Women Employment : पीठ विक्रीतून हक्काचा रोजगार

Business Income : देवळाली प्रवरा (ता.राहुरी,जि.नगर) येथील पदवीचे शिक्षण घेऊनही गृहिणी असलेल्या रोहिणी सुनील कदम यांनी घरगुती अनुभवातून दोन वर्षापूर्वी वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचे पीठ तयार करुन विक्रीला सुरवात केली. केवळ पाच किलोपासून झालेली ही सुरवात आता वर्षाला चार टनांपर्यंत पोहोचली आहे.
Employment
EmploymentAgrowon
Published on
Updated on

Success Story : देवळाली प्रवरा (जि.नगर) येथील नारायणराव यादवराव कदम यांचे भानुदासराव आणि सुनील असे दोन मुलांचे कुटुंब. नारायणराव नोकरीतून सेवानिवृत्त झाले असून कुटुंबाकडे केवळ दोन एकर शेती आहे. सुनील हे पशुवैद्यकीय सेवा तसेच औषधाचे दुकान चालवतात. त्यांची पत्नी रोहिणी या गृहिणी आहेत. त्यांना सातत्याने वेगवेगळ्या खाद्य पदार्थांच्या रेसिपी करण्याची आवड आहे. त्यातूनच त्यांना वेगवेगळे खाद्य पदार्थांचे पीठ तयार करून विक्री करण्याची कल्पना सुचली. या व्यवसायाने रोहीणीताईंसह अन्य दोन महिलांना रोजगार तर दिलाच, त्याचबरोबरीने वेगळी ओळख तयार करून दिली. ‘साची फूड्स'मुळे लोकप्रिय झालेल्या ‘मळा आणि तळा’ या स्लोगनच्या माध्यमातून त्यांनी आठ प्रकारातील खाद्यपदार्थांच्या पीठ विक्रीतून कुटुंबाच्या अर्थकारणाला गती दिली आहे. रोहिणी कदम यांना पीठ तयार करण्यासह विक्रीसाठी अनिता कांतिलाल उल्हारे यांच्यासह कुटुंबातील सदस्यांची मदत होते.

Employment
Agriculture Success Story : एकेकाळी केली मजुरी, आज शेतीत भरारी

अनुभवातून सुचली कल्पना

रोहिणी कदम यांना दिवाळी, दसरा, नवरात्र, गणेशोत्सव यासह अन्य सण, उत्सवाच्या काळात वेगवेगळ्या खाद्य पदार्थ तयार करण्याची आवड आहे. खाद्य पदार्थांच्या निर्मितीमध्ये त्यांना आई भीमाबाई आणि सासू मंगलबाई यांच्या अनुभवाची जोड मिळाली. पीठ निर्मिती व्यवसायाबाबत रोहिणीताई म्हणाल्या की, दोन वर्षापूर्वी मी एकदा संदीप साठे यांच्या किराणा दुकानात अनारसे तयार करण्यासाठी लागणारे पीठ आणण्यासाठी गेले. तेथे विशिष्ट गुळाची मागणी केली. त्यांनी याबाबत अधिक विचारणा केली, त्याबाबत चर्चा केली. तुम्ही जर घरी पीठ तयार करत असाल तर दुकानात विक्रीसाठी पाठवा, याला चांगली मागणी असते, असे साठे यांनी सांगितले. या अनुभवातून पीठ निर्मिती आणि विक्रीची कल्पना सुचली. याबाबत घरात चर्चा केली, संमती मिळाल्यावर पहिल्या वेळी पाच किलो अनारसे पिठापासून सुरवात केली. वडील गीताराम तांबे यांनी व्यवसायासाठी आर्थिक मदत केली. ग्राहकांच्या मागणीनुसार टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या खाद्य पदार्थांच्या पिठांची निर्मिती सुरू झाली. आज वर्षाला चार टनांपर्यंत पिठाची विक्री होते. यातून रोजगारासोबत ओळखही मिळाली. पीठ तयार केल्यानंतर किमान चार वेळा घरी त्यापासून खाद्य पदार्थ तयार करून त्याचा दर्जा तपासून पुढे बाजारपेठेत विक्रीस पाठविले जाते.

खाद्य पदार्थांची निर्मिती

रोहिणी कदम यांनी आठ प्रकारच्या विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांच्या पीठ विक्रीतून वेगळी ओळख तयार केली. याचबरोबरीने ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांनी अनारसे, चकली, डाळीच्या लाडूचे तयार ओले पीठ, हळद, धने पावडर विक्रीला देखील सुरवात केली. दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत विविध खाद्य पदार्थांच्या पिठाला दुप्पट मागणी राहणार असल्याचा रोहिणी कदम यांचा अंदाज आहे.

Employment
Employment : स्वप्नपूर्ती रोजगार निर्मितीची!

विविध पिठांची निर्मिती

गूळ आणि तांदळापासून अनारसा पीठ, वेगवेगळ्या डाळी, तांदूळ पोहे यापासून चकली भाजणी पीठ, हुलग्यापासून शेंगुळ्याचे पीठ, गहू, मका, हरभरा आणि अन्य खाद्य घटकांच्या मिश्रणातून दाळभाटी पीठ, तांदूळ, हरभरा डाळीपासून ढोकळा पीठ, ज्वारी, बाजरी, गव्हासह सर्व कडधान्यापासून थालीपीठ, भगर, साबुदाणा, रागीपासून उपवासाचे भाजणी पीठ, तसेच इडली मिक्स अशी विविध पिठे रोहिणीताई तयार करतात. पीठ निर्मितीसाठी त्यांनी दोन वर्षांपूर्वी गिरणी घेतली. नगर जिल्ह्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागात पिठाची विक्री केली जाते. याचबरोबरीने सोशल माध्यमाचा वापर करून राज्य आणि परराज्यातही पीठ पाठविले जाते. २०० ग्रॅम ते एक किलो असे पिठाचे पॅकिंग असते. साधारणपणे १५० ते ३०० रुपये किलो असे विक्री दर आहेत. दर महिन्याला ३०० किलो विविध पिठाची विक्री होते.

नगर जिल्ह्यातील विविध भागात रोहिणी कदम स्वतः चारचाकी गाडीने पिठाचा पुरवठा करतात. यावेळी त्यांचे वडील गीताराम तांबे यांची वितरणासाठी मदत होते. राज्याबाहेर पोस्टाच्या मदतीने पार्सल पाठविले जाते. नगर जिल्ह्यात पन्नासपेक्षा अधिक दुकाने, मॉलमधून खाद्य पदार्थांच्या पिठाची विक्री होते. विशेष करून नवरात्र, दिवाळी, दसरा, गणेश व गौरी उत्सव, गुढीपाडवा, संक्रांत या काळात खाद्य पदार्थ पिठाला चांगली मागणी असते. त्यामुळे दोन महिलांच्या मदतीने वर्षभर रोहिणीताई विविध प्रकारच्या पिठांची निर्मितीकरून पॅकिंग करतात.

कृषी महोत्सवातून विक्री

नगर येथे झालेल्या कृषी आणि महिला बचतगटाच्या एकत्रित महोत्सवात आत्माच्या मदतीने रोहिणी कदम यांनी पीठ विक्रीसाठी स्टॉल लावला. चार दिवसात ४५ हजारांची उलाढाल झाली. स्टॉलमुळे जिल्ह्यातील ग्राहकांशी ओळख झाली, यातून मागणी वाढत गेली. कृषी विभागाच्या कृषी महोत्सवातून ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या विक्रीला फायदा होतो, असे आत्माचे तत्कालीन तालुका समन्वयक धीरज कदम यांनी सांगितले.

रोहिणी कदम , ९७६५४७३३४०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com