धिंगरी अळिंबी उत्पादनातून आदिवासी महिलांना स्वयंरोजगार

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (जि.नाशिक) आदिवासी पट्यातील महिलांना धिंगरी अळिंबी उत्पादनसंबधी प्रशिक्षण देऊन प्रगतीची वाट दाखविली आहे.
Mushroom Farming
Mushroom FarmingAgrowon
Published on
Updated on

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (जि.नाशिक) आदिवासी पट्यातील महिलांना धिंगरी अळिंबी उत्पादनसंबधी (Mushroom Farming) प्रशिक्षण देऊन प्रगतीची वाट दाखविली आहे. संघटीतपणे महिला गटांच्या माध्यमातून कामकाज होत असल्याने स्थानिक पातळीवर स्वयंरोजगार मिळाला, शिवाय त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.

Mushroom Farming
धिंगरी अळिंबीचे उत्पादन तंत्र

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात जिरायती क्षेत्रावर प्रामुख्याने भात,नागली,वरई अशी पिके तर काही भाजीपाला उत्पादन घेतात. मात्र दिवाळी झाली की, पुन्हा या कुटुंबांचा जगण्याचा संघर्ष सुरु होतो.स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी नसल्याने पुरुषांसोबत महिलाही पोटापाण्यासाठी स्थलांतरित होत असतात. त्यांना कायम स्वरूपी रोजगार उपलब्ध होण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेतला.
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात भात काढणी झाली की पिंजार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते.मात्र त्याचे फायदे माहिती नसल्याने अनेकजण ते जाळून टाकतात.तर कुणी टाकून देते. धिंगरी अळिंबी उत्पादनासाठी भाताचा पेंढा हा उपयुक्त स्रोत आहे. या सर्व बाजू अभ्यासून कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून धिंगरी अळिंबी उत्पादनासंबंधी आदिवासी महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. यातून महिलांना रोजगाराचा मार्ग मिळाला. उत्पादन आणि विक्री पद्धती अवगत करून बदल स्वीकारल्याने सामाजिक आणि आर्थिक प्रगतीच्या मुख्य प्रवाहामध्ये महिला येऊ लागल्या आहेत. कृषी विज्ञान केंद्रातील गृहविज्ञान शाखेच्या विषय विशेषज्ञ अर्चना देशमुख या धिंगरी अळिंबी उत्पादनात गुणवत्ता,विपणन पद्धती व बाजारातील संधी याबाबत महिलांना सातत्याने मार्गदर्शन करतात. महिलांना भात पेंढा वापरून धिंगरी उत्पादनाचे माध्यम बनविल्यानंतर गरम पाणी, रसायनाचा योग्य वापर करून निर्जंतुकीकरण, पिशव्या भरणे, स्पॉनिंग रूम, अंधार खोली व पूर्ण वाढीची अवस्था अशा प्रमुख मुद्द्यांवर प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय बियाणे (स्पॉन), बेड बनविण्यासाठी पॉलिथिन बॅग आणि फॉरमॅलीन द्रावण उपलब्ध करून त्याचे वितरण केले आहे.त्यामुळे मोठी चालना मिळाली आहे.

Mushroom Farming
अळिंबी स्पॉन करताना घ्यावयाची काळजी

धिंगरी अळिंबी उत्पादनास सुरवात ः
२०१९ पासून आजपर्यंत ४०० महिलांना धिंगरी अळिंबी उत्पादनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यापैकी १०० महिला धिंगरी अळिंबी उत्पादनात सक्रिय आहेत. भात,सोयाबीन तणस मुबलक प्रमाणावर उपलब्ध असल्याने हा पूरक उद्योग वाढत आहे. सध्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दहा गावांमध्ये आठ महिला उत्पादक गट कार्यान्वित असून त्यापैकी पाच गट गेल्या दोन वर्षांपासून सक्रियपणे काम करत आहेत. सुरवातीला व्यक्तिगत पातळीवर कामकाज होते. मात्र व्यक्तिगत जोखीम कमी करून संघटित पद्धतीने कामकाज सुरु झाले आहे.खरीप हंगामानंतर होणारे हंगामी स्थलांतर कमी होऊन महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.

कामकाज दृष्टिक्षेपात:
-बेरवळ,गावठा,हिरडी,विनायकनगर,साप्ते कोणे, चिरापाली, हातलोंढी,बोरीची बारी,बेहेडपाडा गावातील महिलांचा सहभाग.
-प्रशिक्षणाच्या माध्यमातून दहा गावामध्ये व्यावसायिक विस्तार.
- पाच महिला गटांच्या माध्यमातून उत्पादन सुरू.
- उत्पादन व विक्री समजून घेतल्याने बाजारपेठ मिळविण्यात यश.
- वाळविलेल्या अळिंबीचे उत्पादन, प्रक्रिया उत्पादनाकडे कल

Mushroom Farming
अळिंबी उत्पादन, प्रक्रियेत मिळविली ओळख

उत्पादनाचे गणित ः
आदिवासी महिला शेतकऱ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी संघटितपणे कामास प्राधान्य दिले. एका गटात दहा महिला असून वर्षभरात या महिला ४०० ते ५०० बेड तयार करतात. जून ते मार्च हा मुख्य उत्पादन हंगाम असतो. उत्पादनात सातत्य ठेवण्यासाठी टप्प्याटप्प्याने बेड तयार करून उत्पादन घेतले जाते. एका बेडमधून ४५ दिवसात किमान तीन वेळा अडीच ते तीन किलोपर्यंत अळिंबी
मिळते. त्यामुळे दररोज ५० ते ६० किलो अळिंबी एका गटांच्या माध्यमातून उत्पादित होते.
किरकोळ विक्रीसाठी आकर्षक पॅकिंग करून विक्री करण्याकडे महिलांचा कल आहे.'उत्पादक ते ग्राहक' या संकल्पनेवर भर आहे. ताजी अळिंबी गावामध्ये २५० ते ३०० रुपये आणि वाळलेली अळिंबी १००० प्रति किलो दराने विक्री होते. एक पाच किलोचा अळिंबी बेड भरण्यासाठी ६० रुपये खर्च येतो. एका बेडमधून ४५ दिवसात ६०० ते ७०० रुपयांची ताजी अळिंबी मिळते. खर्च वजा जाता एका बेड मागे महिलांना ५०० रुपये मिळतात.

व्यवस्थापनातील ठळक मुद्दे:
- उत्पादन परिसरात काटेकोर स्वच्छता.
- किमान खर्चात उपलब्ध साहित्याचा वापर करून खोली निर्मिती.
- ताजा पेंढा आणि स्वच्छ पाण्याचा उत्पादन प्रक्रियेसाठी वापर.
- स्पॉन भरण्यापूर्वी आणि अळिंबी काढणीपश्चात खोलीची स्वच्छता.
- वापरण्यात येणाऱ्या साहित्याचे फॉर्मलीनने निर्जंतुकीकरण.
- अळिंबी उत्पादनाचे गठ्ठे खराब झाल्यास त्वरित विल्हेवाट.
- खोलीमधील तापमान,आर्द्रतेचे पाणी मारून नियंत्रण.
- पूर्ण वाढ झालेल्या दर्जेदार अळिंबीची काढणी.
- प्रतवारी करून छिद्र पाडलेल्या प्लास्टिक पिशवीत भरून बाजारपेठेत पुरवठा.
-----------------------------------------------
नव्या बाजारपेठांचा शोध:
उत्पादित धिंगरी अळिंबीची स्थानिक पातळीवर म्हणजेच त्र्यंबकेश्वर,हरसूल येथे अधिक विक्री होते. याशिवाय मागणीनुसार नाशिकमध्ये अळिंबी पाठविली जाते.भीमथडी,गोदा अशा विविध प्रदर्शनांमध्ये विक्रीसाठी प्रयत्न होतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही अडचणी आल्या. मात्र आता नव्या बाजारपेठांचा शोध घेऊन विस्तार वाढविण्यात येत आहे. येत्या काळात सकस आहार व औषधीमूल्याचा उपयुक्तता विचारात गटातील महिला अळिंबी पापड, सूप, लोणचे निर्मिती करणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात हे पदार्थ विक्रीस येतील. यासाठी कृषी विज्ञान केंद्राने महिलांना प्रशिक्षण दिले आहे.

टाकाऊ पेंढ्यापासून खतनिर्मिती:
धिंगरी अळिंबी तयार झाल्यानंतर बेडमधील पेंढा फेकून न देता त्याचे रूपांतर करून गांडूळ खतनिर्मिती केली जाते. हिरडी, विनायकनगर येथे केंद्र शासनाच्या योजनेमार्फत गांडूळ खत प्रकल्प देण्यात आला आहे. शेतकरी महिला गांडूळ खत तयार करून भाजीपाला पिकांसाठी वापरतात, तसेच मागणीनुसार विक्री केली जाते. शेतीत वापर केल्याने भाजीपाल्याची गुणवत्ता सुधारली आहे.

कमी खर्च, कमी जागा आणि कमी वेळेत जास्त उत्पन्न देणारा अळिंबी व्यवसाय आहे. वाळलेल्या अळिंबीसही चांगली मागणी आहे. अळिंबीचे प्रक्रियायुक्त पदार्थ बनवून विक्रीसाठी काम सुरु आहे. प्रशिक्षण दिल्याने महिलांना चालना मिळाली आहे.
- अर्चना चंद्रशेखर मोहोड-देशमुख,९४०३७७४६९८
(विषय विशेषज्ञ, गृह विज्ञान, कृषी विज्ञान केंद्र,नाशिक)

पूर्वी शेतीत काम करताना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान व्हायचे.आता पारंपारिक शेतीला अळिंबी उत्पादनाची जोड दिली आहे. बाजारपेठेच्या अंदाज घेऊन अळिंबी उत्पादन घेतल्यास निश्चितीच परवडते. ताजी अळिंबी त्र्यंबकेश्वर तसेच परिसरात विकतो. वर्षातून साडेतीन महिने चांगले आर्थिक उत्पन्न मिळते.
- छबी हेमंत महाले, (सचिव,प्रगती स्वयंसहायता समूह)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com