अळिंबी स्पॉन करताना घ्यावयाची काळजी

संशोधनाच्या आधारे भारतामध्ये अळिंबी स्पॉनसाठी काही मानके विहित ठरविण्यात आली आहेत. शास्रीय भाषेत शुद्ध कल्चरला न्यूक्लियस बियाणे, मास्टर स्पॉनला ब्रीडर बियाणे आणि व्यावसायिक स्पॉनला फाउंडेशन किंवा प्रमाणित बियाणे या नावाने संबोधले जाते.
mushroom production
mushroom production

संशोधनाच्या आधारे भारतामध्ये अळिंबी स्पॉनसाठी काही मानके विहित ठरविण्यात आली आहेत. शास्रीय भाषेत शुद्ध कल्चरला न्यूक्लियस बियाणे, मास्टर स्पॉनला ब्रीडर बियाणे आणि व्यावसायिक स्पॉनला फाउंडेशन किंवा प्रमाणित बियाणे या नावाने संबोधले जाते. अळिंबी स्पॉन निर्मिती करताना विशेष काळजी घेणे आवश्‍यक असते.

अलीकडे स्पॉन उत्पादन तंत्रामध्ये बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत. पूर्वी व्यावसायिक स्पॉन दूध किंवा ग्लूकोजच्या बाटल्यांमध्ये तयार केले जात असे. ते एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे कठीण काम होते. त्यानंतरच्या काळात उष्णता प्रतिरोधक पॉलिप्रॉपीलिन पिशव्यांमुळे स्पॉन उद्योगामध्ये क्रांती आली. युरोप आणि अमेरिकेमध्ये स्पॉन उत्पादनासाठी ५ ते १० लिटर क्षमतेच्या पॉलिप्रॉपीलिन अर्धपारदर्शक बाटल्या देखील वापरल्या जातात. परंतु अधिक किमतीमुळे त्यांचा भारतात वापर होत जात नाहीत.  सध्या शिताके आणि कॉर्डीसेप्स स्पॉन द्रव स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यामुळे उबवणी काळ ३० दिवसांनी कमी करता आला आहे. 

 • केंद्रीय अति शुद्ध कल्चर किंवा बियाणे (न्यूक्लियस बियाणे) 
 •  कल्चर अनुवांशिकदृष्ट्या शुद्ध आणि मूळ कल्चरचे सर्व गुणधर्म दाखविणारे असावे.
 •  संशोधन संस्था किंवा खात्रीशीर स्रोताकडून कल्चर घेतलेले असावेत.
 •  कल्चर दूषित नसावे. बुरशी, जिवाणू इत्यादींपासून मुक्त असावे.
 •  शुद्ध कल्चर कंपोस्ट एक्स्ट्रॅक्ट अगर माध्यमावर राखले जावे. 
 •  कल्चरने निश्‍चित माध्यम व अनुकूल तापमानास विशिष्ट वाढीचा दर दर्शविला पाहिजे.
 •  बटन अळिंबीचे कल्चर तंतुमय, पातळ वाढीचे, आणि फिकट पांढऱ्या रंगाचे असते. धिंगरी अळिंबीचे कल्चर पांढरे आणि दाट वाढीचे जाड असते. भात पेंढ्यावरील अळिंबीचे कल्चर कापसासारखे जाडसर वाढलेले व १० ते १२ दिवसांनंतर त्यावर तपकिरी रंगाचे अतिसूक्ष्म बिंदू (स्क्लेरोटीया) दिसणारे असते. दुधी अळिंबीमध्ये सुती सफेद, दाट, मऊ जाडसर वाढ दिसते. शिताके अळिंबीमध्ये कल्चर सुरवातीला पूर्ण सफेद व नंतर हलके तपकिरी रंगाचे होते. 
 •   बटन, धिंगरी आणि शिताके अळिंबीचे कल्चर ४ ते ६ अंश सेल्सिअस तापमानास ठेवावे. तर भात पेंढ्यावरील व दुधी अळिंबीचे कल्चर १८ ते २२ अंश सेल्सिअस तापमानाला ठेवावे.
 •  भात पेंढ्यावरील व दुधी अळिंबीमध्ये इनक्युबेशन तापमान ३२ (२ अंश सेल्सिअस कमी किंवा जास्त) असावे. बटन, धिंगरी आणि शिताके अळिंबीसाठी ते २५ अंश सेल्सिअस दरम्यान असावे.
 • स्पॉन साठवणूक आणि वाहतूक 
 •  अळिंबी स्पॉन मायसेलियम (धागे) सक्रिय वाढीच्या अवस्थेत असतानाच वापरले पाहिजेत. 
 •  वाढीचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर स्पॉन पिशव्या ४ अंश सेल्सिअस तापमानात ३ ते ४ महिन्यांपर्यंत ठेवता येतात. 
 •  जास्त अंतरावर स्पॉनची वाहतूक करण्यासाठी, स्पॉन हवेशीर पिशव्या किंवा पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये पॅक करावेत. वाहतुकीसाठी रेफ्रिजरेटेड व्हॅनचा वापर करावा. 
 •  याशिवाय, सार्वजनिक किंवा खासगी वाहनांमधून देखील रात्रीच्या वेळी लांब पल्ल्यापर्यंत वाहतूक करता येते. जेणेकरून स्पॉनचे तापमान ३०-३२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढू नये. 
 •  भात पेंढ्यावरील व दुधी अळिंबीचे स्पॉन रेफ्रिजरेटेड तापमानात ठेऊ नयेत. कारण या अळिंबी कमी तापमानास संवेदनशील आहेत. 
 • मदर स्पॉन (ब्रीडर बियाणे) 

 •  मदर स्पॉन नेहमी शुद्ध कल्चरपासून तयार केले पाहिजे.
 •  कोणत्याही प्रकारच्या दूषिततेपासून मुक्त असावे.
 •  मदर स्पॉन गहू, ज्वारी, बाजरी किंवा बार्लीच्या दाण्यांवर वाढविले असावे.
 •  भात पेंढ्यावरील व दुधी अळिंबीमध्ये उष्मायन तापमान ३२ (२ अंश सेल्सिअस कमी किंवा जास्त) असावे. बटन, धिंगरी आणि शिताके अळिंबीसाठी ते २५ अंश सेल्सिअस दरम्यान असावे. 
 •  बटन, धिंगरी आणि शिताके अळिंबीचे ब्रीडर बियाणे ४ ते ६ अंश सेल्सिअस तापमानात ४० ते ४५ दिवसांपर्यंत ठेवता येते. तर भात पेंढ्यावरील व दुधी अळिंबीचे बियाणे १८ ते २२ अंश सेल्सिअस दरम्यान जास्तीत जास्त ३०-४० दिवसांकरिता ठेवावे.
 •  मदर स्पॉन हे ऑटोक्लेव्हेबल पारदर्शक काचेच्या बाटल्या किंवा फ्लास्कमध्ये तयार करावे. 
 • व्यावसायिक स्पॉन (फाउंडेशन/प्रमाणित बियाणे) 

 •  व्यावसायिक स्पॉन ऑटोक्लेव्हेबल, पारदर्शक पोलीप्रोपीलिन पिशव्यांमध्ये मास्टर स्पॉन (ब्रीडर बियाणे) पासून तयार केले पाहिजे.
 • उष्मायन तापमान व साठवणुकीचे तापमान मदर स्पॉन प्रमाणेच ठेवावे. 
 • प्रमाणित बियाणे मदर स्पॉन प्रमाणेच गहू, ज्वारी, बाजरी किंवा बार्लीच्या धान्यावर वाढवावे. तसेच कोणत्याही प्रकारच्या दूषिततेपासून मुक्त असावे.
 •  व्यावसायिक स्पॉनचा साठवण काळ बटन अळिंबीमध्ये ६० दिवस, धिंगरी आणि शिताकेमध्ये ३० ते ४५ दिवस तर भात पेंढ्यावरील व दुधी अळिंबीमध्ये ३० ते ४० दिवसांपेक्षा जास्त नसावा. 
 • पिशवीवर बियाणांचा लॉट क्रमांक, इनॉकुलेशन तारीख, जातीचे किंवा प्रजातीचे नाव आणि वजन टाकलेले असावे.
 • प्रत्येक नवीन व्यावसायिक बियाण्यासाठी ताजे मास्टर स्पॉन (ब्रीडर बियाणे) वापरावे. 
 • व्यावसायिक बियाण्यापासून पुन्हा व्यावसायिक बियाणे तयार करू नये. तसे केल्यास स्पॉन जास्त प्रमाणात दूषित होऊ शकते. तसेच उत्पादनामध्ये घट येते.
 • स्पॉन तयार करताना घ्यावयाची काळजी 

 • शुद्ध कल्चर वाढविण्यापासून ते स्पॉन साठवणूक आणि वाहतूक या काळात स्वच्छता ठेवणे गरजेचे असते.
 • बाहेरील व्यक्तींना इनॉकुलेशन खोलीत जाण्यास प्रतिबंध करावा.
 • दुषितीकरण रोखण्यासाठी इनॉकुलेशन खोलीचे फॉरमॅलीन किंवा ओझोन जनरेटर बसवून नियमितपणे निर्जंतुकीकरण करावे. तसेच दरवाज्यावर हवेचा पडदा बसवावा.  
 •  स्पॉन उबवणी दरम्यान, वारंवार तपासणी करून दूषित पिशव्या बाहेर काढून टाकाव्यात. 
 •   स्पॉन निर्मिती युनिटच्या परिसरात दूषिततेचा प्रसार टाळण्यासाठी दूषित पिशव्या ऑटोक्लेव्ह मध्ये निर्जंतुक (ऑटोक्लेव्हींग) करून जमिनीत पुराव्यात. 
 • स्पॉनिंग (माध्यमात बियाणे मिसळणे) करण्यापूर्वी रेफ्रिजरेटर मध्ये साठवलेले स्पॉन सामान्य तापमानात आणण्यासाठी किमान १० ते १२ तास आधी बाहेर काढावे. 
 • प्रत्येक स्पॉनिंगसाठी ताज्या स्पॉनचा वापर करणे आवश्यक आहे.
 • नियमितपणे जंतुनाशकांद्वारे प्रयोगशाळेतील सर्व  पृष्ठभागाचे आठवड्यातून दोनदा निर्जंतुकीकरण करावे. 
 • रेफ्रिजरेटरमध्ये साठवणूकीदरम्यान कल्चर दूषित होऊ नये, यासाठी ते ॲल्युमिनिअम फॉइलने गुंडाळावे.
 • कल्चर आणि स्पॉन डीप-फ्रीजरमध्ये शून्यापेक्षा कमी तापमानात कधीही ठेवू नयेत. तथापि, योग्य निकषांचे पालन करून क्रायो-प्रोटेक्टन्सचा वापर करून कल्चर अति कमी (-७० ते -१५० अंश सेल्सिअस) तापमानात जतन केली जाऊ शकतात.
 • कल्चर माध्यमाचे विहित तापमान, दाब आणि वेळेपेक्षा जास्त ऑटोक्लेव्हींग करू नये. कारण यामुळे माध्यमातील साखरेचे ज्वलन होऊ शकते.
 • - डॉ. अनिल गायकवाड,  ९४२०४९८८११

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
  Agrowon
  agrowon.esakal.com