Agriculture Success Story : सर्जेराव जेधे यांची शेतीतील विविधता अन् प्रयोगशीलता

Article by Kiran Bhaware : पारगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथील प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकरी सर्जेराव जेधे यांनी आपल्या सुमारे ६० एकर शेतीत पिकांची विविधता ठेवली आहे. मजूरबळ व पाण्याची शाश्‍वतता ठेवत त्यांनी शेतीत प्रयोगशील वृत्ती जोपासली आहे.
Sarjerao Jedhe
Sarjerao JedheAgrowon
Published on
Updated on

किरण भवरे

Agriculture Story : पुणे जिल्ह्यात पारगाव (ता. दौंड) येथील सर्जेराव जेधे यांची सुमारे ६० एकर शेती आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यातील प्रमुख सरदार कान्होजीराव जेधे यांचे सर्जेराव जेधे हे वंशज आहेत.

सर्जेराव यांना आजोबा स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील सेनानी आणि समाजसुधारक स्व. केशवराव जेधे यांचाही वारसा लाभला आहे. महात्मा जोतीराव फुले यांच्या सत्यशोधक चळवळीत एक शिलेदार म्हणून केशवराव जेधे यांना ओळखले जाते.

सर्जेराव यांचे वडील शिवाजीराव जुन्या काळातील उच्च शिक्षित ‘मॅकेनिकल इंजिनिअर’ होते. त्यांच्याकडून शिक्षणाचा वारसा घेत सर्जेरावांनीही १९७८ मध्ये बीएस्सी ॲग्री’ ही पदवी घेतली. पुणे जिल्ह्यात प्रगतिशील शेतीसह सहकार, ग्रामीण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सर्जेराव जेधे यांनी योगदान दिले आहे आणि देत आहेत.

शेतीच जपलेली विविधता

ऊस, गहू, सोयाबीन, कांदा, भुईमूग अशी सर्जेराव यांची मुख्य पिके आहेत. शेवगा, लिंबू तसेच शेतीच्या बांधावर शंभराहून अधिक झाडे आहेत. त्यात चिंचेची ८०, जांभळाची १०, तर नारळाची ५० ते ६० झाडे आहेत.

जनावरांसाठी मका, नेपिअर, लसूण घास आहे. सर्जेराव पूर्वीपासून एका बियाणे कंपनीसाठी १० ते १२ एकरांवर गव्हाचे बीजोत्पादन घेतात. गावात अनेक शेतकऱ्यांनी ही परंपरा जपली असून, परिसरात सुमारे सातशे एकरांवर हा कार्यक्रम राबविला जात असावा असे ते सांगतात.

गव्हाचे एकरी २७ ते कमाल ३० क्विंटल उत्पादन त्यांनी साध्य केले आहे. प्रति किलो ३२ रुपये दर बीजोत्पादनासाठी मिळतो. घरी खाण्यासाठी गव्हाच्या वेगळ्या जाती ते निवडतात. घरचे सण, बाहेरील यात्रा यांच्यासाठी खपली गव्हाची लागवडही ते दरवर्षी करतात.

Sarjerao Jedhe
Agriculture Success Story : प्रयोगशीलता जपत शेतीतून साधली प्रगती

ऊस व कांदा उत्पादन

यंदा सुमारे २५ एकरांत ऊस आहे. तीन वर्षांपूर्वी फुले २६५ वाणाचे एकरी १०५ ते १०७ टन उत्पादनापर्यंत ते पोहोचले होते. को ८६०३२ वाणाची उत्पादकताही एकरी ८५ टनांपर्यंत मिळवली आहे. अलीकडील वर्षांत काही तांत्रिक कारणांमुळे उत्पादकतेत घट झाली.

यंदा ती पुन्हा वाढविण्याचा प्रयत्न आहे. कांद्याचे ऑक्टोबर, डिसेंबर व जानेवारी अशा प्रत्येकी पाच एकरांतील तीन टप्प्यांत एकूण १५ एकरांत लागवड आहे. त्याचे एकरी १५ टनांपर्यंत उत्पादन ते घेतात. यंदा पाच एकरांत तुषार सिंचनाचा वापर केला आहे.

पाण्याची शाश्‍वत सोय व्हावी यासाठी उंच ठिकाणी २००५ मध्ये १२ लाख ८४ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली. नदीवरून पाइपलाइन आहे. ८० व ९० फूट खोल अशा दोन विहिरी आहेत. नदी आणि विहिरीचे पाणी एकत्र करून या टाकीत आणले जाते. सामू संतुलित करून ते पाणी ग्रॅव्हिटी पद्धतीने पिकांना देण्यात येते.

झेंडूचा प्रयोग

अतिवृष्टी आणि हवामान बदलामुळे सर्जेरावांनी पीक फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. सणासुदीच्या काळात फुलांना अधिक मागणी असते हे ओळखून मागील वर्षी सात एकर व पाच एकर अशा दोन टप्प्यांत १२ एकरांत झेंडूचा प्रयोग केला. जमीन खडकाळ असल्याने झेंडूसाठी दोन वर्षांपासून तयारी केली.

त्यासाठी सोयाबीन आणि कांदा घेऊन त्याचे अवशेष जमिनीतच गाडले. झेंडूचे भरभरून उत्पादन आले. गुणवत्ताही पाहण्यासारखी होती. पीक इतके यशस्वी झाले की पंचक्रोशीत त्याची चर्चा होती. पण दराने साथ दिली नाही.

किलोला क्वचित ५० ते ६० रुपये दर पण बाकी सरासरी १५ रुपये दर मिळाल्याने मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले. पण सर्जेराव निराश झालेले नाहीत. यंदा सर्वत्र दुष्काळी स्थिती असल्याने झेंडूला चांगला दर मिळेल या आशेने ते पुन्हा त्याची लागवड करणार आहेत.

Sarjerao Jedhe
Success Story of INORA : समृद्ध माती, शाश्‍वत शेती याच ध्यासाने कार्यरत ‘इनोरा’

पशुधन संगोपन, मनुष्यबळ

सर्जेरावांनी शेतीला आधार म्हणून दुग्ध व्यवसायही सांभाळला आहे. घरच्याच गायीचे दोन जातिवंत खिलार बैल आहेत. एकाचे नाव मुरल्या, तर दुसऱ्याचे सोन्या आहे. त्यांना साद घालताच उंच, धिप्पाड, देखणे असलेले हे बैल त्वरित प्रतिसाद देऊन हंबरतात. दोन म्हशी, त्यांची वासरे, एक साहिवाल व एक गीर गाय असे पशुधन आहे.

दररोज १५ ते १७ लिटरपर्यंत दूध मिळते. त्यातील १० लिटर डेअरीला पुरविले जाते. काही दूध घरच्या शेतमजुरांना दिले जाते. शेतीचे क्षेत्र जास्त असल्याने मनुष्यबळाची मोठी आवश्‍यकता लागते. दररोज २० मजूर काम करतात. ट्रॅक्टर्स व आवश्‍यक अवजारेही आहेत.

सामाजिक वारसा

तीन मजूर व त्यांच्या कुटुंबाची राहण्याची व्यवस्था वस्तीवर केली आहे. त्यांना धान्य आणि अन्य आवश्‍यक साहित्यही पुरविले जाते. शिक्षणासाठी आग्रही असलेले सर्जेराव मजुरांच्या मुलांचे शिक्षण, कपडे, आजारपणातील खर्च यासाठीही मदत करतात.

सन १९८७ ते १९९२ या कालावधीत पारगावचे सरपंचपदही त्यांनी भूषविले आहे. शिवाजी मराठा सोसायटीचे ते माजी ‘सेक्रेटरी’, तर पारगाव सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. महिलांसाठी राजमाता जिजाऊ पतसंस्थेची पारगावमध्ये त्यांनी स्थापना केली आहे.

सर्जेराव जेधे, ७३५०२२६३६३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com