसान त्याने केल्याचे लांडे म्हणाले. त्याचा प्रतिबंध करताना नाकीनऊ आले आहेत. पण हार मानलेली नाही. अडचणींवर मात करीत त्यांनी प्रयोगशीलता जपली आहे. नवनवीन वाणांच्या निवडीवर त्यांचा भर असतो. एकाच पिकावर अवलंबून न राहता बहुविध पीक पद्धतीचा ते प्रयत्न करतात. सिंचनासाठी सौरऊर्जा पंप बसवला आहे. वन्य प्राण्यांचा त्रास अधिक असल्याने संपूर्ण शेतीला तार कुंपण करून झटका तंत्रज्ञान पद्धतीचा वापर केला आहे. पत्नी संगीतादेखील शेतीत त्यांच्या बरोबरीने राबतात. शेतीतील उत्पन्नातूनच मुलगी सानिकाला पुणे येथे ‘एमबीए’चे शिक्षण देणे त्यांना शक्य झाले आहे. तर मुलगा ओम अकोला येथे रसायनशास्त्र विषयात बीएस्सी करीत आहे.

श्रीकृष्ण लांडे ९९६०२७८५२७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com