Satara District Bank : सातारा जिल्हा बँकेची अमृत महोत्सवी वाटचाल

Journey of Satara District Bank : शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा या हेतूने आणि सातारा जिल्ह्यातील समाजधुरिणांच्या संकल्पनेतून दोन लाख रुपयांच्या भागभांडवलावर सुरू झालेली ‘सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सातारा’ अमृत महोत्सवाकडे वाटचाल करीत असून, बँकेचे भागभांडवल आता २८७ कोटींहून अधिक झाले आहे.
"Satara District Central Cooperative Bank Ltd., Satara"
"Satara District Central Cooperative Bank Ltd., Satara"Agrowon
Published on
Updated on

Platinum Jubilee Celebration : स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी त्यांना वेळेत व माफक व्याजदराने अर्थसाहाय्य उपलब्ध होणे आवश्यक आहे, ही सामाजिक गरज यशवंतरावजी चव्हाणसाहेब, बाळासाहेब देसाई, आर. डी. पाटील, किसन वीर आदी द्रष्ट्या व दूरदृष्टी असलेल्या समाजधुरिणांनी जाणली. त्यातूनच १९४५ मध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन करावी, असा विचारप्रवाह सुरू झाला. सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर कार्यकर्त्यांनी ८ जून १९४६ रोजी कराडमध्ये विचारविनिमय केला. स्वातंत्र्यानंतर त्या वेळचे लोकल बोर्डाचे अध्यक्ष, लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या अध्यक्षतेखाली १३ नोव्हेंबर १९४८ रोजी बैठक झाली.

सहकार खात्याशी चर्चा करून बँकेच्या स्थापनेसाठी अनुकूलता निर्माण व्हावी म्हणून प्रमुख नेत्यांचे शिष्टमंडळ निश्चित करण्यात आले. भागभांडवल गोळा करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले. यात विशेषत: देशभक्त आबासाहेब वीर, रघुनाथराव पाटील, भि. दा. भिलारे (गुरुजी) यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ११ ऑगस्ट १९४९ रोजी सहकार खात्याकडे नोंदणीचा प्रस्ताव दाखल झाला. आवश्यक असणारे दोन लाख रुपये भागभांडवल जमा झाले. १५ ऑगस्ट १९४९ रोजी बँकेची स्थापना व १५ नोव्हेंबर १९४९ रोजी रजिस्ट्रेशन प्राप्त झाले.

बँकेचे पहिले संचालक मंडळ अस्तित्वात आले, त्या वेळी बँकेचे पहिले चेअरमन म्हणून बाळासाहेब देसाई आणि व्हाईस चेअरमन म्हणून निळकंठराव कल्याणी यांची निवड झाली. ११ नोव्हेंबर १९५० रोजी तत्कालीन मुंबई राज्याचे गृहमंत्री मोरारजीभाई देसाई यांच्या हस्ते या बँकेच्या कामकाजाचा शुभारंभ सातारा येथील कन्या शाळेजवळच्या एका जुन्या घरात झाला. बळीराजाच्या हितासाठी बँकेचे कामकाज सुरू झाले. शेतकऱ्यांना पीकलागवडीसाठी अल्पमुदत कर्जपुरवठा सुरू करण्यात आला.

तसेच जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी जनतेला बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिल्या. अल्पमुदत पीककर्जाबरोबरच बँकेने कृषी व कृषिपूरक प्रत्येक कारणासाठी मध्यम मुदतीचा कर्जपुरवठा सुरू केला. यामध्ये प्रामुख्याने १९६२ मध्ये जिल्ह्यात दूध उत्पादनाची ‘दुधाचा महापूर योजना’ प्रभावीपणे राबविताना संकरित गायी, मुऱ्हा मेहसाणा म्हशी यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरू केला. प्रगतिदर्शक वाटचालीमुळे स्वतंत्र इमारतीची गरज निर्माण झाली. शिवाजी सर्कल, सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ‘किसान भवन’ ही प्रशस्त वास्तू बांधण्यात आली. या वास्तूचे उद्‌घाटन तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतरावजी चव्हाण व राज्याचे तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते ७ एप्रिल १९६६ रोजी झाले.

साखर कारखान्यांनाबरोबरच शेतकर्‍यांनाही अर्थसाहाय्य

सन १९७१ ते १९८१ या दशकात सह्याद्री, कृष्णा, अजिंक्यतारा, किसन वीर हे सहकारी साखर कारखाने उभारण्यासाठी बँकेने अर्थसाहाय्य उपलब्ध केले. तसेच बँकेच्या अर्थसाहाय्यातून जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा संस्था उभ्या राहिल्या. कोरडवाहू क्षेत्र बागायती झाले. यामुळे हरित क्रांती होऊन, शेतकऱ्यांना ऊसपिकासाठी कर्ज उपलब्ध करण्यात आल्यामुळे उसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली व साखर कारखान्यांचा उसाच्या गरजेचा प्रश्न सुटण्यास मदत झाली. त्यामुळे जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांचा विकास होऊन कृषी औद्योगिक क्षेत्रात वाढ झाल्याने यशवंतराव चव्हाणसाहेबांचे कृषी व औद्योगिक विकासाचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार झाले.

सन १९८१ ते १९९१ या दशकात जिल्ह्याच्या बागायत क्षेत्रात वाढ होण्यासाठी बँकेने इलेक्ट्रिक मोटर पंपसेट, पाईपलाईन, लघुसिंचन योजना यांसाठी कर्जपुरवठा सुरू केला. शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज व्हावे; कमी क्षेत्रात, कमी मनुष्यबळात व कमी पाण्यात जास्तीत उत्पन्न मिळवून शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळावा, या विचाराने बँकेच्या संचालक मंडळाने केंद्र शासन, नाबार्ड व महाराष्ट्र शासन यांचे मार्गदर्शन व मान्यतेने इस्राईल-अमेरिकेसारख्या अत्याधुनिक शेती करणाऱ्या देशांचा अभ्यास दौरा केला आणि जिल्ह्यातील पारंपरिक शेतीमध्ये उच्च तंत्रज्ञानाचा व व्यावसायिक दृष्टिकोनाचा क्रांतिकारी बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने विविध योजना कार्यान्वित केल्या. पारंपरिक शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्राचा वापर करण्याच्या योजनांची व्याप्ती विचारात घेऊन बँकेने १९८८ मध्ये तांत्रिक देखरेख आणि मूल्यांकन (टी.एम.ई.) विभागाची स्थापना केली.

पाण्याच्या बचतीसाठी ठिबक व तुषार सिंचन योजना कार्यान्वित केल्या. शेती व्यवसायातील मनुष्यबळाची कमतरता विचारात घेऊन बँकेने ट्रॅक्टर, पॉवर ट्रीलर, मळणी यंत्र, पेरणी यंत्र, पीक काढणी यंत्र, औषध फवारणी यंत्र इत्यादींसाठी कर्जपुरवठा सुरू केला. शेतकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी शेतकरी निवास कर्ज योजना कार्यान्वित केली. सन १९९६ मध्ये बँकेने हायटेक विभाग सुरू करून उच्च तंत्रज्ञानाची शेती करण्याचा मूलमंत्र शेतकऱ्यांना दिला. यामुळे ग्रीन हाऊसमधून जरबेरा, कार्नेशन इत्यादी फुलशेतीबरोबरच रंगीत ढोबळी मिरचीच्या उत्पादनातून अशा शेतमालाला देशांतर्गत मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली. उत्पादित मालाला अभयसिंहराजे भोसले ऊर्फ भाऊसाहेब यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या ‘अजिंक्यतारा फळे, फुले व भाजीपाला खरेदी विक्री सहकारी संस्थे’मार्फत देशांतर्गत व परदेशी बाजारपेठ उपलब्ध करून देऊन लक्षणीय कार्य केले. स्व. यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या पुरोगामी कृषिकार्याची व विचारांची ही नांदीच ठरली. सातारा जिल्हा हा ‘ग्रीन हाऊसचा जिल्हा’ म्हणून ओळखला गेला.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, याकरिता बँकेने पुढाकार घेऊन जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांना एकत्र करून जिल्ह्यात ६५० शेतकरी मंडळांची स्थापना केली. तसेच ‘यशवंत किसान विकास मंच’ स्थापन केला. या मंचाद्वारे शिवार फेरीचे आयोजन करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उत्पादनवाढीसाठी शेताच्या बांधावर जाऊन माहिती दिली जाते. शेतकरी उत्पादक कंपन्यांना शासनाच्या सर्व योजनांचे अनुदान मिळावे यासाठी बँकेमार्फत प्रोत्साहन देण्यात येते. तसेच शासनाच्या विविध कर्ज योजनांची, अनुदानाची बँकेमार्फत मदत दिली जाते.

"Satara District Central Cooperative Bank Ltd., Satara"
Shikhar Bank : शिखर बँकेचा स्वनिधी ६५०० कोटींच्या पुढे

तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने जिल्ह्यामध्ये १०.५० लाख महसुली खातेदार असून, त्यापैकी ६ लाख ४९ हजार सोसायटीचे सभासद आहेत. त्यापैकी ३ लाख ५० हजारांहून अधिक शेतकरी सभासदांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून पीक, तसेच शेतीपूरक कर्जपुरवठा विकास संस्थांच्या माध्यमातून केला जात आहे. शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के दराने उपलब्ध करून देणारी सातारा जिल्हा बँक ही राज्यातीलच नव्हे, तर देशातील पहिलीच बँक आहे. सन २०१०-२०११ पासून याकरिता बँकेने रुपये ३२.२० कोटी इतकी रक्कम बँकेच्या नफ्यातून शेतकऱ्यांना अदा केली आहे. तसेच बँकेने मध्यम व दीर्घ मुदत कर्जाची वेळेत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ४ ते ८ टक्क्यांपर्यंत व्याज सवलत दिली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक पत आराखड्यामध्ये जिल्हा बँकेचे कृषी कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट ५० टक्क्यांहून अधिक व जिल्ह्याच्या पूर्ततेतील वाटा सतत ७० टक्क्यांपेक्षा जास्त राहिलेला आहे. बँकेस दिलेल्या उद्दिष्टाची पूर्तता १०० टक्क्यांहून अधिक केलेली आहे.

शेती व शेतीपूरक व्यवसायाव्यतिरिक्त वैयक्तिक ग्राहकांना अर्थसाहाय्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने १९९७ मध्ये बँकेने व्यक्ती थेट कर्ज विभाग कार्यान्वित केला. या विभागांतर्गत ग्राहकांच्या गरजा विचारात घेऊन सायकल खरेदीपासून ऊसतोडणी यंत्राकरिता कर्जपुरवठा करण्यासाठी जवळपास ३० हून अधिक योजना कार्यान्वित केल्या. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना व्यावसायिक उच्च शिक्षण घेता यावे, याकरिता शैक्षणिक कालावधी सुरू असेपर्यंत शून्य टक्के दराने देशांतर्गत रुपये ३० लाख व परदेशात रुपये ४० लाख कर्जपुरवठ्याचे धोरण स्वीकारले आहे. तसेच व्यवसाय उभारणीसाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना (PMFME), प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना (PMEGP), मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) यांसारख्या शासन पुरस्कृत विविध अनुदान व व्याज परतावा योजना ‘बँक आपल्या दारी’ या अभियानाद्वारे ग्राहकांपर्यंत समक्षपणे पोहोचविल्या जात आहेत.

बँकेच्या एकूणच देदीप्यमान प्रगतीचा आढावा घेतला असता, पहिले वर्ष वगळता स्थापनेपासून बँक नफ्यात असून, बँकेस सतत ऑडिट वर्ग ‘अ’ आहे. बँकेचे दोन लाखांनी सुरू झालेले भागभांडवल सात दशकांच्या वाटचालीनंतर २८७ कोटींहून अधिक झाले आहे. बँकेचा सुरुवातीचा व्यवसाय १५ लाख होता, तो सात दशकांच्या वाटचालीनंतर १८ हजार कोटींहून अधिक आहे. बँकेने १९६२ पासून सभासदांना ४ टक्के लाभांश वाटपास सुरुवात केली असून, जास्तीत जास्त २० टक्क्यांपर्यंत लाभांश वाटप केले आहे. सन १९९२ पासून सतत २१ वर्षे बँकेने

१० टक्क्यांहून अधिक लाभांश वाटप केले आहे. बँकेचा निव्वळ एनपीए सतत १६ वर्षे ‘शून्य’ टक्के आहे. बँकेची वसुली टक्केवारी कायमच ९५ टक्क्यांहून अधिक असून, सामाजिक बांधिलकी जपत, अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त सुविधांच्या माध्यमातून अविरत ग्राहक सेवा ही बँकेची ठळक वैशिष्ट्ये आहेत.

बँकेच्या अधिकारी, सेवकांसाठी यशवंतराव चव्हाण प्रशिक्षण केंद्र

बँकेची प्रगती व कामकाजाची वाढती व्याप्ती पाहता कामकाजावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्य कार्यालयात विविध विभाग कार्यान्वित करण्यात आले आहेत. बँकेच्या संचालक मंडळाने भविष्यवेधी विचार समोर ठेवून नूतन प्रशासकीय इमारतीसाठी जिल्हा परिषदेसमोर जागा खरेदी केली आणि २४ नोव्हेंबर २००६ रोजी तत्कालीन केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री शरदचंद्रजी पवार व तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते बँकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्‌घाटन झाले. त्याबरोबरच बदलत्या बँकिंग प्रणालीमुळे प्रशिक्षणाची गरज भासू लागली असल्याने बँक अधिकारी, सेवक, तसेच विकास सोसायटीचे पदाधिकारी व महिला बचत गटाच्या पदाधिकारी आदींकरिता बँकेच्या जुन्या प्रशासकीय इमारतीमध्ये ‘यशवंतराव चव्हाण प्रशिक्षण केंद्र’ स्थापन करण्यात आले.

बँकिंग क्षेत्रामध्ये झालेले तंत्रज्ञानातील बदल आत्मसात करीत २००५ मध्ये टी.बी.ए.च्या माध्यमातून ग्राहकांना जलद गतीने सेवा उपलब्ध करून दिली. संगणक कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी जुन्या प्रशासकीय इमारतीमध्येच स्वतःचे अद्ययावत व प्रशस्त डेटा सेंटर उभारले. सन २०१३ मध्ये सर्व शाखा कोअर बँकिंग प्रणालीमध्ये जोडून आधुनिक बँकिंग सुविधा व तत्पर सेवा देण्यास सुरुवात केली.

विकास संस्थांच्या संगणकीकरणात सातारा जिल्हा बँकेचा सहभाग

केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सर्व सहकारी संस्था संगणकीकृत व्हाव्यात, संस्थांच्या कामकाजामध्ये पारदर्शकता, गती व सुसूत्रता यावी, सर्व विकास संस्थांना एकच सॉफ्टवेअर असावे, यासाठी विशेष मोहीम आखली आहे. यामध्ये सातारा जिल्हा बँकेच्या एकूणच कामकाजाचा विचार होऊन प्राधान्याने बँकेशी संलग्न असलेल्या ९६० संस्थांपैकी ६६३ विकास संस्थांची पहिल्याच टप्यात संस्था संगणकीकरणासाठी निवड केली आहे. या संस्थांना संगणक व इतर साहित्य प्राधान्याने उपलब्ध करून दिले जाणार असून, संस्था संगणकीकरणासाठी व त्यांच्या प्रशिक्षणासाठी सातारा जिल्हा बँकेची मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली आहे.

बँक स्वतःच्या प्रगतीबरोबरच संलग्न विकास संस्थांच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न करीत आहे. याचाच भाग म्हणून, सभासद पातळीवर १०० टक्के कर्जवसुली करणाऱ्या विकास संस्थांना दरवर्षी बँकेच्या नफ्यातून वसुली बक्षीस म्हणून प्रत्येक संस्थेस रुपये ३० हजार इतका निधी दिला जातो आहे. जिल्ह्यामध्ये एकूण ९६० विकास सेवा संस्था असून, त्यांच्या व्यवस्थापन खर्चावर नियंत्रण, व्यवसायवृद्धी, कर्जवाटपामध्ये भरघोस वाढ, प्रभावी वसुली संस्था सक्षम होण्यासाठी इतर व्यवसाय सुरू करणे या विषयी मार्गदर्शन केल्यामुळे चालू आर्थिक वर्षाअखेर बँकेच्या ९४६ विकास सोसायट्या नफ्यात आणण्यात बँकेस यश मिळाले आहे. भविष्यात सर्व विकास संस्था नफ्यात आणण्याचा बँकेचा मानस आहे.

महिला सबलीकरण व सक्षमीकरणांंतर्गत ३२ हजार ६४९ स्वयंसाहाय्यता बचत गट स्थापन करण्यात आले आहेत. त्यापैकी जवळपास १८ हजारांहून अधिक गटांना रुपये ३५ कोटींहून अधिकचा कर्जपुरवठा करण्यात आला आहे. सन २००८ पासून राज्यात सर्वप्रथम ४ टक्के इतक्या अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करणारी सातारा जिल्हा बँक ही देशातील एकमेव बँक आहे.

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याअंतर्गत प्रत्येकी रुपये दोन लाखांचे विमा संरक्षण उपलब्ध केले आहे. या योजनेंतर्गत बँकेने आजअखेर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये २ लाख ५९ हजार व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमध्ये ७१ हजार २१६ खातेदारांना सहभागी करून घेतले आहे. त्यापैकी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत असणारी प्रीमिअमची रक्कम बँकेने स्व-नफ्यातून तरतूद करून ग्राहकांच्या खात्यावर जमा करून मोफत विमा संरक्षण उपलब्ध करून दिले आहे.

बँकेत पगार जमा होणारे सर्व शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, सहकारी संस्था यांमधील कर्मचारी, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पगारदार खातेदार व बँकेचे सर्व सेवक यांच्यासाठी अत्यल्प प्रीमिअममध्ये बँकेने एकत्रित वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी सुरू केली आहे.

"Satara District Central Cooperative Bank Ltd., Satara"
Nashik DCC Bank : पीककर्ज, सक्तीच्या वसुली विरोधात शेतकरी संतप्त

बँकेचे सेवक व कुटुंबीयांसाठी विशेष सुविधा, विमा संरक्षण

बँक सभासद, शेतकरी व इतर ग्राहकांना विविध सेवा सुविधा व विमा संरक्षण प्रदान करण्यासाठी कार्यरत आहे, त्याचप्रमाणे बँकेचे सेवक व त्यांच्या कुटुंबीयांसाठीही विशेष सुविधा व विमा संरक्षण देत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने बँक सेवकांकरिता गृहकर्जावर व्याजसवलत, गंभीर आजार व अपघातासाठी विशेष रजा, बँक सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर बँकेत नोकरी हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला असून, कर्मचाऱ्यांच्या वारसांना विविध माध्यमातून जवळपास ५० ते ६० लाख रक्कमेची आर्थिक मदत दिली जाते. बँक सेवकांकरिता साताऱ्यामध्ये अल्प दरामध्ये ‘वेणुग्राम’ हा गृहप्रकल्प उभारण्याचे काम संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या सेवकांनी एकत्र येऊन सुरू केले आहे.

बँकेच्या कामगिरीचा १०९ पुरस्कारांनी गौरव

बँकेच्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेऊन बँकेस नाबार्ड, केंद्र शासन, राज्य शासन, महाराष्ट्र राज्य बँक्स असोसिएशन, तसेच सहकारी बँकिंग क्षेत्रातील नामांकित राष्ट्रीय व राज्य पातळीवरील शासकीय, निमशासकीय आणि खासगी संस्थांकडून आतापर्यंत १०९ पुरस्कारांनी गौरविले आहे. यामध्ये नाबार्डचे सर्वोत्कृष्ट कार्यक्षमतेचे सात पुरस्कार बँकेस प्राप्त झाले आहेत. एका दशकातील सातत्याने सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दलचा राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. तसेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सहकार क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट बँक म्हणून नोंद झाली आहे. बँकेस आयएसओ ९००१:२०१५ हे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे.

बँकेच्या सात दशकांच्या वाटचालीत बँकेचे नेतृत्व केलेल्या विलासराव पाटील (उंडाळकर), केशवराव पाटील, श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले, लक्ष्मणराव पाटील, भि. दा. भिलारे (गुरुजी), बकाजीराव पाटील, सुरेश वीर, दादाराजे खर्डेकर, विलासराव पाटील (वाठारकर), सदाशिवराव पोळ या मान्यवरांचे मोलाचे योगदान आहे.

जिल्ह्याची कृषी व ग्रामीण विकासाची मातृसंस्था व अर्थवाहिनी असणार्‍या ‘सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके’च्या यशस्वी वाटचालीमध्ये जिल्ह्यातील सर्व सहकाऱ्यांचे भक्कम नेतृत्व व मार्गदर्शन लाभल्यामुळे बँकेची सर्वांगीण प्रगती झाली आहे. अनुभवी संचालक मंडळ, कार्यक्षम प्रशासन, उत्कृष्ट निधी व्यवस्थापन, पारदर्शक कारभार आणि भविष्यवेधी सकारात्मक धोरणे व त्यांची प्रभावी अंमलबजावणी याद्वारे बँकेच्या उत्कर्षाचा आलेख कायम चढता आहे. बँकेचे ब्रीदवाक्य ‘उद्धरेदात्मनात्मानम्’ म्हणजे स्वत:बरोबर दुसऱ्यांचा उद्धार करणे याला अर्थ प्राप्त झाला.

बँकेचे ज्येष्ठ संचालक व विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, संचालक व माजी सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, संचालक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, संचालक श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, विद्यमान अध्यक्ष खा. नितीन जाधव (पाटील), उपाध्यक्ष अनिल देसाई, तसेच बँकचे सर्व संचालक मंडळ आणि बँकेचे अभ्यासू मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली बँकेची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

यापुढील काळातही बँकेची यशस्वी घोडदौड अधिक वेगाने सुरू ठेवण्याच्या दृष्टीने काही भविष्यवेधी योजना आखल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने पेपरलेस बँकिंग, फार्मर्स प्रोड्युसर कंपनीमार्फत कृषी प्रक्रिया प्रकल्प उभारणे, मूल्यवर्धन साखळी निर्माण करणे, शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नात दुप्पट वाढ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे, शेतकऱ्यांच्या कृषी माल निर्मितीसाठी चालना मिळावी म्हणून प्रयत्न करणे, सोसायट्यांना साठवणूक गृहनिर्मितीसाठी मदत करणे यांचा समावेश आहे.

सामाजिक बांधिलकीतून कोविड काळात अर्थसाहाय्य

बँक सामाजिक बांधिलकी जपत असून, जिल्ह्यातील विकासाभिमुख कामात नेहमीच अग्रेसर असते. २०१७-१८ च्या दुष्काळी परिस्थितीत बँकेने चारा छावण्यांकरिता भरीव मदत करून चारा व पशुखाद्य वाटपामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदविला आहे. कोविड-१९च्या काळात मुख्यमंत्री साहाय्यता निधीस २ कोटी १६ लाख रुपये देण्यात आले आहेत. तसेच बँकेमार्फत जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करून जिल्ह्यातील स्थलांतरित, मोलमजुरी करणारे मजूर व गरजू कुटुंबांना वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर शासकीय रुग्णांलयामध्ये उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटर, बायपॅप मशीन व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

सातारा येथे नव्याने सुरू झालेल्या मेडिकल कॉलेजसाठी १५ लाखांची मदत केलेली आहे. बँकेने २०१८ मध्ये पाणी फौंडेशन वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावांना जलसंधारणासाठी रुपये एक कोटी, २०१९ मध्ये सातारा जिल्ह्यात तीव्र दुष्काळामध्ये पाणीटंचाईच्या काळात रुपये २ कोटी खर्च करून दुष्काळग्रस्त भागात टँकरने पाणीपुरवठा केला. जलसंधारणाच्या कामात अग्रेसर असलेल्या कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी येथे बँकेचे संचालक, तसेच अधिकारी व सेवक यांनी समतोल बांध घालणे व चारी खोदण्यासाठी श्रमदानात सहभाग घेतला.

बँकेच्या डिजिटल सेवा

बँकेने ग्राहकांसाठी ATM, Micro ATM, NEFT, RTGS, Mobile Banking, UPI (Google pay/Phone pay), Pinnacle software, Own data center, DR Sites, Forex, PFMS, NACH, Debit/Credit या डिजिटल सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.

शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी स्थापन झालेल्या ‘सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके’ने गेल्या सात दशकांत देदीप्यमान कामगिरी केली असून, सातारा जिल्हा बँकेच्या पथदर्शी योजनांची केंद्र व राज्य पातळीवर दखल घेण्यात आली आहे. यापुढेही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबरोबरच शेतकर्‍यांसाठी अनेक भविष्यवेधी योजना राबविण्याचे नियोजन आहे.
मा. खासदार नितीन जाधव (पाटील) चेअरमन, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सातारा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com