Vegetable : थेट ग्राहकांना‘भाजीपाला बास्केट'ची विक्री

उत्पन्नवाढीसाठी कमी लागवड क्षेत्रात अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी करताहेत, यापैकीच एक आहेत फुरसुंगी(जि.पुणे) शिवारामधील सायकरवाडीतील कस्तुरी पवार. पुणे बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन त्या एका एकरात हंगामानुसार वीसहून अधिक विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करतात. ‘भाजीपाला बास्केट'च्या माध्यमातून त्यांनी वर्षभर ग्राहक तयार केला आहे.
Vegetable
Vegetable Agrowon
Published on
Updated on

पुणे शहरापासून जवळ असलेल्या फुरसुंगी गावात मागील पाच वर्षांपासून मोठ्या प्रमाणात शहरीकरण (Urbanization) वाढत आहे. त्यामुळे शेती क्षेत्र कमी होत चालले आहे. मात्र या गावातील सायकरवाडीमध्ये राहणाऱ्या कस्तुरी वैभव पवार यांनी शेती न विकता सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला उत्पादनावर (Organic Vegetable Production) भर दिला आहे. त्यांच्याकडे एकूण तीन एकर शेती आहे. त्यामध्ये एक एकरात भाजीपाला (Vegetable), एक एकरावर चारा पिके (Fodder Crop) आणि एक एकरावर लॉन लागवड (Lawn Cultivation) आहे. दोन वर्षांपूर्वी आत्मा आणि कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांनी ‘मिसेस आणि मिस्टर ऑरगॅनिक फार्म' सुरू केला. या फार्मवरून पुण्यातील ग्राहकांना सेंद्रिय भाजीपाला, धान्य, दूध, फळे, कडधान्यांची (Pulses) थेट विक्री सुरू केली. पीक व्यवस्थापन आणि विक्री नियोजनाचे त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. यामध्ये सेंद्रिय पद्धतीने कोणती पिके घ्यावीत, लागवड आणि व्यवस्थापन कसे करावे तसेच ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन पॅकिंग आणि विक्री कशी करावी यांची विस्तृत माहिती घेतली. त्यानंतर पुणे शहरातील ग्राहकांच्या मागणीनुसार विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांच्या लागवडीचा निर्णय घेतला.

Vegetable
Exotic Vegetable : परदेशी भाज्यांच्या शेतीत मिळवले नंबरी नाव

भाजीपाला लागवडीस सुरवात ः

भाजीपाला लागवड करताना कस्तुरीताईंनी दोन वर्षांपूर्वी सुरवातीला दहा गुंठे क्षेत्रावर भाजीपाला लागवड करण्यास सुरवात केली. सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक असणारे शेणखत, गोमुत्राच्या उपलब्धतेसाठी देशी गोपालनावर भर दिला. सध्या त्यांच्याकडे एक गीर आणि एक साहिवाल गाय आहे. परिसरातील ग्राहकांच्याकडून भाजीपाल्याची मागणी वाढत असल्याने टप्याटप्याने त्यांनी लागवड क्षेत्रात वाढ केली.दहा गुंठ्यानंतर वीस गुंठे, त्यानंतर एक एकरांपर्यंत भाजीपाला लागवड करून हंगामनिहाय विविध भाजीपाला पिकांच्या लागवडीवर त्यांनी भर दिला आहे. सेंद्रिय पद्धतीनेच पीक लागवडीचे व्यवस्थापन ठेवले जाते. स्वतः पती, पत्नी भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन करतात. गरजेनुसार मजूर घेतले जातात.

Vegetable
Wild Vegetable : रानभाज्यांची श्रीमंती

ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन सध्या कस्तुरीताईंच्या शेतीमध्ये वीस प्रकारचा भाजीपाला पिकांची लागवड आहे. यामध्ये पालक, कोथिंबीर, शेपू, मेथी, चवळी, राजगिरा, चुका, मुळा, बीट, गाजर तसेच दोडका, दुधी भोपळा, कारली, गवार, टोमॅटो, वांगी, मिरची, वाल, भेंडी, घोसाळे, हळद, आले, फ्लॉवर, कोबी, पुदीना, गवती चहा, कढीपत्ता, कोहळे या पिकांची लागवड आहे. गादीवाफ्यावर टप्याटप्याने हंगामनिहाय विविध पिकांची लागवड केली जाते. त्यामुळे विक्रीचे नियोजन सोपे जाते.

पीक व्यवस्थापन करताना तण नियंत्रण आणि पाणी बचतीसाठी तीन फुटाच्या गादीवाफ्यावर ठिबक नळ्या अंथरून प्लॅस्टिक आच्छादन केले आहे. त्यावर छिद्र पाडून विविध प्रकाराचा भाजीपाला बियाणे किंवा रोपांची लागवड केली जाते. आच्छादन केल्यामुळे पिकांची वाढ चांगली होते, असा अनुभव आहे. सर्व भाजीपाला पिकांना ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर केला जातो. गादीवाफ्यावर पालेभाज्यांची लागवड केली जाते. त्यामुळे त्यांची गुणवत्ता टिकून राहाते. याशिवाय पाण्याची चांगली बचत होते. कस्तुरी पवार यांनी गाव परिसरातील अकरा शेतकऱ्यांना एकत्र करून ‘अभिनव फार्मर्स क्लब‘ हा शेतकरी गट तयार केला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचा भाजीपाला देखील विक्रीसाठी उपलब्ध होतो.

बांधावर फळझाडे :

कस्तुरीताईंनी शेती बांधावर पेरू, जांभूळ,आंबा,पपई, केळी, चिकू अशा विविध प्रकारच्या फळपिकांची लागवड केली आहे. या झाडांपासून हंगामानुसार फळांचे उत्पादन सुरू झाले आहे. या सर्व

फळांची भाजीपाल्यासोबत ग्राहकांच्या मागणीनुसार थेट विक्री केली जाते. त्यामुळे फळांनाही चांगली मागणी आहे.

देशी गोपालनावर भर :

मुक्त संचार गोठ्यामध्ये कस्तुरीताईंनी एक साहिवाल, एक गीर गाईंचे संगोपन केले आहे. तसेच त्यांच्याकडे एक वळू,दोन कालवडीदेखील आहेत. गाईसाठी मुरघास तसेच हायड्रोपोनिक्स तंत्राने चारा उत्पादन केले जाते. सध्या प्रति दिन १५ लिटर दुग्धोत्पादन होते. परिसरातील सोसायटीमधील १५ ग्राहकांना दुधाची थेट विक्री केली जाते. तसेच मागणीनुसार तूप, पनीर,श्रीखंड, आम्रखंड तयार करून त्या विक्री करतात.

कुक्कुटपालनावर भर :

भाजीपाला पिकांचे उत्पादन घेत असतानाच कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून कस्तुरीताईंनी देशी जातीच्या वीस कोंबड्यांचे संगोपन केले आहे. त्यासाठी स्वतंत्र शेड तयार केली आहे. परिसरामध्ये देशी कोंबडीचे अंडे १४ रुपयांनी विकले जाते. दरमहा किमान २००अंड्यांची विक्री होते.

गोबर गॅसचा वापर :

स्वयंपाकासाठी शाश्वत इंधनाच्या उपलब्धतेसाठी कस्तुरीताईंनी छोट्या आकाराचा गोबर गॅसचा बसविला आहे. गोबरगॅसवर दररोज ४ ते ५ व्यक्तीचा स्वयंपाक होत असल्याने सिलेंडरची बचत होऊ लागली आहे.

ग्राहकांच्या मागणीनुसार ‘भाजीपाला बास्केट'

भाजीपाल्याची थेट विक्री अॅमनोरा पार्क, मगरपट्टा, फुरसुंगी, भेकराईनगर, पिंपरी चिंचवड, हडपसर येथील सोसायटीमधील सुमारे २०० ग्राहकांना केली जाते. ग्राहकांच्या मागणीनुसार भाजीपाल्याची सकाळी लवकर काढणी केली जाते. भाजीपाल्याची प्रतवारीकरून मागणीनुसार पॅकिंग केले जाते. प्लॅस्टिक क्रेट आणि कागदी बॉक्समध्ये भाजीपाल्याचे पॅकिंग केले जाते. त्यामुळे भाजीपाल्याची गुणवत्ता चांगल्या प्रकारे टिकून राहाते.

ग्राहकांना मागणीनुसार कस्तुरीताईंनी भाजीपाला बास्केट तयार केली आहे. फळभाज्या २० ते २५ रुपये प्रति २५० ग्रॅम, पालेभाज्यांची ३०० ते ३५० ग्रॅमची जुडी २० रुपये या प्रमाणे विक्री केली जाते. एका बास्केटमध्ये मागणीनुसार १० ते १२ भाज्या असतात. सरासरी एक बास्केट ७०० रुपयांपर्यंत जाते. यामध्ये ग्राहकांकडून कोणत्याही प्रकारचा वाहतूक खर्च आकारला जात नाही. वर्षभर कायमचे ग्राहक जोडलेले असल्याने मार्केटमधील भाजीपाल्याच्या दरामध्ये कमी- जास्त वाढ झाली तरी ठरलेल्या एकाच दराने भाजीपाला थेट घरपोच दिला जातो. भाजीपाला काढणी, पॅकिंग आणि थेट ग्राहकांना पोहोचविण्याच्या नियोजनामध्ये सासरे मुरलीधर, सासू बेबीताई आणि पती वैभव यांची चांगली मदत होते.

एका आठवड्यातून दोन वेळा ग्राहकांना भाजीपाला बास्केट दिली जाते. ग्राहक दर मंगळवारी आणि शुक्रवारी व्हॉट्स अॅपवरून भाजीपाल्याची मागणी नोंदवितात. त्यानंतर बुधवारी आणि शनिवारी भाजीपाला घरपोहोच दिला जातो. साधारणपणे एक आठवड्यात १०० ते १५० भाजीपाला बास्केट दिल्या जातात. दर महिन्याला ४५० ते ५०० भाजीपाला बास्केटची मागणी असते. त्यातून दर महिन्याला चाळीस हजार रुपयांची उलाढाल होते.

संपर्क ः कस्तुरी पवार, ९३९३८५२७२७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com