
Agriculture Success Story : कांद्याचे उत्पादन झाले की साठवणुकीची सोय नसल्याने बाजारात विक्री करून मोकळं होण्याशिवाय पूर्वी शेतकऱ्यांकडे पर्याय नव्हता. मात्र कुडाच्या, पाचटाच्या साह्याने हवा खेळती राहणाऱ्या तसेच पुढे काहींनी पक्क्या चाळी उभारल्या. शासनानेही राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कांदा चाळ अनुदान योजना सुरू केली.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा चाळीला उत्तेजन मिळाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही आर्थिक क्षमतेनुसार अनुदानाचा विचार न करता स्वखर्चातून टिनपत्रे, सिमेंटच्या पक्क्या चाळी उभ्या केल्या. त्याचा उपयोग त्यांना बाजारातील आवक व दर पाहून कांदा बाजारात टप्प्याटप्प्याने आणून विकण्यात होत आहे.
वैजापूर तालुक्यात साडेतीन हजारांवर चाळी
वैजापूर तालुक्यात रब्बी कांद्याचे २०२४-२५ मध्ये साडेअठरा हजार हेक्टर, २३-२४ मध्ये साडेचौदा हजार हेक्टर तर त्यामागील वर्षी साडेदहा हजार हेक्टर होते. कांदा उत्पादक तालुका म्हणून ओळख असलेल्या या तालुक्यात साडेतीन हजारांवर कांदा चाळी उभ्या राहिल्या आहेत.
यात शासन अनुदानित चाळींचाही समावेश असल्याचे कृषी अधिकारी रवी उराडे यांनी सांगितले. एकात्मिक फलोत्पादन योजनेअंतर्गत ५ ते ५० टनांपर्यंत साठवणूक क्षमतेच्या चाळींसाठी अनुदान दिले जाते. वैजापूर तालुक्यात कांदा पिकाचे वाढते क्षेत्र व त्या अनुषंगाने चाळीचे महत्त्व लक्षात घेता अनुदानावर कांदा चाळी लक्ष्यांक वाढविण्याची गरज असल्याचे शेतकरी सांगतात.
रवी उराडे ९४२०४ ९०३७६ ८३२९१ ४६०७४ (कृषी अधिकारी, वैजापूर)
घायगावच्या साळुंके दांपत्याचा अनुभव
वैजापूर तालुक्यातील घायगवचे चंद्रशेखर व उषा हे साळुंके दांपत्य कांदा शेतीचा आपला अनुभव सांगताना म्हणाले, की जमिनीचा पोत, पीकवाढीनुसार पाण्याचे व खतांचे व्यवस्थापन, काढणीपश्चात नियोजन आदी विविध बाबींवर कांद्याची टिकवणणक्षमता अवलंबून असते. पूर्णतः पोसलेल्या कांद्याला पोसल्यानंतर पाणी दिल्यास त्याची टिकवण क्षमता कमी होते. पूर्वी पाचटाच्या आधारे तयार केलेल्या चाळीत जास्त काळ साठवणूक शक्य होत नव्हती.
पाच वर्षांपूर्वी तयार केलेल्या ५० बाय ३२ फुटांच्या पक्क्या कांदा चाळीमुळे साठवणुकीचा प्रश्न मार्गी लागला. चाळीत दोन्हीकडेने साडेचार फूट रुंद व ५० फूट लांब साठवणुकीची व्यवस्था केली असून, मधली १६ फूट जागा पूर्ण मोकळी सोडली आहे.
मेमध्ये साठविलेला कांदा अगदी डिसेंबरपर्यंत केलेल्या योग्य व्यवस्थापनामुळे साठविता आला. त्यातून साडेचार हजार ते पाच हजारापर्यंत प्रति क्विंटल दर मिळाला. अर्थकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या कांदा शेती व्यवस्थापनातून दोन वर्षांपूर्वी चार एकरांत १५ लाखांपर्यंत उत्पन्न घेण्यात साळुंके दांपत्य यशस्वी झाले होते.
चंद्रशेखर साळुंके ९४२३७९२६६५
हवा खेळती ठेवणारी चाळ
वैजापूर तालुक्यातील नालेगावचे प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकरी बाबासाहेब एकनाथ गायकवाड यांची एकत्रित कुटुंबाची ५२ एकर शेती आहे. पंधरा वर्षांपासून ते पोळ, रांगडा व उन्हाळी हंगामांतील कांदा घेतात. सुमारे १२ ते १५ एकर क्षेत्र आहे. साठ बाय ३० फूट पक्की चाळ उभारून त्यांनी सुमारे दोन हजार क्विंटल साठवणुकीची क्षमता तयार केली आहे. हवा खेळती राहण्याच्या दृष्टीने चाळीचे तीन भाग केले आहेत.
मधला भाग सोईनुसार पूर्णतः वेगळा करता येतो. चार इंची छिद्र पाडलेल्या पीव्हीसी पाइप व प्रत्येकी पाच फुटांवर एक याप्रमाणे वरच्या भागात उघडतील असे छिद्र पाडलेले सुमारे १२ पाइप्स अशी रचना केली आहे. त्यामुळे चाळीत हवा खेळती राहणे शक्य झाले असून कांद्याची टिकवण क्षमताही वाढली आहे. उंदीर किंवा अन्य प्राणी जाऊ नयेत म्हणून पाइपचे तोंड जाळीने बंद केले आहे.
शास्त्रज्ञांच्या शिफारशीनुसार बाबासाहेब चाळीचे व्यवस्थापन करतात. अवकाळी पावसाच्या काळातही कांद्याची काढणी योग्य प्रकारे ते करतात. जेणे करून बुरशीजन्य रोगांचा संसर्ग कमी केला जाईल. साठवणुकीतील कांद्याचे नुकसान आजपर्यंत दहा- बारा टक्क्यांच्या पुढे गेले नसल्याचे बाबासाहेब सांगतात. जागतिक बाजारपेठ आढावा, देश व राज्यातील आवक दर पाहून स्वतःच्या पिकअप वाहनाने वर्षभर अधिक दर असणाऱ्या व आपल्याला परवडतील अशा विविध बाजारपेठांमध्ये कांदा पाठवत असल्याचेही बाबासाहेब म्हणाले.
बाबासाहेब गायकवाड ८८०६८७९६५५, ८३२९२३५१९०
अनुदानाची वाट नाही पाहिली
गंगापूर तालुक्यातील शिल्लेगावचे मच्छिंद्र कडू जाधव म्हणाले, की दहा वर्षांपासून उन्हाळी कांद्याची लागवड करतो. सुरुवातीला भोवताली कूड व त्यावर ऊस किंवा तृणवर्गीय पिकांच्या अवशेषांचे पाचट या पद्धतीने चाळ तयार केली. ती फारशी सुरक्षित नव्हती पाच वर्षांपूर्वी टीनपत्र्याचे छत, चार फूट रुंद, वीस फूट लांब, पाच फूट उंचीची १०० क्विंटल साठवणक्षमतेची चाळ बनवली. क्षमता वाढीसाठी काही काळातच तेवढीच तशीच दुसरी चाळ तयार केली. त्यामुळे २०० क्विंटलपर्यंत साठवणुकीची क्षमता तयार झाली.
आधीच्या अनुभवातून दोन वर्षांपूर्वी आणखी चार चाळी तयार केल्या. प्रत्येकीची रुंदी साडेतीन फूट, उंची सहा फूट, लांबी १७ फूट ठेवली. आता साडेपाचशे क्विंटलपर्यंत साठवणूक शक्य झाली आहे. वायुविजनासाठी बारा फॅन्सची व्यवस्था आहे. एप्रिलमध्ये उन्हाळी कांद्याची काढणी झाल्यानंतर सात- आठ दिवस तो शेतातच पातीखाली झाकून ठेवण्यात येतो. मेपासून साठवणुकीला सुरुवात होते.
एकरी १८० ते २०० क्विंटलपर्यंत उत्पादकता साध्य केली आहे. बाजारातील आवक, दर यानुसार टप्प्याटप्प्याने विक्रीला प्राधान्य असते. यंदा सुरुवातीला १५०० रुपये प्रति क्विंटलने ओल्या कांद्याची विक्री केली. आता सुमारे १०० क्विंटल साठवून ठेवला आहे. योजनेच्या अनुदानाची वाट न पाहता तयार केलेल्या चाळीमुळे गरजेनुसार विक्री व दर मिळवणे शक्य होत असल्याचे जाधव म्हणाले.
मच्छिंद्र जाधव ८७८८८८०१६२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.