
Agriculture Universities Update : महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून वर्धा जिल्ह्याची ओळख आहे. याच जिल्ह्यात कृषी विस्ताराला चालना देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत सेलसुरा येथे विदर्भातील पहिले कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) २७ डिसेंबर १९७९ रोजी स्थापन झाले.
या माध्यमातून कृषी विद्यापीठे, संशोधन संस्थांतील तंत्रज्ञान व शिफारसींचा प्रसार केला जातो. जोडधंदे, अन्नप्रक्रिया, रोजगार निर्मिती प्रशिक्षण देण्यात येते. डॉ. जीवन कतोरे हे केव्हीकेचे कार्यक्रम समन्वयक व प्रमुख आहेत. कृषी विद्यापीठाचे (अकोला) कुलगुरू डॉ. शरद गडाख, विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांचे पाठबळ त्यांना मिळते.
केव्हीकेचे उपक्रम
मातीच्या सुपीकतेसाठी
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जैविक खत उत्पादन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. कमी खर्चिक तंत्रज्ञानाद्वारे गांडूळ खत व गांडूळपाणी (व्हर्मिवॉश) निर्मितीचे प्रात्यक्षिक, प्रशिक्षण घेण्यात येते. प्रकल्प उभारणीसाठी शेतकऱ्यांना गांडूळ कल्चरचा पुरवठा करण्यात येतो.
या वर्षी चार शेतकऱ्यांनी व्यावसायिक तत्त्वावर असे प्रकल्प सुरू केले. केव्हीकेच्या माती परीक्षण प्रयोगशाळेत सामू, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद व पालाश व अन्य घटकांचे परीक्षण करून अहवाल देण्यात येतो. शेतकऱ्यांकडील प्रथम रेषीय प्रात्यक्षिक प्लॉटचे माती परीक्षण या ठिकाणी होते.
जागतिक मृदा दिनादिवशी मृदा आरोग्य पत्रिकेविषयी जागृती करण्यात येते. प्रयोगशाळेच्या माध्यमातून आतापर्यंत १२ हजार ३३७ माती नमुन्यांचे परीक्षण झाले आहे.
पीक संग्रहालय, बियाणे बँक
विविध पिकांच्या सुधारित व संकरित जातींच्या अवलोकनासाठी पीक संग्रहालय आहे. विविध चारापीक वाणांची लागवड केली आहे. त्यात फुले जयवंत, सीओ-वन, सीओ-टू, सीओ-थ्री, सीओ-५, डीएचएन-६, डीएचएन-१०, फुले यशवंत, बुंदेल ग्रास, पॅरा ग्रास आदींचा समावेश आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पारंपरिक बियाणे बँक प्रकल्प सुरू केला आहे. त्यात ७० हून अधिक स्थानिक बियाणे जतन केले असून, १८० शेतकऱ्यांनी प्रकल्पाला भेट दिली आहे.
पीक आनुषंगिक उपक्रम
-सुधारित व सरळ वाण शेतकऱ्यांना पुरविण्यासाठी सोयाबीनचे सुवर्णसोया, जवसाचे एनएल-२६० व हरभऱ्याच्या कनक या वाणांचा बीजोत्पादन कार्यक्रम.
-विदर्भातील कापूस पिकाचे महत्त्व व गुलाबी बोंड अळीची महत्त्वाची समस्या लक्षात घेऊन ट्रायकोग्रामा या परोपजीवी मित्रकीटकाची ‘ट्रायकोकार्डस’ जैविक कीटक निर्मिती प्रयोगशाळेत तयार केली जातात.
-प्रशिक्षणाद्वारे जागृती केली जाते. केव्हीकेतर्फे दत्तक खापरी गावात ट्रायकोकार्डसचे वितरण.
-दिघीची (बोपापूर) आदर्श गाव योजनेत निवड. येथे ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक. कीटकनाशक फवारणीदरम्यान विषबाधा रोखण्यासंबंधी जागृती.
-मागील वर्षाचे (२०२२-२३) प्रातिनिधिक उदाहरण घेतल्यास नव्या तंत्रज्ञानाच्या शेतावरील सात चाचण्या घेतल्या. त्याचा ८८ शेतकऱ्यांना लाभ. -१२ प्रथम रेषीय व समूह प्रात्यक्षिके झाली. त्याचा ३०६ शेतकऱ्यांना लाभ. शेतकऱ्यांकडील अभिप्राय घेऊन विद्यापीठास पुढील संशोधनासाठी तो कळविला जातो. -पिवळे चिकट सापळे प्रशिक्षणाचा ३० शेतकऱ्यांना लाभ. -दूरदर्शन केंद्र व वर्धा एफएमच्या माध्यमातून मार्गदर्शन.
पूरक व महत्त्वाचे उपक्रम
-शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर सुधारण्यासाठी कौशल्यावर आधारित प्रशिक्षणासाठी शेळीपालन युनिट. त्या अंतर्गत सध्या १५ शेळ्या आहेत.
-जिल्ह्यातील पशुपालकांसाठी अझोला उत्पादन प्रकल्प.
-पूरक व्यवसायातून शेतकरी आर्थिक स्वयंपूर्ण व्हावेत यासाठी अळिंबी उत्पादन व त्याचे प्रशिक्षण.
-आहारातील पोषणमूल्य वाढवण्यासाठी पोषणबाग विकसित केली आहे. दीडशेहून अधिक शेतकरी महिलांनी त्यास वर्षभरात भेट दिली आहे.
-जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत रूरल मॉलची उभारणी. यात केव्हीके संपर्कातील शेतकरी कंपनी, महिला बचत गट व इतरांना उत्पादने विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध केली आहे.
सन्मानाद्वारे प्रोत्साहन
जिल्ह्यात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानित करून इतरांनाही प्रोत्साहित करण्यात येते. त्यामध्ये शोभा गायधने (गिरड), दिलीप पाहणे (दारोडा), राहुल सुपारे (पवनार), ब्रह्मानंद पांगुळ (पवनगाव), रूपाली पाटील (नालवाडी), विशाल भागडे (झाडगाव), स्नेहलता सावरकर (कारंजी) यांचा गौरव झाला आहे.
पुढील नियोजन
-अद्ययावत रोपवाटिका उभारणीद्वारे फळबाग क्षेत्रामध्ये वाढ.
-रेशीम कीटक संगोपन गृह उभारणे, त्याद्वारे जिल्ह्यात रेशीम शेतीला प्रोत्साहन. तुती रोपवाटिका तयार करून दर्जेदार रोपांची उपलब्धता.
-प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरी लागवड व प्रशिक्षण
-अवजारे बँक उभारून भाडेतत्त्वावर पुरवठा. त्याद्वारे जिल्ह्यात यांत्रिकीकरणाला चालना.
संपर्क - डॉ. जीवन कतोरे, ८२७५४१२०१२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.