Lily Flower Farming : वन्यप्राण्यांच्या समस्यांवर लिली शेतीतून उपाय

Wildlife Issue : वन्यप्राण्यांचा प्रचंड त्रास व शेतीचे होत असलेले अपरिमित नुकसान यामुळे नेमळे (ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) येथील बागायतदार सीताराम राऊळ मेटाकुटीला आले होते. अखेर त्यांना लिली पिकाचा हुकमी पर्याय या समस्येवर मिळाला.
Lily Flower
Lily FlowerAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर झाराप तिठ्यावरून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर नेमळे गाव आहे. निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या या गावात पशुपक्षांचा सदैव वावर असतो. अलीकडे दुर्मीळ होत चाललेला मोरांचा बिनदिक्कत व तोही भरदिवसा वावर नेमळे गाव परिसरात मात्र कायमच दृष्टी, पडतो. जैवसंपदेने नटलेल्या गावातील बागायतदार आंबा, काजू, नारळ आदी फळपिकांचे उत्पादन घेतात.

भात, नाचणी, उन्हाळी मूग, उडीद, भाजीपाला, भुईमूग, वाल अशी पिकांची हंगामनिहाय विविधता येथे पाहण्यास मिळते. अर्थात गाव परिसरात वन्यजीवांचा वावर हा पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल असला तरी शेती, फळबागांच्या दृष्टीने तो शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरविणारा आहे. अलीकडील काळात गवा- रेड्यांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. त्यांच्याकडून आंबा, काजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. भात, नाचणी आदी पिकांचे संरक्षण करणे तर शेतकऱ्यांच्या हाताबाहेरच गेले आहे.

मुंबईत नोकरी, जीव मात्र गावाकडे

सीताराम अप्पा राऊळ याच नेमळे गावातील. ते कुटुंबासमवेत येथे राहतात. अकरावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते मुंबईला नोकरीच्या शोधात गेले. तेथे तीन- चार वर्षे खासगी कंपनीत नोकरी केली. परंतु मुंबईत काही मन रमले नाही. काही दिवस मुंबई तर काही दिवस गावी असा नित्यक्रम राहिला.

उदरनिर्वाहासाठी महानगरात जाण्याची वेळ आली तरी जीव मात्र गावीच होता. शेतीची आवड त्यांनी कायम जपली होती. त्यातूनच आपल्या शेतात त्यांनी आंबा लागवड केली होती. आजूबाजूला पाण्याची सोय नव्हती. तरीही झाडांची देखभाल आणि व्यवस्थापनात कुठे कसूर ठेवली नाही. अखेर १९८५ मध्ये मुंबईला रामराम करीत राऊळ कायमस्वरूपी गावी परतले.

Lily Flower
Floriculture : संकटांमधून सावरत फुलवले फुलशेतीतून सुखाचे रंग

शेतीचा विकास व लिलीची शेती

गावातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्यानंतर मात्र राऊळ यांनी शेतीच्या विकासावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. त्यांची साडेचार एकर शेती आहे. आंब्याची व्यावसायिक शेती करून ते चांगले उत्पन्न मिळवू लागले. त्या काळात गावात दूध संकलन फारसे नव्हते. अशावेळी ही संधी शोधून गावातील दूध संकलन करून ते सावंतवाडी येथील डेअरीला पुरवठा करू लागले.

सलग १२ वर्षे त्यात सातत्य ठेवले. शेतीच्या विकासाचे प्रयत्न सुरू होते. मात्र अलीकडील काही वर्षांत वाढलेला वन्यप्राण्यांचा त्रास व होत असलेले नुकसान यामुळे ते अक्षरशः मेटाकुटीस आले. वन्यप्राण्यांना रोखण्यासाठी गावातील शेतकरी बुजगावणे उभे करणे किंवा तत्सम उपाय करीत होते. परंतु कोणत्याही उपायांना गवे किवा अन्य प्राणी दाद देत नव्हते. एकेदिवशी निरवडे (ता.सावंतवाडी) येथील नातेवाइकांकडे गेले असताना लिलीची लागवड राऊळ यांच्या पाहण्यात आली.

नवी पिके, प्रयोग यांच्याबद्दल प्रचंड कुतूहल आणि आवड असल्याने साहजिकच त्याविषयी चौकशी केली. त्याचे अर्थकारण भावले. मात्र या फूलपिकाचे वन्यप्राण्यांकडून नुकसान होते का असा प्रश्न संबंधित शेतकऱ्याला विचारण्यास राऊळ विसरले नाहीत. वन्यप्राण्यांपासून कोणतेही नुकसान नाही अशी ग्वाही शेतकऱ्याने दिल्यानंतर राऊळ यांचा उत्साह अजून दुणावला. आपणही हा प्रयोग करून पाहायचे असे त्यांनी ठरवले.

सुरू झाली लिलीची शेती

आंबा लागवड असलेल्या क्षेत्रातील सात आठ गुंठे क्षेत्र लिली लागवडीसाठी निश्‍चित केले. निरवडे येथील शेतकऱ्याकडूनच कंदही खरेदी केले. लागवडीची संपूर्ण माहिती घेत गादीवाफेही (बेड) तयार केले. या नव्या प्रयोगाविषयी परिसरातील काहींनी शंका वा नकारात्मक सूर व्यक्त केले. परंतु खचून न जाता व टिकांकडे लक्ष न देता राऊळ यांनी नियोजनबद्ध काम सुरू केले.

लागवडीनंतर सुमारे दीड- दोन महिन्यातच उत्पादनाच्या रूपाने कामाची पावती मिळाली. सुरुवातीला दररोज पाव किलो, अर्धा किलो अशी वाढ होत चार किलोपर्यंत उत्पादन मिळू लागले. अर्थात, ते कमी असल्यामुळे विक्रीचा प्रश्न निर्माण झाला. राऊळ यांनी इथेही हार मानली नाही. बाजारपेठांचा शोध घेताना गोव्यात लिलीच्या फुलांना मागणी असल्याचे समजले. मग दुचाकीवरून गोवा गाठले. फुले व्यापाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी चार- पाच किलो फुले गोव्यात पाठविणे व विक्री करणे किफायतशीर नसल्याचे समजले.

Lily Flower
Floriculture : शेतकरी नियोजन : फुलशेती

तयार केली विक्री व्यवस्था

गोव्यात फुलांना मागणी होती. पण ‘क्वांटिटी’चा प्रश्‍न होता. मग राऊळ यांनी परिसरात शोध घेत तेथील एक लिली उत्पादक शोधून काढला. दोघांचे एकत्रित उत्पादन दुचाकीवरून गोव्यात पाठविण्यास सुरुवात झाली. राऊळ यांनी मग आपल्याच बागेतील कंदांचा वापर करून लागवड क्षेत्रही टप्प्याटप्प्याने वाढविण्यास सुरुवात केली. आजमितीला चार जागेत मिळून लिलीचे क्षेत्र ३५ गुंठ्यांच्या आसपास आहे.

या शेतीत सहा वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. वर्षभर दररोज चार- पाच किलोपासून ते १६ किलोपर्यंत उत्पादन मिळत राहते. हंगामानुसार ते कमी अधिक होते. पूर्वी गोवा, त्यानंतर सावंतवाडी, देवगड आदी बाजारपेठांमध्ये माल पाठविला. आता बांदा बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी करार केला असून ८० रुपये प्रति किलो दर वर्षभरासाठी निश्‍चित करण्यात आला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर लागवड करण्यासाठी दोन हजार कंदांचा पुरवठा केला आहे. कंदांचीही प्रति नग २५ रुपये दराने विक्री होते. या पिकातून दररोजचे ताजे उत्पन्न मिळू लागल्याने शेतीच्या अर्थकारणाला मोठा आधार झला आहे.

अभ्यासू शेतकरी

राऊळ यांना शेतीचा ५० वर्षाचा अनुभव आहे. ते अत्यंत अभ्यासू शेतकरी आहेत. त्यांची आंब्याची १४०, काजूची ६०, नारळाची ७० झाडे आहेत. शेतीचा विकास करताना पाण्याच्या उपलब्धतेसाठी विहीर खोदली. जलवाहिनी, ठिबक सिंचन यंत्रणा बसविली. सर्व खर्च स्वगुंतवणुकीतून केला. शेतीतील जमा-खर्चाचा लहान सहान तपशील राऊळ यांनी आपल्या डायरीत लिहून ठेवला आहे. त्यातून शेतीचे अर्थकारण उंचावणे त्यांना शक्य झाले आहे.

शेतीसोबत संगीत कलेचाही छंद

शेतीच्या छंदासोबत राऊळ यांनी संगीताची देखील प्रचंड आवड जपली आहे. ते उत्कृष्ट हार्मोनिअम वाजवतात. त्यांनी सामाजिक, दशावतार नाटकांना संगीत दिले आहे. सुस्वर भजने सादर करण्यामध्येही त्यांनी खासियत निर्माण केली आहे.

वन्यप्राण्यांकडून नुकसान नाही

राऊळ यांचे लिली लागवडीखालील क्षेत्र मुंबई-गोवा महामार्गालगत असले तरी परिसर पूर्णतः जंगलमय आहे. अनेक वन्यप्राण्यांचा भरदिवसा येथे वावर असतो. गव्यांचे अनेक कळप या परिसरातून फिरत असतात. राऊळ यांच्या शेत परिसरातूनही त्यांची ये-जा असते. आंबा आणि अन्य पिकांचे नुकसान ते करतात. लिलीच्या शेताजवळून ते जातात. मात्र कोणते नुकसान ते करीत नाहीत. अन्य वन्यप्राण्यांपासूनही या पिकाला नुकसान नाही. त्यामुळे आपण निवडलेला पर्याय योग्य ठरल्याचे राऊळ यांना समाधान आहे.

सीताराम अप्पा राऊळ ९४२३३०४५८४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com